Sunday, 10 October 2010
9 ऑक्टोबरच्या निमित्ताने
दिवसभरांत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, एसएमएस केले, फोन केले, फेसबुक आणि ऑर्कुटवरही शुभेच्छा व्यक्त केल्या. ऑफिसमध्येही सहकाऱ्यांनी केक आणला.... हे सगळं करत असताना मी माझ्या बालपणात हरवून गेलो... मला आठवतं... आम्ही शाळेत असताना आई बाबा आमच्या प्रत्येकाचा वाढदिवस मोठ्या हौसेने करायचे.. आमच्या शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आवर्जून घरी बोलवायचे... त्यावेळेसचा मेनूही तसा ठरलेलाच असायचा... गोड पदार्थ म्हणून गुलामजामुन किंवा मला आवडतात म्हणून बेसन लाडू... पंढरपूरचे चिरमुरेही प्रसिद्ध... त्यामुळे आईने केलेला खमंग चिवडाही असायचा... कधी कधी आमच्या हट्टाखातर आई इडली सांबरही करायची... बालपणी वाढदिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस असायचा... नवे कपडे घालायचे... मित्रमैत्रिणींसोबत आईने केलेला खाऊ खायचा... भेटवस्तू स्वीकारायच्या... खेळ खेळायचे.... असं बरंच काही.... या सगळ्यामध्ये आपलं वय वाढतंय याची जाणीव त्या काळात फारशी व्हायची नाही... ती जाणीव हळूहळू व्हायला लागली आणि माझा वाढदिवसाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपोआपच बदलला.
आता वाढदिवसाचे फारसे अप्रूप वाटत नाही. उलट आयुष्यातलं एक वर्षं संपल्याचं जाणवत राहतं... आता जी काही वर्षं उरली असतील, त्यामध्ये बरंच काही साध्य करायचं आहे... त्यासाठी करावी लागणारी मेहनत, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न... याची मला मनापासून जाणीव आहे. आजवरच्या आयुष्यात मला खूप काही मिळालंय... सुप्रियासारखी समजूतदार आयुष्याची जोडीदार आणि आमच्या संसारवेलीवर शताक्षीच्या रुपानं फुललेलं गोंडस फूल... दिवस कितीही कामात गेला, कितीही तणावाखाली गेला... तरी रात्री घरी आल्यानंतर शताक्षीचे बा बा बा बा असे बोबडे बोल ऐकले की सारं काही विसरून जातं... मन अगदी मोकळं मोकळं होऊन जातं... तिच्या दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाणाऱ्या बाललीला... आपलं बालपण पुन्हा आपल्यासमोर येतं ते असं... तिचं असं वाढणं.... मी पाहत राहतो.... आता तिचेच वाढदिवस....
- दुर्गेश सोनार ( 10 ऑक्टोबर 2010 )
Tuesday, 6 April 2010
संमेलनाच्या मांडवकळा...
नाही म्हणायला संमेलन पुण्यप्रभावी ठरले हे खरंच आहे. काय नव्हतं बरं त्या संमेलनात... सगळं काही होतं... ज्ञानपीठ विजेते विंदा म्हणायचे तसं ‘तेच तें तेच तें…..’ नक्कीच होतं. म्हणजे बघा, तेच वाद, तेच विषय, तेच वक्ते... सारं कसं तेच तें... पुण्यनगरीतच जेव्हा पहिलं ग्रंथकारांचं संमेलन झालं तेव्हापासूनच खरं तर वादांची संगत संमेलनाशी जोडली गेली. एका अर्थी वाद हे साहित्य संमेलनाच्या पाचवीला पुजले गेलेयत. पण, त्या काळातले वाद हे शंभर टक्के साहित्यविषयक वाद असायचे... पण, आजकालचे वाद हे फुटकळ आणि क्षुल्लक असतात. पराचा कावळा करणे अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचंच प्रत्यंतर सध्याच्या काळात येत असल्यानं मोरोपंतांची साहित्यिक अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. आता, यंदाच्या संमेलनात वादाची बांग दिली सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी... व्यसनाने बरबटलेला पैसा संमेलनासाठी का वापरावा, असा खडा सवाल त्यांनी संमेलनाच्या स्मरणिका प्रकाशन समारंभात केला आणि तिथून वाद रंगत गेला. आता माणिकचंदशी संबंधित वाद आहे म्हटल्यावर तो रंगणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसावी... साहित्यातले सगळे ‘उंचे लोग’ आपापली साहित्यिक ‘उंची पसंद’ घेऊन वादात उतरले. कशी गंमत आहे पहा... समारोपातही वादाची एक वेगळीच उंची बघायला मिळाली. याला म्हणतात संमेलन वेगळ्या उंचीवर जाणे... असो, विषय तत्वाचा होता. पण, संयोजकांनी कुठे स्वतःहून माणिकचंदचं प्रायोजकत्व नाकारलं ? दस्तुरखुद्द माणिकचंदवाल्यांनीच आपलं प्रायोजकत्व मागे घेतलं आणि वादावर पडदा टाकला.. पण, मोरोपंतांच्या मनात तरीही हा वाद कुठेतरी बाकी होताच... संमेलन सुरु झालं आणि रसिकांसाठी, निमंत्रितांसाठी जे पाणी दिलं जात होतं त्यावर तर चक्क माणिकचंदचाच ब्रँड होता... व्यसनांचा पैसा नको तर मग त्यांच्या ब्रँडचे पाणी तरी कशाला हवे, असा एक सहजप्रश्न मोरोपंतांना एकसारखा पडत होता.
संमेलन तर सुरू झालं... आणि त्याचबरोबर वादाचा नवा अंकही सुरू झाला. अमिताभ बच्चन समारोपाला येणार, त्याच्यासोबत मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार, हे संयोजक म्हणतात, तसं खूप आधी ठरलेलं.. पण, काँग्रेसच्या संस्कृतीला ते रुचलं नसावं... अमिताभची ऍलर्जी असलेल्या काँग्रेस श्रेष्ठींची नाराजी नको, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शक्कल लढवली. त्यांनी संमेलनाला दुसऱ्याच दिवशी भेट दिली. अहो, पण, त्यामुळे नियोजित परिसंवादांचा बोऱ्या वाजला... माध्यमांनाही परिसंवादांपेक्षा ‘सीएम – बिग बी – काँग्रेस’ या वादातच स्वारस्य होतं... म्हणजे संमेलनाला साहित्यिक मूल्य म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती, त्याऐवजी असल्या फालतू वादांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळालेली पाहून मोरोपंत अक्षरशः हलबलले....
असं म्हणतात वय वाढत जातं तसं माणूस अनुभवानं परिपक्व होत जातो... इथे तर साहित्य संमेलनाला शंभर वर्षांची परंपरा आहे. आता जे झालं ते संमेलन तर 83 वं होतं... म्हणजे, वय वाढत चाललेल्या साहित्य संमेलनांमध्येही पक्वता यायला हवी... पण, प्रत्यक्षात ही संमेलनं जख्ख म्हातारी होत चाललीयत, त्यांना कसलाही साहित्यिक बैठकीचा आधार नाही... राजकीय आणि पैसेवाल्यांच्या बेगडी दिखाऊपणाचं ओझं घेऊन संमेलनं वाकत चाललीयत... मोरोपंतांसारखा खरा रसिक संमेलनाची ही साहित्यिक विटंबना पाहून धास्तावला आहे...
- दुर्गेश सोनार ( 7 एप्रिल 2010)
Friday, 19 February 2010
शिक्षणाच्या ...... घो !
मुलांच्या या भडिमारामुळे गटणे मास्तर अधिकच चक्रावले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच तासाला मुलांचे हे असे प्रश्न... म्हणजे माय नेम इज खानच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला शिवसैनिकांनी केलेला गोंधळच... अशी भावना मास्तरांची झाली. अरे हे काय आपल्यालाही सिनेमाचीच उपमा कशी काय आठवावी ? गटणे मास्तर आणखीनच कोड्यात पडले. क्षणभर डोळे मिटून घेतल्यावर त्यांना लक्षात आलं की, आपणही टीव्हीमय झालोय. आपणही ब्रेकिंग न्यूजच्या हॅमरिंगमुळे टीव्हीऍडिक्ट झालोय. आपलीही जर हीच अवस्था असेल, तर मुलांना तरी काय दोष द्यायचा ? घराघरांत टीव्ही आहे, त्यावर दिवसरात्र असंख्य तऱ्हेची चॅनेल्स सुरु असतात. ते पाहताना ना डोळे थकतात ना माणसं... हातात रिमोट असूनही त्यावर आपला कंट्रोल नाही... इतके का अधीन झालोय आपण... ? डोक्यात भंजाळल्यासारखं होत असतानाच तास संपल्याची घंटा झाली. मास्तर भानावर आले. हा एक तास संपला पण, बाहेरच्या तासांचे काय ? तिथे भंजाळल्यासारखी परिस्थिती असताना भानावर आणणारी अशी खरंच कोणती घंटा आहे ?
- दुर्गेश सोनार (20 फेब्रुवारी 2010)
Tuesday, 14 July 2009
दिवस 'प्रतिभा संगम'चे...
अंमळनेरचं ते पहिलं प्रतिभा संगम आज तेरा वर्षांनंतरही माझ्या मनात अगदी तस्संच्या तस्सं ताजं आहे. राज्यभरातनं किमान सातशे ते आठशे विद्यार्थी साहित्यिक अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले होते. मराठी साहित्यविश्वातले हे इतके ताजेतवाने अंकुर पहिल्यांदाच एके ठिकाणी एकत्र येणं, मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांना भरभरून मार्गदर्शन करणं... हा सगळा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षं झाल्याचं औचित्य या सगळ्या खटाटोपामागे होतं. अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अभिजात साहित्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर हे सगळ्या युवा साहित्यिकांचे मूळ प्रेरणास्रोत... प्राचार्य राम शेवाळकर यांचं ओघवत्या शैलीतलं उद्घाटनाचं भाषण ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कवी प्रवीण दवणे यांनी ' कविता फुलते कशी ? ' यावर घेतलेली प्रकट मुलाखत, गटागटातून रंगलेल्या विद्यार्थी साहित्यिकांच्या चर्चा, असं सगळं पोषक खत मिळत गेलं आणि माझ्यासारखे कितीतरी त्या वेळेसचे विद्यार्थी साहित्यिक रुजत गेले.
याच प्रतिभा संगममधून अशोक जेधे सारखा हळवा, भावूक कविमित्र भेटला, 'येगं येगं इंद्रायणी' ही अशोकची त्यावेळची कविता अजूनही मनात तशीच आहे, वहीमध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं नां अगदी तशी... आता अशोक नाहीये पण, त्याची ती कविता कायम स्मरणात आहे. नाशिकचा मंदार भारदे, नंदुरबारची निकीता असोदेकर, पुणे जिल्ह्यातला संतोष शेंडकर, लासलगावचा ऐश्वर्य पाटेकर या सारखे अनेक लिहिते हात ओळखीचे झाले. तर प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्या सारखी साहित्यावर प्रेम करणारी आणि नव्या अंकुरांना जोपासणारी माणसं आपली झाली. त्यांच्याशी मैत्र जिवांचं जोडलं गेलं. एवढंच नाही तर ज्यांना फक्त दिवाळी अंकांतून, कवितासंग्रहांतून, पुस्तकांतून भेटता आलं होतं अशा मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अरूणा ढेरे, भानू काळे या सारख्या साहित्यिकांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला. यातून साहित्यविषयक जाणिवांचं क्षितीज विस्तारलं आणि लेखनाच्या आशाही उंचावत गेल्या. प्रतिभा संगमनं ग्रामीण भागातल्या कित्येक विद्यार्थी साहित्यिकांना लिहितं केलं, त्यांना विहरण्यासाठी पंखांत बळ दिलं. प्रतिभा संगमनं धारण केलेलं 'विस्तारणारी क्षितिजं... उंचावणाऱ्या आशा' हे ब्रीद त्यामुळेच तर सार्थ ठरतं. अंमळनेरच्या प्रतिभा संगम नंतर झालेल्या रत्नागिरीतल्या दुसऱ्या प्रतिभा संगममध्ये आणखी संधी मिळाली आणि एका वेगळ्या साहित्यिक चळवळीत सक्रिय होता आलं.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेला पूर्ण होत असलेली साठ वर्षं... प्रतिभा संगम सारखं व्यासपीठ अभाविपनं निर्माण केलं नसतं तर कदाचित माझा अभाविपशी संबंध आलाच नसता आणि माझे साहित्यिक अनुबंध जुळले नसते. ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही अभाविपची त्रिसूत्री... स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान... चारित्र्यवान तरूण घडला तरच राष्ट्र घडेल, याची खूणगाठ बांधून ही संघटना काम करतेय. संघाच्या मुशीतून साकारलेल्या अभाविप बद्दल काही जणांना ऍलर्जी आहे. असेल तर असोत बापुडी... पण, एखादी संघटना गेली साठ वर्षं सातत्यानं काही ना काही विधायक उपक्रम राबवत असेल तर, त्यांच्या प्रयत्नांत खिळ घालण्यापेक्षा त्यांना बळ देणं हे केव्हाही चांगलं, नाही का ?
- दुर्गेश सोनार ( ९ जुलै २००९ )
Tuesday, 23 June 2009
आषाढस्य प्रथम दिवसे....
निळ्या वावरात दिंड्या
आल्या वाजवित टाळ
गर्जे आखाडी आभाळ
गर्जे आखाडी आभाळ...!
गडगडाट तो मृदुंग
विज प्रकाशे लकाका
माऊलीच्या पालखीची
जशी झळके पताका...!
आषाढसरींमध्ये माऊलींचा पालखी सोहळा अनुभवणं ही बातच काही और आहे... वैष्णवांचा देव असलेला विष्णूही निळा आणि आषाढात बरसणारा पाऊसही निळा... विठूमाऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगांचा गजर आणि त्याच्या जोडीला आषाढात गर्जणाऱ्या मेघांचा मल्हार... एका बाजूला उधाण वाऱ्यानं धरलेला फेर, तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांनी धरलेलं रिंगण.... पंढरीच्या दिशेनं पावलं चालत राहतात, भगव्या पताक्यांनी निळं आभाळ भरून जातं.. रंगांमधल्या समरसतेची प्रचिती देणारा हा आषाढ आणि त्याची साक्षात अनुभूती देणारा आषाढी वारीचा सोहळा.... नारायण सुमंतांसारख्या पंढरपूर परिसरातूनच लिहिता झालेल्या कवीला हे आषाढपण भावलं नाही तरच नवल.. सुमंत त्यांच्या आणखी एका कवितेत लिहितात...
थेंब आभाळी ना येतो
पूर भीमेसी ना येतो
तोच पंढरीचा काळा
माझ्या घामामंदी न्हातो...
अवघी सृष्टी पंढरी झाल्याचा हा दिव्य अनुभव... सुमंतांची ही काव्यानुभूती थेट संत सावता माळ्याशी नाळ जोडणारी आहे. `कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी`, असं म्हणणारे सावता माळी हेदेखील त्या अर्थी निसर्गकवीच म्हटले पाहिजेत... निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ आषाढात प्रकर्षानं प्रत्ययाला येतो. उन्हानं रापलेल्या काळ्या मातीला हिरवी झळाळी मिळते ती आषाढात... पुंडलिकाला भेटण्यासाठी जसा परब्रह्म आला तसाच पाऊसही धरेला भेटतो... जसा विठूमाऊलीचा अभंग आषाढात बहरतो, तसंच, धरेच्या ओटीपोटातून सृजनाचं हिरवं गाणं अंकुरतं.. शिवाराची वाटही मग पंढरीची वाटू लागते. नांगरणी झालेलं शिवार पेरतं होतं. पाटाच्या पाण्यात आषाढसरींचे थेंब असे मिसळतात की जशी चंद्रभागाच शिवारातून खळाळतं जाते... आषाढसरींचा हा सोहळा पदोपदी विठूरायाची आठवण करून देतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मग माहेराची सय ताजी होते...
- दुर्गेश सोनार ( २३ जून २००९ )
Thursday, 23 April 2009
...... उथळाचे श्रम वाया जाय !
बऱ्याच दिवसांनी आज लिहितोय. याचा अर्थ लिहिण्यासाठी अजिबात विषयच नव्हते, असा मुळीच नव्हे... थोडासा कंटाळा, काहीसा कामाचा ताण यामुळे लिहिण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. आता यावर तुम्ही म्हणाल आवड असली की सवड नक्की मिळते. हे शंभर टक्के मान्य आहे. पण, तशी वस्तुस्थिती प्रत्येक वेळी असतेच असं नाही. विषय कितीही डोक्यात घोळत असले तरी त्याला कागदावर मूर्त रुप देण्यासाठी काही तरी वेळ द्यायलाच हवा नां...! मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं...? त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, त्याची नांगरणी करावी लागते, थोडं खतपाणी करावं लागतं, आणि एवढं सगळं झालं की, ते बियाणं जोमानं उगवून यावं यासाठी सर्जनाचा पाऊस यावा लागतो. तर आणि तरच ते बियाणं जोरकसपणे उगवून येऊ शकतं... संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं – खोल ओली पडे ते पिक उत्तम उथळाचे श्रम वाया जाय... ज्या पिकाची खोली उत्तम आहे, तेच पिक सकस उत्तम असतं... वर वर असलेलं उथळ असलेलं पिक वादळवाऱ्यात तग धरू शकत नाही. आणि हल्ली तर आजूबाजूला अशी वरवरची झुडुपं मोठ्या डौलात बहरताना दिसतात.. ही झुडुपं म्हणजेच खरेखुरे वटवृक्ष आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जाते. आपल्यालाही हेच मृगजळ खरे वाटायला लागते. ज्याच्याकडे मायेची सावली मागायला जावं, ते डेरेदार वृक्ष नाहीत तर फुटकळ झुडपं आहेत, हे समजेपर्यंत आपण परिस्थितीच्या उन्हात अगदी करपून गेलेले असतो. मोठी सावली देण्याचा आव आणणारी ही तथाकथित झाडं खरं तर बोन्सायच असतात. विशिष्ट विचारधारेला कवटाळून बसत आपल्याला सोयीचे तत्वज्ञान जगाला सांगणारी ही झाडं खुंटलेलीच असतात. त्यांची वाढ विशिष्ट चौकटीच्या पलिकडे होऊच शकत नाही. कारण अगदी स्पष्ट असतं. त्यांच्या मुळाशी एका विशिष्ट विचारधारेच्या तारेनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि एकदा का ही विचारांची चौकट घट्ट पक्की झाली की, मग प्रत्येक प्रसंगाकडे हे लोक त्याच चौकटीच्या परिमाणातून पाहू लागतात. नदीच्या एकाच काठावर बसून ही मंडळी नदीच्या संपूर्ण भोवतालाचा अंदाज बांधू लागतात. त्यासाठी नदीच्या दुसऱ्या काठावर पण काही तरी आहे, तिथेही काही भोवताल आहे, हेच मुळी ते विसरून जातात. असो, तर अशी ही परिस्थिती असताना, लिहिण्यासाठी अजिबातच विषय नाही असे होणंच शक्य नाही... पण, लिहिण्यासाठी आवश्यक असणारी अंतःप्रेरणा जागृत करणारी परिस्थिती आजूबाजूला असते का, हे पाहावं लागतं. तरच नवं काही तरी लिहिलं जाऊ शकतं... अगदीच निराश व्हावं असं वातावरण असलं तरी त्यातही काही आश्वासक सूर आहेतच. ते गाते राहावेत, ते जुळून यावेत, यासाठी तरी आपले हात लिहिते राहावेत, नाही का ?
- दुर्गेश सोनार
Tuesday, 24 February 2009
शंख, मासा आणि सोमनाथदांचा वैताग...!
भाजपनं यंदा लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवायचंच असा चंग बांधलाय. त्यासाठी मुंबईत अडवाणींचा जाहीर सत्कार झाला. अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधीही त्यांना देण्यात आला. पण, यात एक गंमत झाली. हा परिस्थितीजन्य विनोद म्हणा किंवा नियतीनं दिलेले संकेत म्हणा... काहीही म्हणा, पण, या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी यांचे शंख वाजवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एरवी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात शंख करण्यात अडवाणींचा हात कुणी धरत नाही. पण, खरोखरचा शंख वाजवायची जेव्हा वेळ आली तेव्हा अडवाणी यांची हवा थोडी कमीच पडली. दोनतीनदा शंख वाजवण्याचा आटापिटा अडवाणींनी केला खरा... पण, शंख अजिबातच वाजत नाही हे लक्षात येताच त्यांनी तो बाजूला केला. त्यामुळेच लाल'कृष्णा’चा शंख न वाजण्याचा झालेला हा (अप)शकुन भाजपला काय फळ देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच... ( पण, म्हणून काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आताच हुरळून जाऊन चालणार नाही. कारण याच सभेत अडवाणींनी आपल्या शब्दांचा शंखनाद चांगलाच केलाय. )
******
निवडणुका आता जवळ आल्यात, हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आपल्या भाषणांमधून, जाहीर सभांमधून त्याचा डंका पिटू लागलेत. या जाहीर सभांमधून होणारी भाषणं मुळातूनच ऐकण्यासारखी असतात. आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना शाब्दिक बाणांनी कसे घायाळ करता येईल, याची हरेक संधी प्रत्येक नेते शोधत असतात. त्यासाठी वाट्टेल त्या उपमा द्यायलाही हे नेते मागेपुढे बघत नाहीत. आता नरेंद्र मोदींचंच उदाहरण घ्या नां... परवा ते गोव्यात गेले होते. तिथल्या एका सभेत त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी हा शोभेचा मासा आहे, अशा शब्दांत मोदींनी त्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसमधले नेते हे संरक्षित वातावरणात मजेत वावरणारे शोभेचे मासे आहेत आणि भाजपमधले नेते म्हणजे महासागरात आव्हानांच्या लाटा झेलणारे मासे आहेत, अशी मत्स्यतुलना मोदींनी केली. गोव्यात आल्यानंतर माशांशिवाय दुसरी कुठली उपमा सुचणार, नाही का ? असो... हे झालं मोदींचं कवित्व... पण, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनाही प्रत्युत्तर देण्याची खुमखुमी आली आणि मोदींच्याच उपमेचा आधार घेत त्यांनी पलटवार केला. मोदी म्हणजे माणसे खाणारा पिरान्हा जातीचा मासा आहे, अशी उलट टीका तिवारीबाबूंनी केली. तर असं हे आरोप प्रत्यारोपांचं मत्स्यपुराण...
******
संसदेचं या टर्ममधलं शेवटचं अधिवेशनही अंतिम टप्प्यात आलंय. या अधिवेशनातही खासदारांनी आपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे खासदारांचे हेडमास्टर असलेले सोमनाथदा चांगलेच वैतागले. ‘अरे, तुम्ही असे वागता, तुम्हाला पुन्हा कुणी निवडून तरी देईल का ?’ असं सोमनाथदांनी खासदारांना बजावलं देखील... पण, पुन्हा हे काही सुधारणार नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खासदारांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देत कानात बोळे घालून घेतले. भारतीय लोकशाही साठीकडे झुकली असतानाच आपल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेलं प्रदर्शन सध्याचं वास्तव सांगायला पुरेसं आहे. मतदार राजा सुजाण आहे, त्याला कोणाला उचलून धरायचं आणि कुणाला उचलून आपटायचं हे चांगलंच माहिती आहे. त्यामुळेच बा, मतदारराजा ! जागा राहा, आणि सत्तांधांना त्यांची जागा दाखव रे बाबा....!
******
- दुर्गेश सोनार ( २४ फेब्रुवारी २००९ )