Thursday 29 January, 2009

तोल सावरताना....!

सकाळी ऑफिसला जायला निघालो. सोसायटीच्या बाहेरच डोंबा-याचा खेळ सुरू होता. दोन बाजूला काठ्या उभारलेल्या... त्याला एक दोरी बांधलेली आणि त्यावर सात आठ वर्षांची चिमुरडी डोक्यावर हंड्याची उतरंड घेऊन काठीने तोल सांभाळत कसरत करत होती. तिच्या साथीला होता ढोलकीचा ताल.. कळकट कपड्यात फाटलेला संसार शिवण्यासाठी जगण्याचा संघर्ष करणारा तो डोंबारी... फाटकी लुंगी, मळलेला सदरा आणि गळ्यात अडकवलेला ढोलक, असा त्याचा अवतार... पोटाची खळगी भरण्यासाठी आपलाही हातभार देणारी ती चिमुरडी... काठीने तोल सावरणारी ती चिमुरडी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचाही तोल सांभाळत होती. काय असेल तिचं भविष्य..?  मनात विचार आला, असे किती पैसे त्याला मिळत असतील, अशी कसरत करून ?  पण, पोटासाठी ही रोजची कसरत त्यांना करावी तर लागणारच... आपण नाही का करत अशी कसरत... ? करतो, जरूर करतो... पण, त्यात फरक असतो जमीन अस्मानाचा.... 'घरोघरी मातीच्या चुली' अशी मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी असा येत असतो. समस्या, दुःखं, प्रत्येक माणसाची सारखीच असतात... फक्त त्याचं स्वरुप आणि परिस्थिती वेगवेगळी असते. आपणही खरे तर डोंबारीच असतो... पांढरपेशी डोंबारी...  व्यवस्था नावाचा ढोलक आपल्याला नाचवत असतो आणि आपणही जगण्याची कसरत करत असतो. दोन बाजूंच्या काठ्यांना बांधलेला दोर आणि त्यावरून चालताना पडू नये म्हणून करावी लागणारी खटपट... सरावानं हे शक्य होत असलं तरी त्यासाठी परिश्रम करावे तर लागतातच नां... ? आपणही असेच हळूहळू सरावतो... आणि आपल्याही नकळत पट्टीचे डोंबारी होऊन जातो... रस्त्याने जाताना आजूबाजूला असे अनेक डोंबारी दिसतात, काही सडलेले, काही पडलेले, तर काही चिवटपणे तोलून उभे राहिलेले....

ऑफिसात आलो... सवयीप्रमाणे ई मेल चेक केले. एका बालमित्राचा अनपेक्षित मेल इनबॉक्समध्ये येऊन पडला होता. उत्सुकतेने मी तो वाचला. नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेलेला तो मित्र वैतागला होता. मंदीमुळे त्याच्या नोकरीवर संक्रांत आलेली... कुठल्याही क्षणी गाशा गुंडाळून भारतात परतावं लागणार या विचारानं तो हतबल झालेला... त्याच्या शब्दांशब्दांतून ते प्रतीत होत होतं. भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीतही त्याला स्वास्थ्य नव्हतं. तो त्याचा तोल सावरू शकत नव्हता. आत्मविश्वास ढळलेला तो माझा मित्र केविलवाणा होऊन तिथलं मंदीचं वास्तव सांगत होता... माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तो सकाळचा डोंबारी आणि दोरीवर तोल सावरत चालणारी ती चिमुरडी आली.... तोल सावरण्याचं त्यांचं कसब पाहून खरंच अप्रूप वाटलं... एकीकडे मंदीच्या फटक्यामुळे तोल न सावरू शकणारा माझा परदेशातला मित्र तर दुस-या बाजूला परिस्थितीचा हसतमुखाने स्वीकार करत जगणं तोलून धरणारी ती चिमुरडी.... तोल राखायला शिकवणारे हे प्रसंग माझ्यासाठी तितकेच तोलामोलाचे वाटले.

-          दुर्गेश सोनार (दिनांक, २९ जानेवारी २००९)

Monday 26 January, 2009

माझा प्रजासत्ताक...

नेहमीपेक्षा आज जरा लवकरच उठणं झालं ते सोसायटीत मोठ्याने लागलेल्या गाण्यांमुळे... अगदी सक्काळी सक्काळी `ऐ मेरे वतन लोगो`चे सूर कानी पडले... आणि झोपी गेलेला जागा झाला...! झोपलेल्या प्रत्येकाला जागं करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या सद्भावनेनंच जणू काही आमच्या सोसायटीतल्या कार्यकर्त्यांनी हे गाणं मोठ्या आवाजात लावलं असावं, असा समज होऊन अस्मादिकांचं उठणं झालं... असो, निमित्त काही का असेना वर्षातून असं दोनदा या गाण्याची आठवण होते आणि तमाम भारतीयांना शहिदांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिल्याचं समाधान असं सोसायटी सोसायटीतल्या प्रत्येक देशभक्त कार्यकर्त्याला लाभतं.... तर आमच्या प्रजासत्ताकाची सुरूवात झाली ती `याद करो कुर्बानी`च्या अमीट सुरांनी.... त्याच्या जोडीला देशभक्तीपर गाणी गाण्यासाठीच जन्मलेल्या महेंद्र कपूरांच्या आवाजातली गाणीही होतीच... अधूनमधून ऑस्कर नॉमिनी रेहमानभाऊंचं `माँ तुझे सलाम` होतंच... अशा स्वरमिलाफात प्रजासत्ताक दिनाची सुरूवात म्हणजे अहाहा....! या गाण्यांच्या पार्श्वसंगीतावर आमच्या चित्तवृत्ती जाग्या झाल्या. लाल किल्ल्यापासून ते देशभरातल्या शाळा कॉलेजं, सरकारी ऑफिसांमध्ये तिरंगा अभिमानानं लहरत असल्याचं सुखद चित्र डोळ्यांसमोर तरळू लागलं... तशी स्वप्नं पाहायची आमच्या डोळ्यांची सवय फार जुनी आहे. अहो मीच काय, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही स्वप्नं पाहायचे... म्हणूनच तर स्वातंत्र्याची पहाट होत असताना त्यांनी भारतीयांना एक स्वप्न दाखवलं होतं. फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता. त्यानुसार वागण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे, असं नेहरू म्हणाले होते... `जन गण मन` लिहिणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनीही स्वातंत्र्याच्या नंदनवनाचं स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नातल्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात `देश सदैव जागा राहो`, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती... माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि भारतीयांना दाखवलंही... तर अशी ही देशविकासाची स्वप्नं... आम्हीही अशी स्वप्नं पाहतो... पण, सकाळ झाली की, ती विरून जातात... स्वप्नं पडायची असतील, तर त्यासाठी गाढ झोपलं पाहिजे.... पण, असं सुखानं कोण झोपू देतं ? आता तर न्यूज चॅनेल्सनी सगळ्यांची  अक्षरशः झोपच उडवून टाकली आहे... त्याच्यावर तोडगा म्हणून आता सगळे न्यूज चॅनेल्स हे मनोरंजन वाहिन्या म्हणून घोषित करा, अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे. म्हणजे कसं, जसा सासू सुनांचा डेली सोप, तसाच चोवीस तास बातम्यांचा रिऍलिटी (वास्तव की अवास्तव ?) शो..! घटनाकारांनी प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं, त्यावेळी त्यांनाही या मूलभूत हक्कांचा भविष्यात असा वापर होईल, असं वाटलं नसेल... किंबहुना त्यांना स्वप्नातही असं वाटलं नसेल...

तर देशभक्तीच्या गाण्यांनी आम्ही नुसतेच जागे झालो नाही तर स्वप्नातून वास्तवातही आलो. वर्तमानपत्रांतून छापून आलेलं कालचं वर्तमान वाचत वाचत आपण खरेच `लोकसत्ता`क झाल्याच्या अभिमानानं ऊर भरून आला. अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मरणोत्तर जाहीर झालेले बहुमान, पद्म पुरस्कारांची भलीमोठी यादी, त्या यादीतून बिटविन दी लाईन्स व्यक्त होणारे कुणाकुणाचे हितसंबंध... प्रजासत्ताक चिरायु होवो, असं म्हणत स्वतःचं मार्केटिंग करणा-या पान पान जाहिराती... देश मोठा की, ब्रँड असा भ्रम कुणालाही होईल, अशा या जाहिराती... इतक्या जाहिराती मिळाल्यानंतर कोणताही वृत्तपत्र मालक एखाद दिवस आपल्या कर्मचा-यांना सहजपणे सुटी देऊ शकतो नाही का... २६ जानेवारीची सुटी असल्याने उद्याचा अंक प्रकाशित होणार नाही, ही चौकट म्हणूनच पान एकच्या उपसंपादकानं समाधानानं पानात लावली असेल... तेव्हा समस्त वृतपत्रसृष्टीचा प्रजासत्ताक आनंदात साजरा होणार असं मनात म्हणत आमची स्वारी तयार झाली. आम्ही प्रिंटचे पत्रकार नसल्यानं आम्हाला कुठली प्रजासत्ताकाची सुट्टी आणि कसलं काय ?

एकूणच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन राष्ट्रीय सणांचा थाटच काही और असतो. चौकाचौकातून देशभक्तीची गाणी, रांगोळ्या, ठिकठिकाणी शहिदांच्या आठवणी जागवणारे कार्यक्रम, परिटघडीच्या गणवेशात नटूनथटून शाळेला निघालेली भारताची उद्याची पिढी... शाळांच्या मैदानावर होणारे संचलन... देशप्रेमाचं भरतं यावं, असं हे वातावरण... नसानसांतून मग रक्त उसळू लागतं.. देशासाठी काहीतरी करावं, असं वाटू लागतं.... देशासाठी आपण देणं लागतो, असे भलेथोर विचार मनात येऊ लागतात... पण, दिवस संपला की, हे विचारही कुठल्या कुठे पसार होतात... भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली प्रतिज्ञा विस्मरणात जाते... `मला काय त्याचे ?`  ही भावना बळावते. लोकलमधून जाताना प्रजासत्ताक भारताचं खरंखुरं वास्तव स्टेशनगणिक समोर येतं. पण, त्यावर काही व्यक्त होण्याइतकी संवेदना आमच्यात कुठे राहिलीय? जी अवस्था मुंबईची, तीच किंबहुना त्याहीपेक्षा दयनीय अवस्था ग्रामीण भारताची आहे. स्वतंत्र, सक्षम, बलशाली भारताचं स्वप्न लोडशेडिंगच्या अंधारात हरवून गेलीयत... एका बाजूला मोठमोठे फूड फेस्टीवल साजरे होतात, तर दुस-या बाजूला अनेकांना एका वेळचं अन्नही पोटभर मिळत नाही. प्रत्येक गोष्ट साजरी करायची सवय लागलेले आपण सो कॉल्ड पांढरपेशे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवसही त्याच पद्धतीनं साजरे करतो आहोत... असे भपकेबाज कार्यक्रम करताना प्रजासत्ताक भारताचं हे वास्तव सोयिस्करपणे विसरलं जातंय. साठीत बुद्धी नाठी होते असं म्हणतात.. प्रजासत्ताकाची साठी साजरी करत असताना भारतीयांची बुद्धी नाठी होऊ नये, इतकीच अपेक्षा...   

-          दुर्गेश सोनार (दिनांक २६ जानेवारी २००९)

Friday 16 January, 2009

गौरव ‘हिरव्या जगाचा....!’



ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांची ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी कळली आणि ग्रामीण साहित्याचं हिरवं जग अधिकच बहरून आल्यासारखं वाटलं. त्याचं कारणही तसंच आहे. पंढरपूरसारख्या अर्धशहरी आणि बहुतांशी ग्रामीण चेहरा असणा-या गावातून लिहू लागलेल्या मुलांसाठी डॉ. आनंद यादव हे प्रेरणास्थानच आहेत. माझं नशीबही बलवत्तर आहे. यादव सरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला खूपदा मिळाली. गंमत म्हणजे डॉ. आनंद यादव यांनी प्राध्यापकीला ज्या ठिकाणाहून सुरूवात केली त्या रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजचा (आताचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय) मी विद्यार्थी... मी बारावीत असताना आमच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन डॉ. आनंद यादव यांनी केलं होतं. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम भेटण्याचा योग आला. तोपर्यंत त्यांचं झोंबी हे आत्मकथन वाचलं होतं. शिक्षणाच्या ओढीनं घर सोडून पळून गेलेल्या आनंदाचा डॉ. आनंद यादव कसा होतो, याचं वास्तवदर्शी चित्रण झोंबीत वाचायला मिळतं. त्यामुळेच झोंबी लिहिणा-या या लेखकाला जवळून भेटण्याची उत्सुकता नक्कीच होती. पंढरपुरातले ज्येष्ठ साहित्यिक आणि यादव सरांचे जवळचे स्नेही डॉ. द. ता. भोसले यांनी माझी ओळख करून दिली. कवितेत नव्यानेच काहीतरी करू पाहणा-या माझी यादव सरांनी आस्थेनं केलेली विचारपूस आणि त्याचवेळी लिहित राहा हे सांगताना वडिलकीच्या नात्याने केलेला उपदेश माझ्या अजूनही स्मरणात आहे. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा पंढरपुरात सुरू झाली. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमालाही यादव सर आले होते. त्यावेळी झाली ती दुसरी भेट.. ही भेट आमची ओळख आणखी पक्की करून गेली.

त्यानंतर मी उच्च शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात आलो. त्यावेळी यादव सरांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. यावेळी निमित्त ठरलं प्रतिभा संगम या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचं... सांगलीत प्रतिभा संगम व्हायचं होतं. त्याचा मी निमंत्रक होतो आणि यादव सरांनी उद्घाटक म्हणून यावं हा प्रतिभा संगमच्या संयोजक मंडळींचा आग्रह होता. यादव सरांनी कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. या भेटीत यादव सरांमधला सच्चा माणूस अधिक जवळून अनुभवता आला. मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिलेल्या या लेखकाशी आपण इतकं जवळून बोलतो, हेच माझ्यासाठी खूप कौतुकाचं होतं.

यादव सरांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ पक्की आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरातल्या त्यांच्या घरी आलं की त्याची प्रकर्षानं जाणीव होते. कलानगरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं घर दिसतं. घराला नावही मातीशी नातं सांगणारं.. "भूमी’…! मातीशी नातं सांगणारं, मातीशी नाळ जोडलं गेलेलं आणि मातीतून फुललेलं यादव सरांच्या साहित्याचं हिरवं जग त्यांच्याच लेखनातून अनुभवण्यासारखं आहे. ग्रामीण संस्कृतीतली नेमकी स्पंदनं यादव सरांच्या आधी मराठी साहित्यात अपवादानंच पाहायला मिळतात. १९६० मध्ये एक कवी म्हणून मराठी साहित्यविश्वात यादव सरांनी पाऊल ठेवलं. कदाचित ग्रामीण संवेदना जोरकसपणे मांडण्यासाठी यादव सरांना त्यावेळी कवितेचं साधन जास्त जवळचं वाटलं असेल.. पण, त्यानंतर त्यांचा दुसरा कवितासंग्रह आला तो तब्बल अठरा वर्षांनी...! मळ्याची माती या नावाचा तो कवितासंग्रह होता आणि त्यानंतर १९८९ मध्ये म्हणजे अकरा वर्षांनी मायलेकरं हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. पण, यादव सरांमधल्या कवीपेक्षाही त्यांच्यातला कथाकार आणि ललित लेखक अधिक आश्वासक ठरला. यादव सरांचं वेगळेपण सगळ्यात पहिल्यांदा मराठी वाचकांसमोर आलं ते झोंबी या आत्मकथनामुळे... त्यातली सच्ची शब्दकळा आणि अनुभवांची प्रभावी मांडणी यामुळे वाचकाची पकड झोंबीनं घेतली. १९८७ साली प्रकाशित झालेल्या झोंबीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तो १९९० साली.. राज्य सरकारचाही पुरस्कारही त्यांना मिळाला.

झोंबीचाच पुढचा भाग म्हणून लोकांसमोर आलेल्या 'नांगरणी' या आत्मकथनालाही वाचकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर घरभिंती (१९९२) आणि काचवेल (१९९७) ही दोन आत्मकथनंही यथावकाश प्रसिद्ध झाली. या सगळ्या आत्मकथनांचं सामायिक वैशिष्ट्य सांगायचं तर त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा येत नाही की दुःखाचं भांडवल करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसत नाही. यादव सरांच्या आधीही आणि नंतरही अनेकांनी आत्मकथनं लिहिली आहेत. पण, त्यापैकी अनेकांच्या लेखनांत आत्मप्रौढी, दुःख, संघर्ष यांचं भांडवल करण्याचाच प्रयत्न अधिक दिसून येतो. याच काळात दलित आत्मकथनंही गाजत होती. दलितांच्या वेदना, त्यांच्या वाट्याला आलेली दुःखं, डावललेपणाची भावना, या सगळ्यांचं प्रतिबिंब तत्कालीन दलित साहित्यात उमटत होतं. पण, तरीही त्याचा परिघ हा मर्यादितच होता. त्यात सर्वंकष ग्रामसंस्कृतीचा अभाव होता. ही उणीव यादव सरांच्या लेखनानं भरून काढली. गोतावळा, एकलकोंडा या सारख्या कादंब-यातूनही याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. खळाळ, माळावरची मैना, डवरणी उखडलेली झाडे, झाडवाटा, उगवती मने या त्यांच्या कथासंग्रहांच्या नावातूनही त्यांची ग्रामसंस्कृतीविषयी असलेली आपुलकी आणि निष्ठा दिसून येते.

अगदी अलिकडच्या काळात त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची जीवनचरित्रं वेगळ्या परिप्रेक्ष्यात मांडण्याचाही प्रयत्न केलाय. लोकसखा ज्ञानेश्वर (२००५) आणि संतसूर्य तुकाराम (२००८) या चरित्रात्मक कादंब-यातूनही त्यांनी ग्रामसंस्कृतीचे उत्तम दाखले दिलेयत. कथा, कादंबरी, कविता आणि ललित या साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये सहजतेने मुशाफिरी करणा-या यादव सरांना आता महाबळेश्वरमध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळणं म्हणजे ग्रामीण साहित्य संस्कृतीचाच गौरव आहे. यादव सरांच्या लेखणीने ग्रामीण साहित्याची केलेली नांगरणी इतकी पक्की आहे की त्यातून उगवत्या मनांचा गोतावळा दिवसेंदिवस वाढत जाईल आणि मातीखालच्या मातीत दडलेलं आम्हा नवोदितांचं हिरवं जग सर्वांसाठी बहरून येईल, हे निःसंशय...!   

-          दुर्गेश सोनार (दिनांक – १६ जानेवारी २००९)      

 

Tuesday 13 January, 2009

‘यंगिस्तान’ खरंच आहे ?

तुमच्या देशातील तरूणांच्या ओठी कोणती गाणी आहेत, ते सांगा मग मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो, हे कुण्या एका विचारवंतांचं वाक्य अनेकदा सांगितलं जातं.  खरंच असं असेल तर आपल्या देशाचं भविष्य काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी... पण, इतकाही निराशेचा सूर मी लावणार नाही. मुळात तरूण कुणाला म्हणायचं याची नेमकी व्याख्याच करता येणार नाही. नाही म्हणायला शारीरिक वयाचा आधार घेत तरूणाची व्याख्या करता येईलही, पण तरीही तरूण कुणाला म्हणायचं याचं नेमकं उत्तर मिळत नाही. हभप बाबामहाराज सातारकर यांनी त्यांच्या एका प्रवचनात तरूणाची व्याख्या सांगायचा प्रयत्न केलाय. ज्याच्यात तरून जाण्याचं सामर्थ्य असतं तो म्हणजे तरूण... आध्यात्मिक पातळीवर विचार केल्यास ही व्याख्या पटू शकते. पण एक प्रश्न त्यातून समोर येतो, तो म्हणजे खरंच आजच्या तरूणांमध्ये असं तरून जाण्याचं सामर्थ्य आहे का ? आजच्या तरूणांपुढे कितीतरी आव्हानं आहेत. त्यांच्या वयाला न पेलणारा मानसिक आणि शारीरिक ताण त्यांना सोसावा लागतो. या सगळ्या जिवघेण्या स्पर्धेत स्वतः.चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजची तरूण पिढी संघर्ष करतेय. या संघर्षातून तरून जाणं किती तरूणांना जमतं ?  अनेकदा त्यातून तरूणांमध्ये वैफल्यच वाढीला लागतं. ताण असह्य झाला की त्यावर मात करण्यासाठी तरूण पिढी वेगळे मार्ग शोधू लागते. ब-याचदा हे मार्ग चुकीचे असतात. त्यामुळेच तरूण पिढी टीकेचं लक्ष्य ठरते.

मध्यंतरी पेप्सीची एक जाहिरात कमालीची लोकप्रिय झाली. यंगिस्तानची कल्पना मांडणारी ही जाहिरात त्यातल्या नावीन्यामुळेच अधिक लक्षात राहिली. आपल्या देशातल्या या यंगिस्तानकडे आपण किती गांभीर्यानं पाहतो ? ही तरूण शक्ती किती उपयोगात आणली जाते ? यंगिस्तानमधल्या तरुणांची काही मतं आहेत, त्यांच्याही काहीतरी समस्या आहेत. पण, त्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला ?  देशाच्या स्वातंत्र्याला आता साठ वर्षँ उलटून गेली तरी देशाचं युवा धोरण ठरलेलं नाही. एका पाहणीनुसार २०२० मध्ये भारतात युवकांची सर्वाधिक संख्या असेल. त्या अर्थी भारत ख-या अर्थानं यंगिस्तान असेल. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारताला २०२० पर्यंत महासत्ता करण्याचं स्वप्न पाहिलं पण, ते सत्यात आणण्यासाठी यंगिस्तानमधली ताकद जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष होतंय. आजचा तरूण गुरफटलाय तो अस्तित्वाच्या लढाईत... शाळा कॉलेज संपलं की त्याला करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याची धावपळ सुरू होते. यातून तो इतरांना काय स्वतःलाही वेळ देऊ शकत नाही.

आपल्या देशाच्या राजकारणात तरूणांचा सहभाग कितपत आहे ? तर तो अगदी नगण्य आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक सहभाग त्या काळातल्या तरूणांचाच होता. भगत सिंग, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळे क्रांतिकारक घडले ते त्यांच्यातल्या तरूण रक्तामुळेच... हे तरूण रक्त आज का उसळत नाही ?  एखाद्या अन्यायाविरोधात ही तरूण पिढी संघटीत का होत नाही ? हल्लीची परिस्थितीच अशी आहे की, माणसं चिडतात, माणसं बंड करतात, तेही मनातल्या मनात....! उघडपणे बंड करण्याची प्रवृत्ती रक्तातूनच हद्दपार झालीय. हल्ली बंड होतात ते राजकीय हेतूनं.. एखादं पद पदरात पाडून घेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी... असे बंड करणारे असतात राजकारणात मुरलेले, वय झालेले पुढारी... आपल्याकडे पंतप्रधानच असतो सत्तरी ओलांडला... सगळ्या राजकारण्यांच्या वयाची सरासरी काढली तर ती पंचावन्न असल्याचं आढळेल. जे वय सेवानिवृत्तीचं असतं, त्या वयात हे राजकारणी सत्तेचा सारीपाट खेळत असतात. इथेच तरूणांनी सक्रिय होण्याची गरज आहे. अमेरिकेत बराक ओबामा सारखा तरूण उमदा नेता राष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो, तर ते भारतात का शक्य होत नाही ? ओबामांनी म्हटल्याप्रमाणे भारतालाही बदलाची गरज आहे. CHANGE WE NEED हे जसं ओबामांच्या यशाचं गमक ठरलं तेच भारतातल्या यंगिस्तानच्या यशाचंही ठरावं, हीच अपेक्षा.       

-          दुर्गेश सोनार 

Tuesday 6 January, 2009

ते दिवस आता कुठे ?

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. आजचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना या विधानाची आठवण येणं स्वाभाविकच आहे. हा चौथा स्तंभ  नेमक्या कोणत्या स्थितीत आहे, त्याची अवस्था काय आहे, खरंच असा स्तंभ वगैरे  अस्तित्वात आहे का ? असे अनेक प्रश्न मनात रूंजी घालतायत. बाळशास्त्री  जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी वृत्तपत्रांची मुहूर्तमेढ रोवली, त्याला  आता पावणे दोनशे वर्षं उलटून गेलीयत. या पावणे दोन वर्षांत बरीच स्थित्यंतर होऊन गेली, वर्तमानपत्रांची ध्येयधोरणं बदलली, तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि  जागतिकीकरणाच्या काळात न्यूज चॅनेल्सचीही चलती सुरू झाली. त्यामुळे एकेकाळचा  पत्रकार आता दूरचित्रवाणी पत्रकार झाला.

एक काळ असा होता की, पत्रकार म्हटलं की, दाढीची खुटं वाढलेली, शबनम बॅग  खांद्यावर अडकवलेली असं चित्र डोळ्यासमोर यायचं... कथा कादंब-या आणि चित्रपटांतूनही  असंच चित्र रंगवलं जायचं.. आता परिस्थिती बदललीय. न्यूज चॅनेल्समुळे पत्रकारितेला  आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस आले. त्याचा थोडा का होईना पण वर्तमानपत्रांवरही  परिणाम झाला. चॅनेल्सची चित्रमयता वर्तमानपत्रांतूनही रिफ्लेक्ट होऊ लागली.  अधिकाधिक आकर्षक छायाचित्रं छापून वाचकांना आकृष्ट करण्यात जवळपास प्रत्येक  वर्तमानपत्राची चढाओढ सुरू आहे. पूर्वी फक्त रविवारची पुरवणी सप्तरंगात असायची, आता  रोजचा अंकच कलरफुल करावा लागतो, याचं कारणच चॅनेल्सबरोबर असलेली स्पर्धा हे आहे.

जेव्हा लिपीचा, मुद्रणतंत्राचा शोध लागला नव्हता, तेव्हा माणूस श्रोता होता. त्यानंतरच्या काळात भाषेचा विकास झाला. लिपीचा शोध लागला, त्याला जोड म्हणून  मुद्रणतंत्रही विकसित झालं आणि माणूस श्रोत्याचा वाचक झाला. आता चॅनेल्स, इंटरनेटच्या भडीमारात माणूस आता वाचकापेक्षाही प्रेक्षकच अधिक झाला. आपल्याला  जास्त पाहायला आवडतं. त्यामुळेच की काय वाचन कमी झालंय, अशी ओरड केली जाते. असो,  कालाय तस्मै नमः दुसरं काय...!

पत्रकारितेचं मला तसं लहानपणापासूनच वेड... माझं बालपण पंढरपुरात गेलं.  आमच्याकडे तेव्हा महाराष्ट्र टाइम्स यायचा... मुंबईवरून प्रसिद्ध होणारं हे  वर्तमानपत्र पंढरपुरात दुपारी यायचं.. त्याचं मला भारी आकर्षण होतं. त्यातूनच पुढे  पाचवीत असताना हस्तलिखीत काढण्याची बुद्धी झाली. त्याला नावही ठेवलं पंढरपूर  टाइम्स...(मटा इफेक्ट)... पत्रकारितेत करिअर करायचं तेव्हा ठरवलं.. आमच्या बाबांना त्याचं अप्रूप वाटलं...पण, त्याचवेळी थोडी काळजीही वाटली. कारण पंढरपुरात  पत्रकारांचं रेप्युटेशन फार चांगलं नव्हतं. पंढरपुरात गल्लीमाजी साप्ताहिकं आणि  त्यांचे कितीतरी पत्रकार... हे पत्रकार चहाभजी मिळाली की खूश... त्यामुळे आपल्या  चिरंजिवानं चहाभजीचा पत्रकार होऊ नये, असं कोणत्याही बापाला वाटणार.... तरीही  बाबांनी प्रोत्साहन दिलं. शाळेतही त्याचं कौतुक झालं आणि मी ते हस्तलिखित तब्बल  पाच वर्षं म्हणजे माझ्या दहावीपर्यंत नियमितपणे काढलं. त्यावेळी सोलापुरातल्या  दैनिकांतून माझ्याविषयीचं कौतुक वगैरे करणारे लेखही छापून आले होते. तर बाळाचे पाय  पाळण्यात दिसतात ते असे... आणि इसवीसन २००० मध्ये अस्मादिकांनी पत्रकारितेचं औपचारिक पदव्युत्तर पदवी शिक्षण पुण्यात घेतलं. तर आमच्या पत्रकार होण्यावर  शिक्कामोर्तब झालं ते असं...

आता सात आठ वर्षं उलटल्यानंतर पत्रकारिता करताना त्याबद्दल कळकळ वाटणं, त्याचे  प्लस मायनस जाणवणं हे स्वाभाविक आहे. आणि ते व्यक्त करायला पत्रकार दिनाशिवाय  दुसरा चांगला मुहूर्त तरी कुठला असू शकतो ? आता वर्तमानपत्रांची पानं  ग्लॉसी, चकचकीत कलरफुल होतायत, अत्याधुनिक छपाईतंत्रामुळे त्यात आणखी आकर्षकताही  आलीय. पण, पत्रकारितेच्या मूळ उद्देशाचं काय ? आपणच निर्माण केलेल्या या स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी इतकं उथळ खरंच व्हायचं का ? मॅगीच्या जाहिरातीसारखा इन्स्टन्ट मजकूर आणि तोही कोणताही संदर्भ माहिती  नसताना देणं आपल्या बुद्धीला कितपत पटतं ? आज चॅनेल्समध्ये काम करताना  उघड्या डोळ्यानं नीट बघून हे वास्तव पाहिलं की दिव्याखाली अंधार कसा आहे, ते लगेच  कळतं... कुणाला सिंकदरासारखं जग जिंकायचंय, तर कुणाला खास बातम्यांचा अखंड रतीब  चोवीस तास घालायचाय... सह्याद्रीच्या कुशीत बाळसं धरणारे हे चॅनेलु हिंदीच्या  प्रवाहात आपले स्टार किती काळ चांगले ठेवू शकणार ? म-हाटमोळ्या प्रेक्षकांची  नाळ ओळखणं हे इतकं झी नाही हे आपल्याला कधी कळणार ? हिंदी वृत्तवाहिन्यांबाबत तर शहाण्यानं न बोलणंच बरं... मराठीवरही याच हिंदी  चॅनेलबाबूंचा प्रभाव आहे. हिंदीच्याच मांडवाखालून गेलेलेच या मराठी चॅनेलांचे  प्रमुख म्हणून काम करतायत. त्यामुळे मराठी हिंदीचा फ्लेवर येणारच... त्याच्यामुळेच तर प्रेक्षकाचा दर्शक होतो, शक्यतेची संभावना होते, कशाचं विशेषण कशाला वापरतात  हेच कळेनासं होतं. प्रेक्षकांना नीट डोळे उघडून बघायला सांगणा-या वाहिनीवरती  त्यांचे एक थोर बातमीदार शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीबद्दल थेट वार्तांकन  करत होते. त्यावेळी त्यांना बहुधा कोणते विशेषण वापरावे याचे भानच राहिले नसावे,  ते महाशय बोलून गेले, आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन टोलेजंग  नेत्यांची भेट झाली... आता बोला...! तर ही अवस्था सध्याच्या मराठी चॅनेलविश्वाची... मराठी पत्रविश्वातलं हे तिमिर दूर व्हावं, आणि आपलं ख-याखु-या वास्तवाचं प्रतिबिंब समस्त पत्रकारांच्या दर्पणात उमटावं, एवढंच विश्वात्मक पसायदान आजच्या पत्रकार दिनानिमित्त माऊलींकडे मागायचंय...  

-          दुर्गेश सोनार

Thursday 1 January, 2009

वर्षाचा पहिला दिवस...

चला, अखेर नवं वर्ष आज सुरू झालं. थर्टी फर्स्टचा हँगओव्हर संपून दिवसाची सुरूवात व्हायला अंमळ उशीर होणारच नां... हल्ली सेलिब्रेशनचा फेसाळता रंग रात्री उशिरापर्यंत चढत असतो. त्यामुळे नव्या दिवसाचा सूर्य उगवायला वेळ लागणारच नां... माझाही सूर्य आज थोडासा (?) उशिराच उगवला. नवं वर्ष सुरू झाल्याची जाणीव करून देणारं नवं कोरं कॅलेंडर भिंतीवर टांगलं. सरत्या वर्षाचं कॅलेंडर तितक्याच तत्परतेनं काढूनही टाकलं. खरंच किती सोपं असतं नां, जुनं कॅलेंडर बाजूला ठेवणं.... पण, गेलेल्या दिवसांतल्या आठवणी इतक्या सहजपणे बाजूला ठेवता येत नाहीत. गेल्या वर्षभरातलेच नव्हे तर भूतकाळातले भलेबुरे सारेच क्षण आपल्या मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात रुंजी घालत राहतात. ते आपण एकांताच्या क्षणी आठवत राहतो, हळुवार स्मृतींना कुरवाळत राहतो. माणसाला भूतकाळात रमायला तसं खूपच आवडतं. म्हणूनच तर आमच्या लहानपणी आम्ही काय मज्जा करायचो म्हणून सांगू….’  या सारखी वाक्यं सहजपणे ऐकायला मिळतात. आमच्या काळी असं नव्हतं बुवा….’ असं खास पुणेरी शैलीतलं वाक्यही हमखास कानावर येतं. ही सगळी वाक्य आपल्या नॉस्टॅलजिक प्रवृत्तीची साक्ष देत असतात.

आपण जितके भूतकाळात रमत असतो नां तितकंच आपल्याला भविष्याची स्वप्न पाहायलाही आवडत असतं. भविष्यात आपल्याला हे करायचंय, भविष्यात आपल्याला ते करायचंय, असं आपण मनोमन ठरवत असतो. आपापल्या परिनं त्याचं प्लॅनिंगही करत असतो. त्यामुळेच तर मोठ्यापणी मला अमुक एक व्हायचंय… असं बालपणीच छातीठोकपणे आपण सांगत असतो. घर बांधणं, गाडी घेणं, या सारखी भौतिक आणि आताच्या काळात अत्यावश्यक ठरलेली सारी सुखं मिळावीत, यासाठीही आपण स्वप्नं पाहत असतो. याच आपल्या स्वप्नांचं भांडवल जाहिरातीतून केलं जातं. भविष्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटत आलंय, म्हणूनच तर वर्तमानपत्रातल्या राशिभविष्याला प्रतिसाद मिळतो, ज्योतिषांकडे रांगा लागतात. ज्योतिषानं सांगितलेलं भविष्य खरं ठरो किंवा न ठरो, आपल्याला त्यानं सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवायला आवडत असतं. त्यानुसार स्वप्नंही आपण पाहत असतो.

एकूणच काय तर भूतकाळात जितके आपण रमतो, तितकेच भविष्यातही मश्गुल होतो. या सगळ्यामध्ये आपण नेमका वर्तमान विसरतो. आज काय आहे, आज काय होणार आहे, आज आपल्याला काय करायचं आहे, याच्याकडेच नेमकं आपलं दुर्लक्ष होतं. ज्या वर्तमानाच्या पायावर आपली भविष्याची भक्कम भिंत उभी राहणार आहे, त्या वर्तमानाच्याच बाबतीत आपण असे उदासीन का बरे होतो ? भूतकाळातलं संचित, आधीच्या अनुभवांची शिदोरी आपल्याला आपला आज घडवण्यासाठी उपयोगी असते. त्या शिदोरीच्या जोरावर वर्तमान घडवता येतो आणि एकदा का वर्तमान घडला की, भविष्यकाळही आपोआपच उज्ज्वल होऊन जातो. भूतकाळ आणि भविष्यकाळाला सांधणारा वर्तमानकाळ म्हणून तर महत्त्वाचा ठरतो. एखाद्याकडे आज सत्ता असेल, पण, ती त्याला भविष्यातही टिकवायची असेल तर त्याला वर्तमानावर प्रभुत्व गाजवावंच लागेल, यात शंका नाही.

एवढं तत्वज्ञान आज आठवण्याचं कारण म्हणजे आज सुरू झालेलं नवं वर्ष... नव्या वर्षात ठरवलेले संकल्प सिद्धीस नेण्याची नैतिक जबाबदारी झटकता येणार नाही... जे संकल्प सोडले आहेत, ते तडीस न्यायचे असतील तर मलाही वर्तमानावर प्रभुत्व गाजवावंच लागेल...! जितक्या सहजतेने सरत्या वर्षाचं कॅलेंडर बाजूला ठेवलं तितक्या सहजतेने भूतकाळ बाजूला सारता येणार नाही आणि कॅलेंडरकडे पाहत पुढच्या दिवसांचं प्लॅनिंग करणंही तितकं सहजसोपं नाही. 

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे खूप सारे एसएमएस, ई मेल्स येतायत. लोक भरभरून शुभेच्छा देतायत. त्यातल्या ब-याच फॉरवर्डेडही असतील, पण तरी त्यामागची त्यांची भावना आपल्या वर्तमानातल्या आणि पर्यायाने भविष्यातल्या वाटचालीला प्रोत्साहन देणारीच असेल. त्यातलाच एक एसएमएस मला खूप भावला. त्यात म्हटलंय – ‘The race is not over, because I have not won yet….!’ त्यामुळेच आपण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपणार नाही, हा दुर्दम्य आशावाद बाळगून नव्या वर्षाची सुरूवात करायला हरकत नाही....   

-          दुर्गेश सोनार