Sunday 2 November, 2008

हो, मी मराठी आहे...!

मी मराठी आहे म्हणताना मला अजिबात लाज वाटत नाही, की खंतही वाटत नाही... पण, ज्या अभिमानानं मी असं म्हणायला पाहिजे, तो अभिमान कुणी राजकीय स्वार्थासाठी तर वापरत नाही ना, याची खातरजमा करण्याची ही वेळ आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्या मराठीला `अमृतातेही पैजा जिंकणारी ` भाषा म्हणून गौरवलं, ती माझी माय मराठी आज वादग्रस्त ठरलीय. भाषेच्या अभिजाततेला प्रांतिक अस्मितेचं कुंपण घातलं गेलं की काय अनर्थ होतो, याचा प्रत्यय सध्या पदोपदी येतोय. आईबद्दल भलतंसलतं कुणी बोललं तर आपल्याला जसा राग येतो, तसाच राग मराठीबद्दल कुणी बोलणार असेल तर यायलायच हवा. त्यात गैर ते काय ? पण, असाच राग दुसरी भाषा बोलणा-या व्यक्तीलाही येत असणार, त्याचंही त्याच्या भाषेवर प्रेम असणार, याकडे आपण डोळेझाक करून चालणार नाही. भाषेविषयीच्या प्रेमाचं जेव्हा असं राजकारण होतं, तेव्हा सगळेच जण वेठीला धरले जातात. तिथे वाद निर्माण होतो. भाषेतून अपेक्षित असलेला संवाद कुंठतो. खरंतर कोणतीही भाषा ही संवादाचं माध्यम असतं. समाजात सुसंवाद प्रस्थापित व्हावा, यासाठी भाषा महत्त्वाची असते. आपण समोरच्या व्यक्तीशी कोणत्या भाषेत बोलतो, यावर समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते. आपण समोरच्याला `अरे` केले तर तो आपल्यालाही `कारे` असं म्हणणारच... सध्या मराठी माणूस आणि त्याच्यावरून सुरू झालेलं राजकारण पाहिलं तर मन विषण्ण होतं. भाषावार प्रांतरचना करण्याचा अट्टाहास याच दिवसासाठी केला होता का ? असा उद्वीग्न सवालही मनात येतो. खरंतर, आंतरभारतीची एक सुंदर कल्पना आपल्याकडे आहे. भाषाभगिनींमध्ये देवाणघेवाण व्हावी, यासाठी आंतरभारतीचा पुरस्कार केला जातो. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे भाषांमध्ये वैविध्य पाहायला मिळते. प्रत्येक प्रांताची भाषा, तिथली बोली ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एवढी विविधता कुठेही पाहायला मिळत नाही. हे खरंतर सार्वभौम भारताचं सामर्थ्य आहे. पण, हेच सामर्थ्य आज प्रांतिक द्वेषामुळे पोखरलं जातंय. त्याला कुणी एक जबाबदार नाही. या परिस्थितीला सगळे राजकीय पुढारी आणि उदासीनतेचं घोंगडं पांघरलेले आपणच जबाबदार आहोत. आज मुंबईत एखादा बिहारी मारला गेला की, त्यावरून रान उठतं. सगळे उत्तर भारतीय नेते एकत्र येतात. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच नाही, असा कांगावा करतात. पण, त्याचवेळी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये काय स्थिती आहे, याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज या नेत्यांना वाटत नाही. ही आठवण कुणी करून देत असेल, तर त्यालाच देशद्रोही ठरवलं जातं, देशाच्या एकात्मतेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असाही आरोप केला जातो. पण, जरा दक्षिण भारतात जाऊनही बघा... तिथली भाषिक अस्मिता इतकी पराकोटीची आहे, की तिथे तुम्हाला तुमची राष्ट्रभाषा असलेली हिंदीही बोलून चालत नाही. तिथे तुम्हाला त्यांच्याच दाक्षिणात्य भाषेत, नाही तर इंग्रजीत बोलावं लागतं. दक्षिणतेला हिंदीद्वेष हे उत्तर भारतीय नेते खपवून घेतात, पण मराठी भाषकानं कधी नव्हे इतका आक्रमक पवित्रा घेतला की यांचा जळफळाट होतो, यांना देशाची एकात्मता आठवते. हे सगळं मी मांडतोय, ते फक्त मी मराठी आहे म्हणून... मला माझ्या मराठीपणाचा सार्थ अभिमान आहे म्हणून... आपल्या अभिमानाला जिथे ठेच पोहोचते, त्यावेळी प्रकर्षानं ही जाणीव सतावू लागते. मराठीपणाची कक्षा कधीच संकुचित नव्हती आणि आताही नाही. म्हणूनच तर महाराष्ट्रानं सगळ्यांना आपल्यात सामावून घेतलं. ही सामावून घेण्याची प्रवृत्ती इतर राज्यात आहे की नाही, हा मुद्दा नाही, पण या निमित्तानं याचंही परीक्षण झालं पाहिजे. इतरांना सामावून घेताना इथल्या मूळ भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा तर येत नाही ना, हेही पाहिले पाहिजे. भाषेच्या एकेका धाग्यानं विणली गेलेली एकात्मतेची वीण अशा प्रांतिक वादामुळे सैल होत असताना आपण आपली उदासीनतेची झापडं दूर सारली पाहिजेत. `आंतरभारती` ऐवजी `अंतर भारती` होत असताना भाषाभाषांमधलं अंतर आणखी वाढू न देण्याची जबाबदारी आपलीच आहे. हे अंतर जर असंच वाढत राहिलं तर देशाचं राजकीय नव्हे तर भाषिक विघटन व्हायला वेळ लागणार नाही.
- दुर्गेश सोनार

No comments: