Wednesday, 31 December 2008

सरत्या वर्षाला निरोप देताना....

आणखी एक वर्ष संपणार... कालचक्र चालत असतं आणि आपणही त्याच्यासोबत एकेक दिवस पुढे पुढे जात असतो. वर्षभरातले काही आनंदाचे तर काही दुःखाचे क्षण साठवत आपण आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे सुरू ठेवत असतो. मुळातच माणसांचा स्वभाव उत्सवप्रिय.... त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा करणं याकडे जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. जन्मापासून मृत्युपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सेलिब्रेट करत असतो. जन्माला आलेल्या बाळाचं नाव ठेवण्यासाठीचं बारसं असेल, नाही तर लग्नकार्य.... वाढदिवस असेल, नाही तर एखादा सणसमारंभ.... एकूणच काय प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा ही मनुष्यप्रवृत्ती... त्याला थर्टी फर्स्ट तरी कसा अपवाद असेल..? पण, यंदाचा थर्टी फर्स्ट त्याला अपवाद आहे. यंदा त्याला किनार आहे मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांची... २६ नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ले केले, त्यात कित्येक लोक बळी पडले, काही पोलिस अधिकारी, जवान शहीद झाले. सुरक्षा व्यवस्थेला भेदत अतिरेक्यांनी सर्वसामान्य  लोकांवर केलेला हल्ला नक्कीच हादरवणारा होता. त्यातून लोक आता सावरतायत. याच  सावटाखाली आलेला यंदाचा थर्टी फर्स्ट तितकासा चिअरफुल नसेल... पण, येणारं नवं वर्ष नवी उमेद घेऊन येणारं असेल.. सरत्या वर्षात राहिलेल्या त्रुटींवर, अपयशावर मात करत नव्या वर्षातल्या नव्या आव्हानांना सामोरं जाणं यातली खुमारी काही औरच आहे. जुनी पानं गळतात आणि झाडाच्या फांद्यांवर नव्या पानांची हिरवी चाहूल लागते. बुंध्याशी साचलेला पालापाचोळा झाडाच्या एकेकाळच्या हिरव्या वैभवाची साक्ष देत वा-यावरती सळसळत राहतो. त्याचवेळी झाड नव्या पालवीनं मोहरत असतं. जुन्याच्या अस्तातच नव्याचा उदय दडलेला असतो, हे तर सृष्टीतलं सनातन वास्तव... जुनी पानं झडली म्हणून झाड कधी खट्टू होतं का? वसंत येणार म्हणून झाड पुन्हा मोहरतंच नां? हुरहूर लावणा-या कातरवेळी भिववणा-या संध्याछाया थोड्याच वेळासाठी असतात, त्यानंतर अंगणात रातराणीचा गंध दरवळतोच नां? काळ्याकुट्ट रात्रीनंतर हलक्या पावलांनी दवारली सकाळ होतेच नां ? सूर्योदय होण्यासाठी आदल्या दिवशी सूर्यालाही अस्तंगत व्हावंच लागतं नां? जुनं जाणार आणि नवं येणार हा तर सृष्टीचा नियमच आहे. जुनं ते सोनं हे खरं असलं तरी जुन्याचाच सोस असता कामा नये आणि त्याचप्रमाणे नवं तेच चांगलं, असं म्हणत  नव्याचाच उदो उदो करणंही चुकीचंच... हे सगळं वाटण्याचं कारण म्हणजे आजचा थर्टी फर्स्ट... गेलेल्या क्षणांमध्ये गुरफटून न बसता येणारा प्रत्येक क्षण संस्मरणीय कसा करता येईल, तो आपल्या ओंजळीत कसा धरून ठेवता येईल, याचा विचार सरत्या वर्षाला निरोप देताना केला पाहिजे. आपल्या चाकोरीबद्ध जगण्यातून आनंदाचे चार क्षण अनुभवायला मिळणार असतील, तर थर्टी फर्स्ट साजरा करण्यात गैर ते काय ?  नाही तर कालाय तस्मै नमः म्हणत काळाच्या उदरात गुडूप होणं हे ओघानं आलंच...! असो, नव्या वर्षाच्या शुभेच्छांसह तूर्त लेखनविराम... 

– दुर्गेश सोनार 

Sunday, 2 November 2008

हो, मी मराठी आहे...!

मी मराठी आहे म्हणताना मला अजिबात लाज वाटत नाही, की खंतही वाटत नाही... पण, ज्या अभिमानानं मी असं म्हणायला पाहिजे, तो अभिमान कुणी राजकीय स्वार्थासाठी तर वापरत नाही ना, याची खातरजमा करण्याची ही वेळ आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी ज्या मराठीला `अमृतातेही पैजा जिंकणारी ` भाषा म्हणून गौरवलं, ती माझी माय मराठी आज वादग्रस्त ठरलीय. भाषेच्या अभिजाततेला प्रांतिक अस्मितेचं कुंपण घातलं गेलं की काय अनर्थ होतो, याचा प्रत्यय सध्या पदोपदी येतोय. आईबद्दल भलतंसलतं कुणी बोललं तर आपल्याला जसा राग येतो, तसाच राग मराठीबद्दल कुणी बोलणार असेल तर यायलायच हवा. त्यात गैर ते काय ? पण, असाच राग दुसरी भाषा बोलणा-या व्यक्तीलाही येत असणार, त्याचंही त्याच्या भाषेवर प्रेम असणार, याकडे आपण डोळेझाक करून चालणार नाही. भाषेविषयीच्या प्रेमाचं जेव्हा असं राजकारण होतं, तेव्हा सगळेच जण वेठीला धरले जातात. तिथे वाद निर्माण होतो. भाषेतून अपेक्षित असलेला संवाद कुंठतो. खरंतर कोणतीही भाषा ही संवादाचं माध्यम असतं. समाजात सुसंवाद प्रस्थापित व्हावा, यासाठी भाषा महत्त्वाची असते. आपण समोरच्या व्यक्तीशी कोणत्या भाषेत बोलतो, यावर समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया अवलंबून असते. आपण समोरच्याला `अरे` केले तर तो आपल्यालाही `कारे` असं म्हणणारच... सध्या मराठी माणूस आणि त्याच्यावरून सुरू झालेलं राजकारण पाहिलं तर मन विषण्ण होतं. भाषावार प्रांतरचना करण्याचा अट्टाहास याच दिवसासाठी केला होता का ? असा उद्वीग्न सवालही मनात येतो. खरंतर, आंतरभारतीची एक सुंदर कल्पना आपल्याकडे आहे. भाषाभगिनींमध्ये देवाणघेवाण व्हावी, यासाठी आंतरभारतीचा पुरस्कार केला जातो. जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश असा आहे की जिथे भाषांमध्ये वैविध्य पाहायला मिळते. प्रत्येक प्रांताची भाषा, तिथली बोली ही वैशिष्ट्यपूर्ण आहे. एवढी विविधता कुठेही पाहायला मिळत नाही. हे खरंतर सार्वभौम भारताचं सामर्थ्य आहे. पण, हेच सामर्थ्य आज प्रांतिक द्वेषामुळे पोखरलं जातंय. त्याला कुणी एक जबाबदार नाही. या परिस्थितीला सगळे राजकीय पुढारी आणि उदासीनतेचं घोंगडं पांघरलेले आपणच जबाबदार आहोत. आज मुंबईत एखादा बिहारी मारला गेला की, त्यावरून रान उठतं. सगळे उत्तर भारतीय नेते एकत्र येतात. महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच नाही, असा कांगावा करतात. पण, त्याचवेळी उत्तरेकडच्या राज्यांमध्ये काय स्थिती आहे, याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज या नेत्यांना वाटत नाही. ही आठवण कुणी करून देत असेल, तर त्यालाच देशद्रोही ठरवलं जातं, देशाच्या एकात्मतेला बाधा आणण्याचा प्रयत्न केला जातोय, असाही आरोप केला जातो. पण, जरा दक्षिण भारतात जाऊनही बघा... तिथली भाषिक अस्मिता इतकी पराकोटीची आहे, की तिथे तुम्हाला तुमची राष्ट्रभाषा असलेली हिंदीही बोलून चालत नाही. तिथे तुम्हाला त्यांच्याच दाक्षिणात्य भाषेत, नाही तर इंग्रजीत बोलावं लागतं. दक्षिणतेला हिंदीद्वेष हे उत्तर भारतीय नेते खपवून घेतात, पण मराठी भाषकानं कधी नव्हे इतका आक्रमक पवित्रा घेतला की यांचा जळफळाट होतो, यांना देशाची एकात्मता आठवते. हे सगळं मी मांडतोय, ते फक्त मी मराठी आहे म्हणून... मला माझ्या मराठीपणाचा सार्थ अभिमान आहे म्हणून... आपल्या अभिमानाला जिथे ठेच पोहोचते, त्यावेळी प्रकर्षानं ही जाणीव सतावू लागते. मराठीपणाची कक्षा कधीच संकुचित नव्हती आणि आताही नाही. म्हणूनच तर महाराष्ट्रानं सगळ्यांना आपल्यात सामावून घेतलं. ही सामावून घेण्याची प्रवृत्ती इतर राज्यात आहे की नाही, हा मुद्दा नाही, पण या निमित्तानं याचंही परीक्षण झालं पाहिजे. इतरांना सामावून घेताना इथल्या मूळ भूमिपुत्रांच्या हक्कांवर गदा तर येत नाही ना, हेही पाहिले पाहिजे. भाषेच्या एकेका धाग्यानं विणली गेलेली एकात्मतेची वीण अशा प्रांतिक वादामुळे सैल होत असताना आपण आपली उदासीनतेची झापडं दूर सारली पाहिजेत. `आंतरभारती` ऐवजी `अंतर भारती` होत असताना भाषाभाषांमधलं अंतर आणखी वाढू न देण्याची जबाबदारी आपलीच आहे. हे अंतर जर असंच वाढत राहिलं तर देशाचं राजकीय नव्हे तर भाषिक विघटन व्हायला वेळ लागणार नाही.
- दुर्गेश सोनार

Monday, 11 August 2008

पाऊसवेळा....!

खूप दिवसांनी पाऊस एवढा मनमुराद कोसळतोय. खिडकीच्या काचांवर पावसाचे निथळणारे थेंब भिंतींशी सलगी करू पाहतायत. भिंतींनीही हळूहळू ओल धरलीय. अंगणात तर केव्हाच तळं साचलेलंय... उनाड मुलं आईचा डोळा चुकवून पावसात चिंब भिजतायत... कागदी नावा पाण्यात सोडताना त्यांच्या चेह-यावरून ओसंडणारा आनंद पावसाइतकाच निर्मळ आणि कोवळा... येरे येरे पावसा म्हणत तळहातावर पावसाचे थेंब झेलू पाहणारी ही चिमुकली जगण्याचा खरा आनंद घेतायत... घराच्या गॅलरीत उभा राहून दिसणारं हे पावसाळी चित्र मनाला सुखावणारं... इतका अवखळ पाऊस पहिल्यांदाच भेटला घराच्या अंगणात तो असा.... वर्तमानपत्रांमधून इतके दिवस नुसताच कोरडा भेटणारा पाऊस आज प्रत्यक्ष अनुभवत होतो. पुस्तकाची पानं चाळावीत आणि अचानक कुठे तरी आपल्याला हवा तो परिच्छेद सापडावा, तसं काहीसं या पावसानं केलं. असंच होतं अनेकदा... एखाद्या प्रिय व्यक्तीच्या भेटीसाठी आपण आतुर व्हावं, पण त्याची खूप दिवस भेटच होऊ नये आणि कधीतरी अचानक नकळता ती व्यक्ती आपल्याला भेटायला यावी, तसा हा पाऊस आला... जूनच्या सुरूवातीला हजेरी लावून बरेच दिवस बुट्टी मारणारा पाऊस मला तर अगदी शाळा चुकवणा-या मुलासारखाच वाटला... पाऊस गायब झाला म्हणून अनेकांनी आभाळाकडं डोळे वटारूनही पाहिलं... पण, घाबरतो तो पाऊस कसला ? तो आपल्या मन मानेल तेव्हाच आला, एखाद्या मनस्वी मांजरासारखा... दूध पाहिजे तेव्हा आपल्याशी लगट करणारी मांजर आपण गोंजारू पाहतो तेव्हा आपल्याजवळ येते थोडंच ? तर असा हा पाऊस... खूप दिवसांनी आलाय. झाडंही त्या आनंदात चिंब होऊन अंघोळ केल्यासारखी हिरवी तुकतुकीत झालेली... सगळीकडे एक प्रकारचं अनामिक चैतन्य साठलेलं... खरंच कसे होतात नां हे वातावरणातले बदल ? कुणीच सांगू शकत नाही निसर्गाच्या मनात काय आहे ते... अगदी वेधशाळासुद्धा...! अहो माणसाच्या मनातलं त्याच्या चेह-यावरून वाचता तरी येतं.. पण, निसर्गाच्या मनातलं वाचायला आपणच पाऊस व्हावं लागतं...! आपणच आभाळाचं निळं निळं गाणं गावं लागतं... धुक्याच्या दुलईत डोंगर होऊन लपेटावं लागतं... काळ्याशार मातीतून अंकुरावं लागतं.... हिरव्या हिरव्या पानांतून वारा होऊन सळसळावं लागतं...! आज पाऊस खूप दिवसांनी आला म्हणूनच तर एवढं कवितेसारखं सुचू लागलं... शाईतून थेंब थेंब कागदावर झरू लागले आणि पावसाचं शब्दचित्र साकारू लागलं... काहींना नुसतीच कविकल्पना वाटेल, काहींना शब्दांचा फक्त फुलोरा वाटेल, काहींना यातून थोडंसं भिजल्याचा अनुभवही येईल तर काहींना कदाचित यातून काहीच जाणवणार नाही... पण, आपला पाऊस आपण अनुभवला पाहिजे, शक्य तितका तळहाताच्या ओंजळीत साठवला पाहिजे... मनाच्या आतून खोल खोल झरला पाहिजे.... कधी एकट्यानं तर कधी जोडीनं भिजत भिजत आठवणींच्या छत्रीत पाऊस झेलला पाहिजे... तेव्हा या मोसमात किमान एकदा तरी थोडं पाऊस होऊया, थोडा पाऊस पिऊया…
- दुर्गेश सोनार

Monday, 4 August 2008

मी कधीच नव्हतो माझा, माझेही नव्हते कोणी
का तरीही दाटून आले तुझिया डोळां पाणी ?

Friday, 23 May 2008

विजय तेंडुलकर

विजय तेंडुलकर यांचे अल्पचरित्रविजय तेंडुलकरांचा जन्म सहा जानेवारी १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. त्यांच्याकडून प्रारंभीचे संस्कार तेंडुलकरांना मिळाले. तसेच दि. बा. मोकाशी, वि. वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांच्या लेखनातूनही काही संस्कार झाले.मनस्वी नाटककार - विजय तेंडुलकरांचा जन्म सहा जानेवारी १९२८ रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे वडील धोंडोपंत हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. त्यांच्याकडून प्रारंभीचे संस्कार तेंडुलकरांना मिळाले. तसेच दि. बा. मोकाशी, वि. वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांच्या लेखनातूनही काही संस्कार झाले. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सहभाग होता. साहजिकच विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुणे आणि मुंबईत त्यांचा बराचसा काळ व्यतीत झाला; पण हे दिवस अस्थिरतेचे होते. १९६६ नंतर मात्र ते मुं बईतच राहिले आणि तीच त्यांची कर्मभूमी बनली. १९५५ पासूनच त्यांची लेखणी तळपू लागली होती. चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी वृत्तपत्रव्यवसाय स्वीकारला. "नवभारत', "मराठा', "लोकसत्ता', "नवयुग', "वसुधा' आदी वृत्तपत्रे आणि नियतकालिकांतून त्यांनी संपादन आणि सदरलेखनाचे काम केले. १९४८ मध्ये "आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची पहिली कथा प्रकाशित झाली. "रात्र' ही त्यांची अतिशय गाजलेली एकांकिका! १९५० नंतर अस्तित्वात आलेल्या मराठी नाटककारांच्या नव्या पिढीच्या अग्रभागी विजय तेंडुलकर यांची लेखनमुद्रा स्वतःच्या खास बाजाने तळपत राहिली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. नभोवाणीसाठीही त्यांनी नाट्यलेखन केले. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले विषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी संबंधित होते. लेखनदृष्ट्या "गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ मध्ये पुनर्लेखन केले) मात्र "श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील पहिले नाटक! तेव्हापासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून "तें' मनस्वीपणे लिहीत गेले. "शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या प्रयोगशील आणि संवेदनशील लेखणीने हात घातला. "सखाराम बाईंडर'मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि "घाशीरा म'मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या- जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली. "माणूस नावाचे बेट', "मधल्या भिंती', "सरी गं सरी', "एक हट्टी मुलगी', "अशी पाखरे येती', "गिधाडे', "छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन स ंघर्षही झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले. नाटकांबरोबरच लघुकथा, ललित साहित्यातही सामाजिक समस्यांमुळे अस्वस्थ आणि हळुवार बनलेला "तें'मधला लेखक वाचकांना भावला. चित्रपट माध्यमही त्यांनी तितक्‍याच ताकदीने हाताळले. "सामना', "सिंहासन', "आक्रीत', "उंबरठा', "अर्धसत्य', "आक्रोश', "आघात' आदी चित्रपटांच्या पटकथांवर खास तेंडुलकरी ठसा होता. "स्वयंसिद्धा' या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. मानवी मनाचे, त्यातही त्याच्या कुरूपतेचे चित्रण करून अशा व्यक्तिरेखांना समजून घेण्यात, त्यांचे जीवन मांडताना घडते-बिघडते संबंध, त्यातील ताण, त्या अनुषंगाने व्यवस्थांचे बंदिस्तपण टिपण्यात त्यांची लेखणी रमते, काव्य-कारुण्य, व्यक्ती- समाज, वास्तव-फॅन्टसी यांची कलात्मक सरमिसळ त्यांच्या नाटकांत आढळते. नवनाट्य, वास्तववाद यांच्याशी त्यांच्या लेखनाचे आंतरिक नाते दिसते. तरीही त्यांच्यावर कोणताही शिक्का मारता येत नाही इतकी प्रयोगशीलता दिसते. "देशातील वाढता हिंसाचार' या विषयाच्या अभ्यासासाठी त्यांना १९७३-७४ मध्ये नेहरू शिष्यवृत्ती मिळाली होती. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणाऱ्या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांशी त्यांचा जिव्हाळा होता. "जनस्थाना'चा मानकरी - कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या "जनस्थान पुरस्कारा'चे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, १९७७ मध्ये "मंथन'साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये "आक्रोश' चित्रपटासाठी "फिल्म फेअर'चा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये "अर्धसत्य'साठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी "फिल्म फेअर' पुरस्कार त्यांना मिळाला. "पद्मभूषण', "महाराष्ट्र गौरव', "सरस्वती सन्मान', मध्य प्रदेश सरकारचा "कालिदास सन्मान', विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु. ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. १९९८ मध्ये संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्तीही त्यांना मिळाली होती. "तें'च्या लेखनाबरोबरच त्यांच्या मुलाखतीही तितक्‍याच गाजल्या. त्यातून अनेक वादविवादही झडले. त्यांचा स्वभावच वादळे अंगावर घेण्याचा. त्यातूनच "हजारो लोकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त करणारी माणसे आज समाजात आहेत. त्यांचे मारेकरी होण्यास मला आवडेल,' असे जळजळीत उद्‌गारही बाहेर पडले. पुरस्कार स्वीकारताना जाहीर व्यासपीठावरून "आमच्या पिढीने स्वतःलाच फसवले,' अशी खंतही तितक्‍याच सहजपणे व्यक्त झाली. साहित्य निर्मिती, नाटके व एकांकिका - गृहस्थ, श्रीमंत, गिधाडे, सखाराम बाईंडर, घाशीराम कोतवाल, शांतता कोर्ट चालू आहे, अशी पाखरे येती, कन्यादान, मधल्या भिंती, चिमणीचं घर होतं मेणाचं, छिन्न, माणूस नावाचे बेट, कावळ्याची शाळा, अजगर आणि गंधर्व, एक हट्टी मुलगी, भेकड, मी जिंकलो मी हरलो, सरी गं सरी, झाला अनंत हनुमंत, घरटे अमुचे छान, द्वंबदीपाचा मुकाबला, भल्या काका, भाऊ मुरारराव, बेबी, पाहिजे, कमला, मादी (हिंदी), मित्राची गोष्ट, देवाची माणसे. एकांकिका - रात्र आणि इतर एकांकिका, अजगर आणि गंधर्व, थीफ ः पोलिस. बालनाट्ये - इथे बाळे मिळतात, पाटलाच्या पोरीचे लगीन, चिमणा बांधतो बंगला, चांभारचौकशीचे नाटक, मुलांसाठी तीन नाटिका. चित्रपट पटकथा - सामना, सिंहासन, उंबरठा, चिमणराव, शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल, आक्रीत, अर्धसत्य, २२ जून १८९७, प्रार्थना, निशांत, मंथन, आक्रोश, कमला, गहराई, ये है चक्कड बक्कड बूम्बे बू. मालिका - स्वयंसिद्धा. टॉक शो - प्रिया तेंडुलकर टॉक शो. नाट्यविषयक लेखन - नाटक आणि मी. ललित - कोवळी उन्हे, रातराणी, फुगे साबणाचे, रामप्रहर. कथा - काचपात्रे, गाणे, फुलपाखरू, द्वंद्व, मेषपात्रे. संपादने - दिवाकरांच्या नाट्यछटा, समाजवेध. भाषांतरे ः वासनाचक्र (टेनेसी विल्यम्सच्या "स्ट्रीटकार नेम्ड्‌ डिझायर'चे भाषांतर), "लोभ असावा ही विनंती' (जॉन मार्क पॅट्रिकच्या "हेस्टी हार्ट'चे भाषांतर), "आधेअधुरे' (मोहन राकेश), "तुघलक' (गिरीश कर्नाड), चित्त्याच्या मागावर. विविध लेखन - लिंकन यांचे अखेरचे दिवस. कादंबरी - कादंबरी एक आणि दोन. माहितीपट - तेंडुलकर आणि हिंसा (अतुल पेठे).

Monday, 7 January 2008

जमिनीत घट्ट मूळ धरलेल्या झाडांनाही

जमिनीत घट्ट मूळ धरलेल्या झाडांनाही
खुणावत असते आभाळाची उंची !
म्हणून तर झाडे
आपल्या हिरव्यागार फांद्या उंचावून
आभाळाला साद घालत राहतात !
निळ्या नभांगणात
मुक्त बागडून पाखरं जेव्हा
फांद्यांवर विसावतात,
तेव्हा झाडं सांगतात पाखरांना
मनातलं हिरवं गूज
आणि कुरवाळत राहतात निळ्या स्वप्नांना...
आभाळाला जेव्हा उमगतं
झाडांचं हे आभाळपण
तेव्हा आभाळालाही भरून येतं
आणि मग रिमझिम निळ्या गाण्यात
हिरवं बीज रुजून येतं....!
- दुर्गेश सोनार

माझ्या कवितेने

माझ्या कवितेने गावी
माझ्या गावाचीच गाणी
शब्दांतुनी या झरावे
चंद्रभागेचे ते पाणी

माझ्या शब्दांना लाभावा
हरिकिर्तनाचा संग
शब्द होता पुंडलिक
सखा भेटे पांडुरंग

टाळ मृदुंग ऐकता
देहभान हरपावे
तसे माझ्या कवितेने
वेड जिवांस लावावे

सा-या अर्थ नी शब्दांचे
त्यात अद्वैत साधावे
माझ्या कवितेला भाग्य
असे अनोखे लाभावे

- दुर्गेश सोनार