Thursday 7 April, 2011

अण्णांचे आंदोलन, मीडिया आणि काही मूलभूत प्रश्न...


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नवी दिल्लीत जंतरमंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयक संमत व्हावं, यासाठी अण्णांनी उपोषणाचं हत्यार उपसलंय. या आंदोलनात अण्णांना देशभरातून सर्वच स्तरांतून वाढता पाठिंबा मिळतोय. भ्रष्टाचारमुक्त देशाच्या निर्मितीसाठी लोकपाल विधेयक अत्यंत आवश्यक आहे. ते मंजूर होऊन भ्रष्टाचाराला आळा बसावा, हा शुद्ध हेतू अण्णांच्या आंदोलनाचा नक्कीच आहे. अण्णा उपोषणाला बसल्यापासून देशभरातली सगळी प्रसारमाध्यमं विशेषतः सगळ्या चोवीस तास वृत्तवाहिन्या याच विषयाच्या बातम्या सातत्यानं दाखवत आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांतल्या वाहिन्यांनी अण्णांच्या आंदोलनाची बातमी सातत्यानं लावून धरलीय. बहुतेक वाहिन्या जंतरमंतरवरून आंदोलनाचे लाईव्ह दाखवत आहेत. काही वाहिन्यांनी तर अण्णा के अनशन के अमुक अमुक घंटे असं सतत टीव्ही स्क्रीनवर सुरूच ठेवलंय. वर्ल्ड कप होता तेव्हा मॅचचा स्कोअर दाखवायचे तसं या वाहिन्या अण्णा के अनशन के अमुक अमुक घंटे असं चालवतायत. तर काही वाहिन्यांनी अण्णांचं मेडिकल अपडेटही द्यायला सुरूवात केलीय. म्हणजे अमुक अमुक वाजता अण्णांचा बीपी किती होता... वगैरे वगैरे.... हे कमी म्हणून की काय, बहुतेक सगळ्या चोवीस तास वाहिन्यांवर अण्णा हजारेंच्या आंदोलनाबाबत अखंड चर्चाचर्वण सुरू आहे. समाजातले सगळे विचारवंत विश्लेषक वेगवेगळ्या वाहिन्यांच्या टॉक शोजमध्ये आपापली मतं मांडतायत. देशभरात सध्या फक्त एक आणि एकच चर्चेचा विषय आहे आणि तो म्हणजे अण्णांचे आंदोलन...!

आता हे सगळं पाहत असताना प्रसारमाध्यमांच्या अनुषंगाने मनात काही प्रश्न निर्माण झाले. अण्णांनी आंदोलनाचा मुहूर्त निवडला तो पाच एप्रिलचा.... म्हणजे वर्ल्ड कप संपून तीन दिवस उलटून गेलेले आणि आयपीएल सुरू व्हायला तीन दिवस शिल्लक... वर्ल्ड कप भारतानं जिंकला दोन एप्रिलला... त्यानंतर जवळपास दोन दिवस धोणी धुरंधरांच्या सुरस यशोगाथा गाण्यात सगळा मीडिया बिझी होता. त्यातच सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला जावा, अशी मागणी सगळ्याच स्तरातून होऊ लागली. त्याचीही चर्चा मीडियावर बरीच रंगली.. क्रिकेटचा हा हँगओव्हर उतरत असतानाच अण्णांचं आंदोलन सुरू झालं आणि आख्खा मीडिया त्यावर अधाशासारखा तुटून पडला. कारण वर्ल्ड कप संपल्यानंतर मीडियाकडे चघळायला विषय तरी कुठे होता...? अण्णांच्या आंदोलनाविषयी खरंच किती पोटतिडकीनं सगळ्या वाहिन्या वार्तांकन करतायत हा कळीचा आणि चर्चेचा मुद्दा आहे. मीडियाची अण्णांच्या आंदोलनाविषयी असलेली बांधिलकी किती खरी आणि किती खोटी हे आयपीएल सुरू झालं की लगेचच समोर येईल. कारण एकदा का आयपीएल सुरू झालं की त्याच्याच बातम्या सुरू होतील आणि लोकपाल विधेयकाचा झेंडा घेऊन मैदानात उतरलेल्या अण्णांच्या बातम्या कुठल्या कुठे मागे पडतील... बरं आणि या वाहिन्या अण्णांच्या आंदोलनाचं जे वार्तांकन करतायत तेही फार मजेशीर आहे. यात कुठेही अण्णांनी मांडलेला मूळ मु्द्दा माध्यमांनी ( काही सन्माननीय अपवाद वगळता ) मांडलेला नाही. लोकपाल विधेयक नेमकं आहे काय, त्यातल्या तरतुदी काय आहेत, हे विधेयक गेली ४२ वर्षं प्रलंबित का आहे, त्याची कारणं काय आहेत, यावर कुठेही फोकस केलेला दिसला नाही... दिसलं ते फक्त 'अण्णांच्या वादळापुढे सरकार नमले', 'मनमोहनसिंग सरकार अण्णांच्या प्रश्नांपुढे निरुत्तर', 'पवारांनी मंत्रिगटाचा दिला राजीनामा', 'सोनियांनी अण्णांना केली विनंती'... वगैरे, वगैरे.... आणि अण्णांच्या आंदोलनाला सेलिब्रेटींनी दिलेला पाठिंबा... आमीर खान, मधुर भांडारकर, दिया मिर्झा, रझा मुराद, अनुपम खेर यासारखी बॉलिवूडमधली मंडळी अण्णांच्या पाठिशी उभी राहिली. त्यामुळे या आंदोलनाला ग्लॅमर मिळालं. वाहिन्यांनी नेमकं तेच टिपलं... शेवटी प्रश्न टीआरपीचाही आहे. फक्त अण्णा हजारे चोवीस तास दाखवून वाहिन्यांना हवा तसा टीआरपी मिळेल ? हां... या सगळ्यांत एक जमेची बाजू नक्कीच आहे आणि ती म्हणजे मीडियाच्या अशा प्रकारच्या कव्हरेजमुळे अण्णा हजारे खऱ्या अर्थानं 'नॅशनल फिगर' झाले...!

दुसरा मुद्दा... फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साईटसवर अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे ग्रुप तयार होऊ लागलेयत. अण्णांना पाठिंबा व्यक्त करणारे मजकूर लिहिले जाऊ लागलेयत. पण, हे सगळं एखादी लागण व्हावं तसं आहे असं मला वाटतं. एखाद्यानं लिहिलं आणि त्याला फेसबुक वॉलवर लाईक केलं किंवा त्यावर कमेन्ट टाकली म्हणजे आपण अण्णांच्या कार्याला हातभार लावला असं अनेकांना वाटू शकतं. हा धोका यात आहे. फक्त फेसबुक वॉलवर लिहून अण्णांचा हेतू साध्य होणार नाही हे सुज्ञ नेटिझन्सनी ध्यानात घ्यायला हवं. अण्णांनी सुरू केलेली ही लढाई म्हणजे फक्त सुरुवात आहे.... जोपर्यंत लोकपाल विधेयक संमत होत नाही, भ्रष्टाचाराला आळा घातला जात नाही तोपर्यंत ही लढाई फलद्रूप होऊ शकणार नाही. मीडियानंही हे लक्षात घ्यायला हवं... उगंच, पळा रे पळा रे.. लाईव्ह करा रे करा रे... बाईट घ्या रे घ्या रे... असं नुसतं पळापळ करून चालणार नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण आहोत, हे लक्षात घेऊन तो अधिक बळकट कसा होईल, हे पाहायला हवे.
- दुर्गेश सोनार  

No comments: