Tuesday 14 July 2009
दिवस 'प्रतिभा संगम'चे...
अंमळनेरचं ते पहिलं प्रतिभा संगम आज तेरा वर्षांनंतरही माझ्या मनात अगदी तस्संच्या तस्सं ताजं आहे. राज्यभरातनं किमान सातशे ते आठशे विद्यार्थी साहित्यिक अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले होते. मराठी साहित्यविश्वातले हे इतके ताजेतवाने अंकुर पहिल्यांदाच एके ठिकाणी एकत्र येणं, मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांना भरभरून मार्गदर्शन करणं... हा सगळा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षं झाल्याचं औचित्य या सगळ्या खटाटोपामागे होतं. अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अभिजात साहित्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर हे सगळ्या युवा साहित्यिकांचे मूळ प्रेरणास्रोत... प्राचार्य राम शेवाळकर यांचं ओघवत्या शैलीतलं उद्घाटनाचं भाषण ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कवी प्रवीण दवणे यांनी ' कविता फुलते कशी ? ' यावर घेतलेली प्रकट मुलाखत, गटागटातून रंगलेल्या विद्यार्थी साहित्यिकांच्या चर्चा, असं सगळं पोषक खत मिळत गेलं आणि माझ्यासारखे कितीतरी त्या वेळेसचे विद्यार्थी साहित्यिक रुजत गेले.
याच प्रतिभा संगममधून अशोक जेधे सारखा हळवा, भावूक कविमित्र भेटला, 'येगं येगं इंद्रायणी' ही अशोकची त्यावेळची कविता अजूनही मनात तशीच आहे, वहीमध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं नां अगदी तशी... आता अशोक नाहीये पण, त्याची ती कविता कायम स्मरणात आहे. नाशिकचा मंदार भारदे, नंदुरबारची निकीता असोदेकर, पुणे जिल्ह्यातला संतोष शेंडकर, लासलगावचा ऐश्वर्य पाटेकर या सारखे अनेक लिहिते हात ओळखीचे झाले. तर प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्या सारखी साहित्यावर प्रेम करणारी आणि नव्या अंकुरांना जोपासणारी माणसं आपली झाली. त्यांच्याशी मैत्र जिवांचं जोडलं गेलं. एवढंच नाही तर ज्यांना फक्त दिवाळी अंकांतून, कवितासंग्रहांतून, पुस्तकांतून भेटता आलं होतं अशा मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अरूणा ढेरे, भानू काळे या सारख्या साहित्यिकांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला. यातून साहित्यविषयक जाणिवांचं क्षितीज विस्तारलं आणि लेखनाच्या आशाही उंचावत गेल्या. प्रतिभा संगमनं ग्रामीण भागातल्या कित्येक विद्यार्थी साहित्यिकांना लिहितं केलं, त्यांना विहरण्यासाठी पंखांत बळ दिलं. प्रतिभा संगमनं धारण केलेलं 'विस्तारणारी क्षितिजं... उंचावणाऱ्या आशा' हे ब्रीद त्यामुळेच तर सार्थ ठरतं. अंमळनेरच्या प्रतिभा संगम नंतर झालेल्या रत्नागिरीतल्या दुसऱ्या प्रतिभा संगममध्ये आणखी संधी मिळाली आणि एका वेगळ्या साहित्यिक चळवळीत सक्रिय होता आलं.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेला पूर्ण होत असलेली साठ वर्षं... प्रतिभा संगम सारखं व्यासपीठ अभाविपनं निर्माण केलं नसतं तर कदाचित माझा अभाविपशी संबंध आलाच नसता आणि माझे साहित्यिक अनुबंध जुळले नसते. ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही अभाविपची त्रिसूत्री... स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान... चारित्र्यवान तरूण घडला तरच राष्ट्र घडेल, याची खूणगाठ बांधून ही संघटना काम करतेय. संघाच्या मुशीतून साकारलेल्या अभाविप बद्दल काही जणांना ऍलर्जी आहे. असेल तर असोत बापुडी... पण, एखादी संघटना गेली साठ वर्षं सातत्यानं काही ना काही विधायक उपक्रम राबवत असेल तर, त्यांच्या प्रयत्नांत खिळ घालण्यापेक्षा त्यांना बळ देणं हे केव्हाही चांगलं, नाही का ?
- दुर्गेश सोनार ( ९ जुलै २००९ )
Tuesday 23 June 2009
आषाढस्य प्रथम दिवसे....
निळ्या वावरात दिंड्या
आल्या वाजवित टाळ
गर्जे आखाडी आभाळ
गर्जे आखाडी आभाळ...!
गडगडाट तो मृदुंग
विज प्रकाशे लकाका
माऊलीच्या पालखीची
जशी झळके पताका...!
आषाढसरींमध्ये माऊलींचा पालखी सोहळा अनुभवणं ही बातच काही और आहे... वैष्णवांचा देव असलेला विष्णूही निळा आणि आषाढात बरसणारा पाऊसही निळा... विठूमाऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगांचा गजर आणि त्याच्या जोडीला आषाढात गर्जणाऱ्या मेघांचा मल्हार... एका बाजूला उधाण वाऱ्यानं धरलेला फेर, तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांनी धरलेलं रिंगण.... पंढरीच्या दिशेनं पावलं चालत राहतात, भगव्या पताक्यांनी निळं आभाळ भरून जातं.. रंगांमधल्या समरसतेची प्रचिती देणारा हा आषाढ आणि त्याची साक्षात अनुभूती देणारा आषाढी वारीचा सोहळा.... नारायण सुमंतांसारख्या पंढरपूर परिसरातूनच लिहिता झालेल्या कवीला हे आषाढपण भावलं नाही तरच नवल.. सुमंत त्यांच्या आणखी एका कवितेत लिहितात...
थेंब आभाळी ना येतो
पूर भीमेसी ना येतो
तोच पंढरीचा काळा
माझ्या घामामंदी न्हातो...
अवघी सृष्टी पंढरी झाल्याचा हा दिव्य अनुभव... सुमंतांची ही काव्यानुभूती थेट संत सावता माळ्याशी नाळ जोडणारी आहे. `कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी`, असं म्हणणारे सावता माळी हेदेखील त्या अर्थी निसर्गकवीच म्हटले पाहिजेत... निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ आषाढात प्रकर्षानं प्रत्ययाला येतो. उन्हानं रापलेल्या काळ्या मातीला हिरवी झळाळी मिळते ती आषाढात... पुंडलिकाला भेटण्यासाठी जसा परब्रह्म आला तसाच पाऊसही धरेला भेटतो... जसा विठूमाऊलीचा अभंग आषाढात बहरतो, तसंच, धरेच्या ओटीपोटातून सृजनाचं हिरवं गाणं अंकुरतं.. शिवाराची वाटही मग पंढरीची वाटू लागते. नांगरणी झालेलं शिवार पेरतं होतं. पाटाच्या पाण्यात आषाढसरींचे थेंब असे मिसळतात की जशी चंद्रभागाच शिवारातून खळाळतं जाते... आषाढसरींचा हा सोहळा पदोपदी विठूरायाची आठवण करून देतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मग माहेराची सय ताजी होते...
- दुर्गेश सोनार ( २३ जून २००९ )
Thursday 23 April 2009
...... उथळाचे श्रम वाया जाय !
बऱ्याच दिवसांनी आज लिहितोय. याचा अर्थ लिहिण्यासाठी अजिबात विषयच नव्हते, असा मुळीच नव्हे... थोडासा कंटाळा, काहीसा कामाचा ताण यामुळे लिहिण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. आता यावर तुम्ही म्हणाल आवड असली की सवड नक्की मिळते. हे शंभर टक्के मान्य आहे. पण, तशी वस्तुस्थिती प्रत्येक वेळी असतेच असं नाही. विषय कितीही डोक्यात घोळत असले तरी त्याला कागदावर मूर्त रुप देण्यासाठी काही तरी वेळ द्यायलाच हवा नां...! मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं...? त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, त्याची नांगरणी करावी लागते, थोडं खतपाणी करावं लागतं, आणि एवढं सगळं झालं की, ते बियाणं जोमानं उगवून यावं यासाठी सर्जनाचा पाऊस यावा लागतो. तर आणि तरच ते बियाणं जोरकसपणे उगवून येऊ शकतं... संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं – खोल ओली पडे ते पिक उत्तम उथळाचे श्रम वाया जाय... ज्या पिकाची खोली उत्तम आहे, तेच पिक सकस उत्तम असतं... वर वर असलेलं उथळ असलेलं पिक वादळवाऱ्यात तग धरू शकत नाही. आणि हल्ली तर आजूबाजूला अशी वरवरची झुडुपं मोठ्या डौलात बहरताना दिसतात.. ही झुडुपं म्हणजेच खरेखुरे वटवृक्ष आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जाते. आपल्यालाही हेच मृगजळ खरे वाटायला लागते. ज्याच्याकडे मायेची सावली मागायला जावं, ते डेरेदार वृक्ष नाहीत तर फुटकळ झुडपं आहेत, हे समजेपर्यंत आपण परिस्थितीच्या उन्हात अगदी करपून गेलेले असतो. मोठी सावली देण्याचा आव आणणारी ही तथाकथित झाडं खरं तर बोन्सायच असतात. विशिष्ट विचारधारेला कवटाळून बसत आपल्याला सोयीचे तत्वज्ञान जगाला सांगणारी ही झाडं खुंटलेलीच असतात. त्यांची वाढ विशिष्ट चौकटीच्या पलिकडे होऊच शकत नाही. कारण अगदी स्पष्ट असतं. त्यांच्या मुळाशी एका विशिष्ट विचारधारेच्या तारेनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि एकदा का ही विचारांची चौकट घट्ट पक्की झाली की, मग प्रत्येक प्रसंगाकडे हे लोक त्याच चौकटीच्या परिमाणातून पाहू लागतात. नदीच्या एकाच काठावर बसून ही मंडळी नदीच्या संपूर्ण भोवतालाचा अंदाज बांधू लागतात. त्यासाठी नदीच्या दुसऱ्या काठावर पण काही तरी आहे, तिथेही काही भोवताल आहे, हेच मुळी ते विसरून जातात. असो, तर अशी ही परिस्थिती असताना, लिहिण्यासाठी अजिबातच विषय नाही असे होणंच शक्य नाही... पण, लिहिण्यासाठी आवश्यक असणारी अंतःप्रेरणा जागृत करणारी परिस्थिती आजूबाजूला असते का, हे पाहावं लागतं. तरच नवं काही तरी लिहिलं जाऊ शकतं... अगदीच निराश व्हावं असं वातावरण असलं तरी त्यातही काही आश्वासक सूर आहेतच. ते गाते राहावेत, ते जुळून यावेत, यासाठी तरी आपले हात लिहिते राहावेत, नाही का ?
- दुर्गेश सोनार
Tuesday 24 February 2009
शंख, मासा आणि सोमनाथदांचा वैताग...!
भाजपनं यंदा लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवायचंच असा चंग बांधलाय. त्यासाठी मुंबईत अडवाणींचा जाहीर सत्कार झाला. अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधीही त्यांना देण्यात आला. पण, यात एक गंमत झाली. हा परिस्थितीजन्य विनोद म्हणा किंवा नियतीनं दिलेले संकेत म्हणा... काहीही म्हणा, पण, या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी यांचे शंख वाजवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एरवी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात शंख करण्यात अडवाणींचा हात कुणी धरत नाही. पण, खरोखरचा शंख वाजवायची जेव्हा वेळ आली तेव्हा अडवाणी यांची हवा थोडी कमीच पडली. दोनतीनदा शंख वाजवण्याचा आटापिटा अडवाणींनी केला खरा... पण, शंख अजिबातच वाजत नाही हे लक्षात येताच त्यांनी तो बाजूला केला. त्यामुळेच लाल'कृष्णा’चा शंख न वाजण्याचा झालेला हा (अप)शकुन भाजपला काय फळ देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच... ( पण, म्हणून काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आताच हुरळून जाऊन चालणार नाही. कारण याच सभेत अडवाणींनी आपल्या शब्दांचा शंखनाद चांगलाच केलाय. )
******
निवडणुका आता जवळ आल्यात, हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आपल्या भाषणांमधून, जाहीर सभांमधून त्याचा डंका पिटू लागलेत. या जाहीर सभांमधून होणारी भाषणं मुळातूनच ऐकण्यासारखी असतात. आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना शाब्दिक बाणांनी कसे घायाळ करता येईल, याची हरेक संधी प्रत्येक नेते शोधत असतात. त्यासाठी वाट्टेल त्या उपमा द्यायलाही हे नेते मागेपुढे बघत नाहीत. आता नरेंद्र मोदींचंच उदाहरण घ्या नां... परवा ते गोव्यात गेले होते. तिथल्या एका सभेत त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी हा शोभेचा मासा आहे, अशा शब्दांत मोदींनी त्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसमधले नेते हे संरक्षित वातावरणात मजेत वावरणारे शोभेचे मासे आहेत आणि भाजपमधले नेते म्हणजे महासागरात आव्हानांच्या लाटा झेलणारे मासे आहेत, अशी मत्स्यतुलना मोदींनी केली. गोव्यात आल्यानंतर माशांशिवाय दुसरी कुठली उपमा सुचणार, नाही का ? असो... हे झालं मोदींचं कवित्व... पण, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनाही प्रत्युत्तर देण्याची खुमखुमी आली आणि मोदींच्याच उपमेचा आधार घेत त्यांनी पलटवार केला. मोदी म्हणजे माणसे खाणारा पिरान्हा जातीचा मासा आहे, अशी उलट टीका तिवारीबाबूंनी केली. तर असं हे आरोप प्रत्यारोपांचं मत्स्यपुराण...
******
संसदेचं या टर्ममधलं शेवटचं अधिवेशनही अंतिम टप्प्यात आलंय. या अधिवेशनातही खासदारांनी आपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे खासदारांचे हेडमास्टर असलेले सोमनाथदा चांगलेच वैतागले. ‘अरे, तुम्ही असे वागता, तुम्हाला पुन्हा कुणी निवडून तरी देईल का ?’ असं सोमनाथदांनी खासदारांना बजावलं देखील... पण, पुन्हा हे काही सुधारणार नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खासदारांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देत कानात बोळे घालून घेतले. भारतीय लोकशाही साठीकडे झुकली असतानाच आपल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेलं प्रदर्शन सध्याचं वास्तव सांगायला पुरेसं आहे. मतदार राजा सुजाण आहे, त्याला कोणाला उचलून धरायचं आणि कुणाला उचलून आपटायचं हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच बा, मतदारराजा ! जागा राहा, आणि सत्तांधांना त्यांची जागा दाखव रे बाबा....!
******
- दुर्गेश सोनार ( २४ फेब्रुवारी २००९ )
Thursday 5 February 2009
चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं...!
मोरोपंत सकाळपासूनच अस्वस्थ होते. ज्यांना कधी एकही ओळ धड लिहिता आली नाही, त्यांनी कवितांचे व्याकरण शिकवावे म्हणजे काय ? असा सवाल त्यांच्या मनात घोळत होता. त्याला कारणही तसंच होतं. कवितेसंबंधी नवी मुंबईत कोमसापने भरवलेल्या चर्चासत्रात काही समीक्षकांनी १९७० ते १९९० या कालावधीतल्या कविता या कविताच नाहीत, असा विसंवादी सूर लावून धरला होता. त्याची साद्यंत बातमी वाचून मोरोपंत अस्वस्थ झाले. कविवर्य ग्रेस यांची कविता असेल दुर्बोध, पण म्हणून ती कविताच नाही की काय ? असे म्हणण्याचे धारिष्ट्य हे तथाकथित समीक्षक करूच कसे शकतात ? ज्यांचे आयुष्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर पंचेचाळीस मिनिटांचे पाठ केलेले लेक्चर देण्यात गेले आणि वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम शिकवून ज्यांच्या बुद्धीवर गंज चढला, त्यांना कविता ती कशी आकळावी ? हे परंपरागत चौकटीत अडकलेले आणि एकाच ठिकाणी बसून बसून बौद्धीक बद्धकोष्ठ झालेले समीक्षक छातीठोकपणे सांगतात की, १९७० ते १९९० या काळातल्या कवितेतून सामाजिक अभिव्यक्ती झालीच नाही. या काळातले कवी रोमँटीसिझममध्येच अडकले. असल्या या समीक्षकी बाण्यामुळे मोरोपंत कमालीचे व्यथित झालेले... त्यांनी तडक आपल्या बुकशेल्फातून ग्रेसच्या संध्याकाळच्या कविता काढल्या. एकेक कविता वाचत गेले... ‘शुभ्र अस्थींच्या धुक्यात, खोल दिठींतली वेणा... निळ्या आकाशरेषेत, जळे भगवी वासना... ’, ‘अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले... स्मरणाचा उत्सव जागुन, जणुं दुःख घराला आले.... ’ ‘गुतंवता मिठी, गर्द झाले श्वास, सुजले आकाश पाठीवरी... अशा रंगापाशी, मातीचे चांदणे, अल्याडचे जिणे, जन्माआधी...’ ‘पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सूराने....’ ‘घरांनी आपली दारे बंद केलेली असतात, डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या रांगाही निवून जातात...’ ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, इथे दाट छायांतुनी रंग गळतात, या वृक्षमाळेतले सावळे...’ या आणि या सारख्या कितीतरी कविता मोरोपंत वाचत गेले... एवढी समृद्ध शब्दकळा आणि त्यातून उलगडत जाणारे अर्थांचे अनेकांगी पदर... नित्य नूतन भासिजे... त्याप्रमाणे ग्रेस यांच्या कवितांमधून व्यक्त होत जाणाऱ्या अर्थांच्या लडी... त्यांनी वापरलेले शब्द दुर्बोध आणि बोजड आहेत, हे निःसंशय... पण, म्हणून त्याचा अर्थ माहिती करून घेण्याचा प्रयत्नच न करता, त्यांच्यावर सरसकट कविताच नाहीत त्या फक्त कवितांचा आभास निर्माण करतात, असं म्हणणं म्हणजे शुद्ध वेडगळपणा आहे. असं विधान करणाऱ्या समीक्षकांची मराठीची जाणच मुळातून तपासली पाहिजे. प्रतिमा आणि प्रतिकांमधून व्यक्त होणारी कविची प्रतिभा एखादा समीक्षक नाकारूच कसा शकतो ? बरं ग्रेस यांच्याबाबत बोलणं टाळलं, तरी याच वीस वर्षांत मंगेश पाडगावकरांचा आलेला सलाम या कवितासंग्रह विसरून कसे चालेल ? पाडगावकरांची सलाम ही कविता सामाजिक अभिव्यक्ती करत नाही, त्यात फक्त रोमँटीसिझम आहे, असा निष्कर्ष काढणं कुणाला तरी पटेल का ? एकूणच भाषण म्हणजे नुसता वारा... असा समज त्या बोलघेवड्या समीक्षकांचा असावा... सत्तर ते नव्वदच्या वीस वर्षांत ग्रेस पाडगावकरांबरोबरच वसंत बापट, विंदा करंदीकर ही कवित्रयी फुल फॉर्मातच होती. माझे विद्यापीठमधून कवितेतून सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधणारे नारायण सुर्वे यांचेही ‘सनद’सारखे कवितासंग्रह या काळात प्रकाशित झाले आहेत नां ? सुर्व्यांच्या कविता रोमँटिसिझममध्ये अडकल्या आहेत काय ? त्यांना सामाजिक परिमाण नाही काय ? नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता असेल किंवा यशवंत मनोहरांचा उत्थानगुंफा सारखा कवितासंग्रह असेल... केशव मेश्राम यांच्यासारखे दलित जाणिवांतून लिहिणारे कवीही याच काळात पूर्ण भरात होते. त्यांची संवेदना ही सामाजिक संवेदना नाही काय ? नामदेव ढसाळ यांची गोलपीठामधून व्यक्त होणारी सामाजिक अभिव्यक्ती ही या झापडबंद समीक्षकांना दिसली नाही काय ? विठ्ठल वाघ यांच्याही वृक्षसूक्त, काळ्या मातीत माती मधून प्रतीत होणाऱ्या संवेदना या रोमँटिक आहेत काय ? ना.धों. महानोर यांच्या रानातल्या कवितांनंतर ग्रामीण भागातून लिहू लागलेली एक समृद्ध पिढीच मराठीला कवितेला मिळाली. त्यांच्या ग्रामीण संवेदना या काय सामाजिक प्रतिबिंब मांडणाऱ्या नव्हत्या ? यात इंद्रजीत भालेराव, नारायण सुमंत, प्रकाश घोडके, प्रकाश होळकर अशी कितीतरी नावं सांगता येतील... आता आघाडीचे कवी म्हणून यांची नाव घेतली जातात. पण, या सगळ्या कविंचा मशागतीचा काळ हा याच वीस वर्षांतला आहे, हे विसरून कसे चालेल. काट्याकुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी ग्रामीण वेदनेची कविता लिहिणाऱ्या इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांना सामाजिकतेचे भान नाही ? नारायण सुमंत यांची वरकरणी मंचीय वाटणारी पण, तितकीच आत डोकवायला लावणारी ग्रामीण मराठी कविता ही सर्वार्थाने सामाजिकच आहे. प्रकाश घोडके यांच्या कवितांमध्ये तर दलित जाणिवांचा एक अंतःस्थ सूर नक्कीच जाणवतो. ‘आभाळ झडतं, आभाळ झडतं गं, उपाशी पोटी पाण्याच्या घोटी, सपान पडतं गं... चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं, वेशीपाशी आलो, अन् बंद झाली वहिवाट, काळजाच्या आत कुठं मन रडतं गं, आभाळ झडतं गं...’ प्रकाश घोडकेंच्या या कवितेतून व्यक्त झालेली नाकारले गेल्याची वेदना विद्यापीठीय समीक्षकांना कधी कळणार ? बुकशेल्फातली अशी एक ना अनेक कवितांची पुस्तकं, त्यातल्या एकेक कविता आणि त्यातून रंगत गेलेली सामाजिक संवेदनांची मैफिल मोरोपंताच्या मनात रंगत गेली. मूठभर समीक्षकांच्या असल्या विद्यापीठीय निकषांमुळे चांगल्या कवितांची वहिवाट अशी वेशीपाशी बंद झाल्याचं पाहून मोरोपंतांचं मनही असंच काळजाच्या आत कुठं रडत राहिलं आणि मनाच्या आत दडलेलं आभाळही झडत राहिलं....!
- दुर्गेश सोनार ( दिनांक ५ फेब्रुवारी २००९ )
Thursday 29 January 2009
तोल सावरताना....!
सकाळी ऑफिसला जायला निघालो. सोसायटीच्या बाहेरच डोंबा-याचा खेळ सुरू होता. दोन बाजूला काठ्या उभारलेल्या... त्याला एक दोरी बांधलेली आणि त्यावर सात आठ वर्षांची चिमुरडी डोक्यावर हंड्याची उतरंड घेऊन काठीने तोल सांभाळत कसरत करत होती. तिच्या साथीला होता ढोलकीचा ताल.. कळकट कपड्यात फाटलेला संसार शिवण्यासाठी जगण्याचा संघर्ष करणारा तो डोंबारी... फाटकी लुंगी, मळलेला सदरा आणि गळ्यात अडकवलेला ढोलक, असा त्याचा अवतार... पोटाची खळगी भरण्यासाठी आपलाही हातभार देणारी ती चिमुरडी... काठीने तोल सावरणारी ती चिमुरडी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचाही तोल सांभाळत होती. काय असेल तिचं भविष्य..? मनात विचार आला, असे किती पैसे त्याला मिळत असतील, अशी कसरत करून ? पण, पोटासाठी ही रोजची कसरत त्यांना करावी तर लागणारच... आपण नाही का करत अशी कसरत... ? करतो, जरूर करतो... पण, त्यात फरक असतो जमीन अस्मानाचा.... 'घरोघरी मातीच्या चुली' अशी मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी असा येत असतो. समस्या, दुःखं, प्रत्येक माणसाची सारखीच असतात... फक्त त्याचं स्वरुप आणि परिस्थिती वेगवेगळी असते. आपणही खरे तर डोंबारीच असतो... पांढरपेशी डोंबारी... व्यवस्था नावाचा ढोलक आपल्याला नाचवत असतो आणि आपणही जगण्याची कसरत करत असतो. दोन बाजूंच्या काठ्यांना बांधलेला दोर आणि त्यावरून चालताना पडू नये म्हणून करावी लागणारी खटपट... सरावानं हे शक्य होत असलं तरी त्यासाठी परिश्रम करावे तर लागतातच नां... ? आपणही असेच हळूहळू सरावतो... आणि आपल्याही नकळत पट्टीचे डोंबारी होऊन जातो... रस्त्याने जाताना आजूबाजूला असे अनेक डोंबारी दिसतात, काही सडलेले, काही पडलेले, तर काही चिवटपणे तोलून उभे राहिलेले....
ऑफिसात आलो... सवयीप्रमाणे ई मेल चेक केले. एका बालमित्राचा अनपेक्षित मेल इनबॉक्समध्ये येऊन पडला होता. उत्सुकतेने मी तो वाचला. नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेलेला तो मित्र वैतागला होता. मंदीमुळे त्याच्या नोकरीवर संक्रांत आलेली... कुठल्याही क्षणी गाशा गुंडाळून भारतात परतावं लागणार या विचारानं तो हतबल झालेला... त्याच्या शब्दांशब्दांतून ते प्रतीत होत होतं. भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीतही त्याला स्वास्थ्य नव्हतं. तो त्याचा तोल सावरू शकत नव्हता. आत्मविश्वास ढळलेला तो माझा मित्र केविलवाणा होऊन तिथलं मंदीचं वास्तव सांगत होता... माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तो सकाळचा डोंबारी आणि दोरीवर तोल सावरत चालणारी ती चिमुरडी आली.... तोल सावरण्याचं त्यांचं कसब पाहून खरंच अप्रूप वाटलं... एकीकडे मंदीच्या फटक्यामुळे तोल न सावरू शकणारा माझा परदेशातला मित्र तर दुस-या बाजूला परिस्थितीचा हसतमुखाने स्वीकार करत जगणं तोलून धरणारी ती चिमुरडी.... तोल राखायला शिकवणारे हे प्रसंग माझ्यासाठी तितकेच तोलामोलाचे वाटले.
- दुर्गेश सोनार (दिनांक, २९ जानेवारी २००९)
Monday 26 January 2009
माझा प्रजासत्ताक...
नेहमीपेक्षा आज जरा लवकरच उठणं झालं ते सोसायटीत मोठ्याने लागलेल्या गाण्यांमुळे... अगदी सक्काळी सक्काळी `ऐ मेरे वतन लोगो`चे सूर कानी पडले... आणि झोपी गेलेला जागा झाला...! झोपलेल्या प्रत्येकाला जागं करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या सद्भावनेनंच जणू काही आमच्या सोसायटीतल्या कार्यकर्त्यांनी हे गाणं मोठ्या आवाजात लावलं असावं, असा समज होऊन अस्मादिकांचं उठणं झालं... असो, निमित्त काही का असेना वर्षातून असं दोनदा या गाण्याची आठवण होते आणि तमाम भारतीयांना शहिदांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिल्याचं समाधान असं सोसायटी सोसायटीतल्या प्रत्येक देशभक्त कार्यकर्त्याला लाभतं.... तर आमच्या प्रजासत्ताकाची सुरूवात झाली ती `याद करो कुर्बानी`च्या अमीट सुरांनी.... त्याच्या जोडीला देशभक्तीपर गाणी गाण्यासाठीच जन्मलेल्या महेंद्र कपूरांच्या आवाजातली गाणीही होतीच... अधूनमधून ऑस्कर नॉमिनी रेहमानभाऊंचं `माँ तुझे सलाम` होतंच... अशा स्वरमिलाफात प्रजासत्ताक दिनाची सुरूवात म्हणजे अहाहा....! या गाण्यांच्या पार्श्वसंगीतावर आमच्या चित्तवृत्ती जाग्या झाल्या. लाल किल्ल्यापासून ते देशभरातल्या शाळा कॉलेजं, सरकारी ऑफिसांमध्ये तिरंगा अभिमानानं लहरत असल्याचं सुखद चित्र डोळ्यांसमोर तरळू लागलं... तशी स्वप्नं पाहायची आमच्या डोळ्यांची सवय फार जुनी आहे. अहो मीच काय, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही स्वप्नं पाहायचे... म्हणूनच तर स्वातंत्र्याची पहाट होत असताना त्यांनी भारतीयांना एक स्वप्न दाखवलं होतं. ‘फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता. त्यानुसार वागण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे’, असं नेहरू म्हणाले होते... `जन गण मन` लिहिणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनीही स्वातंत्र्याच्या नंदनवनाचं स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नातल्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात `देश सदैव जागा राहो`, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती... माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि भारतीयांना दाखवलंही... तर अशी ही देशविकासाची स्वप्नं... आम्हीही अशी स्वप्नं पाहतो... पण, सकाळ झाली की, ती विरून जातात... स्वप्नं पडायची असतील, तर त्यासाठी गाढ झोपलं पाहिजे.... पण, असं सुखानं कोण झोपू देतं ? आता तर न्यूज चॅनेल्सनी सगळ्यांची अक्षरशः झोपच उडवून टाकली आहे... त्याच्यावर तोडगा म्हणून आता सगळे न्यूज चॅनेल्स हे मनोरंजन वाहिन्या म्हणून घोषित करा, अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे. म्हणजे कसं, जसा सासू सुनांचा डेली सोप, तसाच चोवीस तास बातम्यांचा रिऍलिटी (वास्तव की अवास्तव ?) शो..! घटनाकारांनी प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं, त्यावेळी त्यांनाही या मूलभूत हक्कांचा भविष्यात असा वापर होईल, असं वाटलं नसेल... किंबहुना त्यांना स्वप्नातही असं वाटलं नसेल...
तर देशभक्तीच्या गाण्यांनी आम्ही नुसतेच जागे झालो नाही तर स्वप्नातून वास्तवातही आलो. वर्तमानपत्रांतून छापून आलेलं कालचं वर्तमान वाचत वाचत आपण खरेच `लोकसत्ता`क झाल्याच्या अभिमानानं ऊर भरून आला. अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मरणोत्तर जाहीर झालेले बहुमान, पद्म पुरस्कारांची भलीमोठी यादी, त्या यादीतून ‘बिटविन दी लाईन्स’ व्यक्त होणारे कुणाकुणाचे हितसंबंध... ‘प्रजासत्ताक चिरायु होवो’, असं म्हणत स्वतःचं मार्केटिंग करणा-या पान पान जाहिराती... देश मोठा की, ब्रँड असा भ्रम कुणालाही होईल, अशा या जाहिराती... इतक्या जाहिराती मिळाल्यानंतर कोणताही वृत्तपत्र मालक एखाद दिवस आपल्या कर्मचा-यांना सहजपणे सुटी देऊ शकतो नाही का... २६ जानेवारीची सुटी असल्याने उद्याचा अंक प्रकाशित होणार नाही, ही चौकट म्हणूनच पान एकच्या उपसंपादकानं समाधानानं पानात लावली असेल... तेव्हा समस्त वृतपत्रसृष्टीचा प्रजासत्ताक आनंदात साजरा होणार असं मनात म्हणत आमची स्वारी तयार झाली. आम्ही प्रिंटचे पत्रकार नसल्यानं आम्हाला कुठली प्रजासत्ताकाची सुट्टी आणि कसलं काय ?
एकूणच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन राष्ट्रीय सणांचा थाटच काही और असतो. चौकाचौकातून देशभक्तीची गाणी, रांगोळ्या, ठिकठिकाणी शहिदांच्या आठवणी जागवणारे कार्यक्रम, परिटघडीच्या गणवेशात नटूनथटून शाळेला निघालेली भारताची उद्याची पिढी... शाळांच्या मैदानावर होणारे संचलन... देशप्रेमाचं भरतं यावं, असं हे वातावरण... नसानसांतून मग रक्त उसळू लागतं.. देशासाठी काहीतरी करावं, असं वाटू लागतं.... देशासाठी आपण देणं लागतो, असे भलेथोर विचार मनात येऊ लागतात... पण, दिवस संपला की, हे विचारही कुठल्या कुठे पसार होतात... ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत’, ही पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली प्रतिज्ञा विस्मरणात जाते... `मला काय त्याचे ?` ही भावना बळावते. लोकलमधून जाताना प्रजासत्ताक भारताचं खरंखुरं वास्तव स्टेशनगणिक समोर येतं. पण, त्यावर काही व्यक्त होण्याइतकी संवेदना आमच्यात कुठे राहिलीय? जी अवस्था मुंबईची, तीच किंबहुना त्याहीपेक्षा दयनीय अवस्था ग्रामीण भारताची आहे. स्वतंत्र, सक्षम, बलशाली भारताचं स्वप्न लोडशेडिंगच्या अंधारात हरवून गेलीयत... एका बाजूला मोठमोठे फूड फेस्टीवल साजरे होतात, तर दुस-या बाजूला अनेकांना एका वेळचं अन्नही पोटभर मिळत नाही. प्रत्येक गोष्ट साजरी करायची सवय लागलेले आपण सो कॉल्ड पांढरपेशे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवसही त्याच पद्धतीनं साजरे करतो आहोत... असे भपकेबाज कार्यक्रम करताना प्रजासत्ताक भारताचं हे वास्तव सोयिस्करपणे विसरलं जातंय. साठीत बुद्धी नाठी होते असं म्हणतात.. प्रजासत्ताकाची साठी साजरी करत असताना भारतीयांची बुद्धी नाठी होऊ नये, इतकीच अपेक्षा...
- दुर्गेश सोनार (दिनांक २६ जानेवारी २००९)
