Monday 11 August, 2008

पाऊसवेळा....!

खूप दिवसांनी पाऊस एवढा मनमुराद कोसळतोय. खिडकीच्या काचांवर पावसाचे निथळणारे थेंब भिंतींशी सलगी करू पाहतायत. भिंतींनीही हळूहळू ओल धरलीय. अंगणात तर केव्हाच तळं साचलेलंय... उनाड मुलं आईचा डोळा चुकवून पावसात चिंब भिजतायत... कागदी नावा पाण्यात सोडताना त्यांच्या चेह-यावरून ओसंडणारा आनंद पावसाइतकाच निर्मळ आणि कोवळा... येरे येरे पावसा म्हणत तळहातावर पावसाचे थेंब झेलू पाहणारी ही चिमुकली जगण्याचा खरा आनंद घेतायत... घराच्या गॅलरीत उभा राहून दिसणारं हे पावसाळी चित्र मनाला सुखावणारं... इतका अवखळ पाऊस पहिल्यांदाच भेटला घराच्या अंगणात तो असा.... वर्तमानपत्रांमधून इतके दिवस नुसताच कोरडा भेटणारा पाऊस आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. पुस्तकाची पानं चाळावीत आणि अचानक कुठे तरी आपल्याला हवा तो परिच्छेद सापडावा, तसं काहीसं या पावसानं केलं. असंच होतं अनेकदा... एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीसाठी आपण आतुर व्हावं, पण त्याची खूप दिवस भेटच होऊ नये आणि कधीतरी अचानक नकळता ती व्यक्ती आपल्याला भेटायला यावी, तसा हा पाऊस आला... जूनच्या सुरूवातीला हजेरी लावून बरेच दिवस बुट्टी मारणारा पाऊस मला तर अगदी शाळा चुकवणा-या मुलासारखाच वाटला... पाऊस गायब झाला म्हणून अनेकांनी आभाळाकडं डोळे वटारूनही पाहिलं... पण, घाबरतो तो पाऊस कसला ? तो आपल्या मन मानेल तेव्हाच आला, एखाद्या मनस्वी मांजरासारखा... दूध पाहिजे तेव्हा आपल्याशी लगट करणारी मांजर आपण गोंजारू पाहतो तेव्हा आपल्याजवळ येते थोडंच ? तर असा हा पाऊस... खूप दिवसांनी आलाय. झाडंही त्या आनंदात चिंब होऊन अंघोळ केल्यासारखी हिरवी तुकतुकीत झालेली... सगळीकडे एक प्रकारचं अनामिक चैतन्य साठलेलं... खरंच कसे होतात नां हे वातावरणातले बदल ? कुणीच सांगू शकत नाही निसर्गाच्या मनात काय आहे ते... अगदी वेधशाळासुद्धा...! अहो माणसाच्या मनातलं त्याच्या चेह-यावरून वाचता तरी येतं.. पण, निसर्गाच्या मनातलं वाचायला आपणच पाऊस व्हावं लागतं...! आपणच आभाळाचं निळं निळं गाणं गावं लागतं... धुक्याच्या दुलईत डोंगर होऊन लपेटावं लागतं... काळ्याशार मातीतून अंकुरावं लागतं.... हिरव्या हिरव्या पानांतून वारा होऊन सळसळावं लागतं...! आज पाऊस खूप दिवसांनी आला म्हणूनच तर एवढं कवितेसारखं सुचू लागलं... शाईतून थेंब थेंब कागदावर झरू लागले आणि पावसाचं शब्दचित्र साकारू लागलं... काहींना नुसतीच कविकल्पना वाटेल, काहींना शब्दांचा फक्त फुलोरा वाटेल, काहींना यातून थोडंसं भिजल्याचा अनुभवही येईल तर काहींना कदाचित यातून काहीच जाणवणार नाही... पण, आपला पाऊस आपण अनुभवला पाहिजे, शक्य तितका तळहाताच्या ओंजळीत साठवला पाहिजे... मनाच्या आतून खोल खोल झरला पाहिजे.... कधी एकट्यानं तर कधी जोडीनं भिजत भिजत आठवणींच्या छत्रीत पाऊस झेलला पाहिजे... तेव्हा या मोसमात किमान एकदा तरी थोडं पाऊस होऊया, थोडा पाऊस पिऊया…
- दुर्गेश सोनार

Monday 4 August, 2008

मी कधीच नव्हतो माझा, माझेही नव्हते कोणी
का तरीही दाटून आले तुझिया डोळां पाणी ?