Tuesday 24 February, 2009

शंख, मासा आणि सोमनाथदांचा वैताग...!

भाजपनं यंदा लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवायचंच असा चंग बांधलाय. त्यासाठी मुंबईत अडवाणींचा जाहीर सत्कार झाला. अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधीही त्यांना देण्यात आला. पण, यात एक गंमत झाली. हा परिस्थितीजन्य विनोद म्हणा किंवा नियतीनं दिलेले संकेत म्हणा... काहीही म्हणा, पण, या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी यांचे शंख वाजवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एरवी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात शंख करण्यात अडवाणींचा हात कुणी धरत नाही. पण, खरोखरचा शंख वाजवायची जेव्हा वेळ आली तेव्हा अडवाणी यांची हवा थोडी कमीच पडली. दोनतीनदा शंख वाजवण्याचा आटापिटा अडवाणींनी केला खरा... पण, शंख अजिबातच वाजत नाही हे लक्षात येताच त्यांनी तो बाजूला केला. त्यामुळेच लाल'कृष्णाचा शंख न वाजण्याचा झालेला हा (अप)शकुन भाजपला काय फळ देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच... ( पण, म्हणून काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आताच हुरळून जाऊन चालणार नाही. कारण याच सभेत अडवाणींनी आपल्या शब्दांचा शंखनाद चांगलाच केलाय. )

******

निवडणुका आता जवळ आल्यात, हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आपल्या भाषणांमधून, जाहीर सभांमधून त्याचा डंका पिटू लागलेत. या जाहीर सभांमधून होणारी भाषणं मुळातूनच ऐकण्यासारखी असतात. आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना शाब्दिक बाणांनी कसे घायाळ करता येईल, याची हरेक संधी प्रत्येक नेते शोधत असतात.  त्यासाठी वाट्टेल त्या उपमा द्यायलाही हे नेते मागेपुढे बघत नाहीत. आता नरेंद्र मोदींचंच उदाहरण घ्या नां... परवा ते गोव्यात गेले होते. तिथल्या एका सभेत त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी हा शोभेचा मासा आहे, अशा शब्दांत मोदींनी त्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसमधले नेते हे संरक्षित वातावरणात मजेत वावरणारे शोभेचे मासे आहेत आणि भाजपमधले नेते म्हणजे महासागरात आव्हानांच्या लाटा झेलणारे मासे आहेत, अशी मत्स्यतुलना मोदींनी केली. गोव्यात आल्यानंतर माशांशिवाय दुसरी कुठली उपमा सुचणार, नाही का ? असो... हे झालं मोदींचं कवित्व... पण, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनाही प्रत्युत्तर देण्याची खुमखुमी आली आणि मोदींच्याच उपमेचा आधार घेत त्यांनी पलटवार केला. मोदी म्हणजे माणसे खाणारा पिरान्हा जातीचा मासा आहे, अशी उलट टीका तिवारीबाबूंनी केली. तर असं हे आरोप प्रत्यारोपांचं मत्स्यपुराण...

******

संसदेचं या टर्ममधलं शेवटचं अधिवेशनही अंतिम टप्प्यात आलंय. या अधिवेशनातही खासदारांनी आपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे खासदारांचे हेडमास्टर असलेले सोमनाथदा चांगलेच वैतागले. अरे, तुम्ही असे वागता,  तुम्हाला पुन्हा कुणी निवडून तरी देईल का ?’ असं सोमनाथदांनी खासदारांना बजावलं देखील... पण, पुन्हा हे काही सुधारणार नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खासदारांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देत कानात बोळे घालून घेतले. भारतीय लोकशाही साठीकडे झुकली असतानाच आपल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेलं प्रदर्शन सध्याचं वास्तव सांगायला पुरेसं आहे. मतदार राजा सुजाण आहे, त्याला कोणाला उचलून धरायचं आणि कुणाला उचलून आपटायचं हे चांगलंच माहिती आहे.  त्यामुळेच बा, मतदारराजा ! जागा राहा, आणि सत्तांधांना त्यांची जागा दाखव रे बाबा....!

******

-         दुर्गेश सोनार ( २४  फेब्रुवारी २००९ )

 

No comments: