Wednesday 31 December, 2008

सरत्या वर्षाला निरोप देताना....

आणखी एक वर्ष संपणार... कालचक्र चालत असतं आणि आपणही त्याच्यासोबत एकेक दिवस पुढे पुढे जात असतो. वर्षभरातले काही आनंदाचे तर काही दुःखाचे क्षण साठवत आपण आपल्या आयुष्याची वाटचाल पुढे सुरू ठेवत असतो. मुळातच माणसांचा स्वभाव उत्सवप्रिय.... त्यामुळे आयुष्यातला प्रत्येक क्षण कोणत्या ना कोणत्या स्वरुपात साजरा करणं याकडे जवळपास प्रत्येकाचाच कल असतो. जन्मापासून मृत्युपर्यंत जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणूस कोणत्या ना कोणत्या निमित्तानं सेलिब्रेट करत असतो. जन्माला आलेल्या बाळाचं नाव ठेवण्यासाठीचं बारसं असेल, नाही तर लग्नकार्य.... वाढदिवस असेल, नाही तर एखादा सणसमारंभ.... एकूणच काय प्रत्येक क्षण आनंदात घालवायचा ही मनुष्यप्रवृत्ती... त्याला थर्टी फर्स्ट तरी कसा अपवाद असेल..? पण, यंदाचा थर्टी फर्स्ट त्याला अपवाद आहे. यंदा त्याला किनार आहे मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यांची... २६ नोव्हेंबरला मुंबईवर अतिरेक्यांनी हल्ले केले, त्यात कित्येक लोक बळी पडले, काही पोलिस अधिकारी, जवान शहीद झाले. सुरक्षा व्यवस्थेला भेदत अतिरेक्यांनी सर्वसामान्य  लोकांवर केलेला हल्ला नक्कीच हादरवणारा होता. त्यातून लोक आता सावरतायत. याच  सावटाखाली आलेला यंदाचा थर्टी फर्स्ट तितकासा चिअरफुल नसेल... पण, येणारं नवं वर्ष नवी उमेद घेऊन येणारं असेल.. सरत्या वर्षात राहिलेल्या त्रुटींवर, अपयशावर मात करत नव्या वर्षातल्या नव्या आव्हानांना सामोरं जाणं यातली खुमारी काही औरच आहे. जुनी पानं गळतात आणि झाडाच्या फांद्यांवर नव्या पानांची हिरवी चाहूल लागते. बुंध्याशी साचलेला पालापाचोळा झाडाच्या एकेकाळच्या हिरव्या वैभवाची साक्ष देत वा-यावरती सळसळत राहतो. त्याचवेळी झाड नव्या पालवीनं मोहरत असतं. जुन्याच्या अस्तातच नव्याचा उदय दडलेला असतो, हे तर सृष्टीतलं सनातन वास्तव... जुनी पानं झडली म्हणून झाड कधी खट्टू होतं का? वसंत येणार म्हणून झाड पुन्हा मोहरतंच नां? हुरहूर लावणा-या कातरवेळी भिववणा-या संध्याछाया थोड्याच वेळासाठी असतात, त्यानंतर अंगणात रातराणीचा गंध दरवळतोच नां? काळ्याकुट्ट रात्रीनंतर हलक्या पावलांनी दवारली सकाळ होतेच नां ? सूर्योदय होण्यासाठी आदल्या दिवशी सूर्यालाही अस्तंगत व्हावंच लागतं नां? जुनं जाणार आणि नवं येणार हा तर सृष्टीचा नियमच आहे. जुनं ते सोनं हे खरं असलं तरी जुन्याचाच सोस असता कामा नये आणि त्याचप्रमाणे नवं तेच चांगलं, असं म्हणत  नव्याचाच उदो उदो करणंही चुकीचंच... हे सगळं वाटण्याचं कारण म्हणजे आजचा थर्टी फर्स्ट... गेलेल्या क्षणांमध्ये गुरफटून न बसता येणारा प्रत्येक क्षण संस्मरणीय कसा करता येईल, तो आपल्या ओंजळीत कसा धरून ठेवता येईल, याचा विचार सरत्या वर्षाला निरोप देताना केला पाहिजे. आपल्या चाकोरीबद्ध जगण्यातून आनंदाचे चार क्षण अनुभवायला मिळणार असतील, तर थर्टी फर्स्ट साजरा करण्यात गैर ते काय ?  नाही तर कालाय तस्मै नमः म्हणत काळाच्या उदरात गुडूप होणं हे ओघानं आलंच...! असो, नव्या वर्षाच्या शुभेच्छांसह तूर्त लेखनविराम... 

– दुर्गेश सोनार