Tuesday 24 February, 2009

शंख, मासा आणि सोमनाथदांचा वैताग...!

भाजपनं यंदा लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदी बसवायचंच असा चंग बांधलाय. त्यासाठी मुंबईत अडवाणींचा जाहीर सत्कार झाला. अकरा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधीही त्यांना देण्यात आला. पण, यात एक गंमत झाली. हा परिस्थितीजन्य विनोद म्हणा किंवा नियतीनं दिलेले संकेत म्हणा... काहीही म्हणा, पण, या कार्यक्रमात लालकृष्ण अडवाणी यांचे शंख वाजवण्याचे प्रयत्न व्यर्थ ठरले. एरवी सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विरोधात शंख करण्यात अडवाणींचा हात कुणी धरत नाही. पण, खरोखरचा शंख वाजवायची जेव्हा वेळ आली तेव्हा अडवाणी यांची हवा थोडी कमीच पडली. दोनतीनदा शंख वाजवण्याचा आटापिटा अडवाणींनी केला खरा... पण, शंख अजिबातच वाजत नाही हे लक्षात येताच त्यांनी तो बाजूला केला. त्यामुळेच लाल'कृष्णाचा शंख न वाजण्याचा झालेला हा (अप)शकुन भाजपला काय फळ देणार हे येत्या काळात स्पष्ट होईलच... ( पण, म्हणून काँग्रेस आणि त्याच्या मित्रपक्षांनी आताच हुरळून जाऊन चालणार नाही. कारण याच सभेत अडवाणींनी आपल्या शब्दांचा शंखनाद चांगलाच केलाय. )

******

निवडणुका आता जवळ आल्यात, हे सांगायला आता कुणा ज्योतिषाची गरज नाही. सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते आपल्या भाषणांमधून, जाहीर सभांमधून त्याचा डंका पिटू लागलेत. या जाहीर सभांमधून होणारी भाषणं मुळातूनच ऐकण्यासारखी असतात. आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या नेत्यांना शाब्दिक बाणांनी कसे घायाळ करता येईल, याची हरेक संधी प्रत्येक नेते शोधत असतात.  त्यासाठी वाट्टेल त्या उपमा द्यायलाही हे नेते मागेपुढे बघत नाहीत. आता नरेंद्र मोदींचंच उदाहरण घ्या नां... परवा ते गोव्यात गेले होते. तिथल्या एका सभेत त्यांनी काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांना लक्ष्य केलं. राहुल गांधी हा शोभेचा मासा आहे, अशा शब्दांत मोदींनी त्यांची खिल्ली उडवली. काँग्रेसमधले नेते हे संरक्षित वातावरणात मजेत वावरणारे शोभेचे मासे आहेत आणि भाजपमधले नेते म्हणजे महासागरात आव्हानांच्या लाटा झेलणारे मासे आहेत, अशी मत्स्यतुलना मोदींनी केली. गोव्यात आल्यानंतर माशांशिवाय दुसरी कुठली उपमा सुचणार, नाही का ? असो... हे झालं मोदींचं कवित्व... पण, काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनाही प्रत्युत्तर देण्याची खुमखुमी आली आणि मोदींच्याच उपमेचा आधार घेत त्यांनी पलटवार केला. मोदी म्हणजे माणसे खाणारा पिरान्हा जातीचा मासा आहे, अशी उलट टीका तिवारीबाबूंनी केली. तर असं हे आरोप प्रत्यारोपांचं मत्स्यपुराण...

******

संसदेचं या टर्ममधलं शेवटचं अधिवेशनही अंतिम टप्प्यात आलंय. या अधिवेशनातही खासदारांनी आपली गोंधळाची परंपरा कायम ठेवली. त्यामुळे खासदारांचे हेडमास्टर असलेले सोमनाथदा चांगलेच वैतागले. अरे, तुम्ही असे वागता,  तुम्हाला पुन्हा कुणी निवडून तरी देईल का ?’ असं सोमनाथदांनी खासदारांना बजावलं देखील... पण, पुन्हा हे काही सुधारणार नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी सगळ्या खासदारांना निवडून येण्याच्या शुभेच्छा देत कानात बोळे घालून घेतले. भारतीय लोकशाही साठीकडे झुकली असतानाच आपल्या लोकप्रतिनिधींनी संसदेत केलेलं प्रदर्शन सध्याचं वास्तव सांगायला पुरेसं आहे. मतदार राजा सुजाण आहे, त्याला कोणाला उचलून धरायचं आणि कुणाला उचलून आपटायचं हे चांगलंच माहिती आहे.  त्यामुळेच बा, मतदारराजा ! जागा राहा, आणि सत्तांधांना त्यांची जागा दाखव रे बाबा....!

******

-         दुर्गेश सोनार ( २४  फेब्रुवारी २००९ )

 

Thursday 5 February, 2009

चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं...!

मोरोपंत सकाळपासूनच अस्वस्थ होते. ज्यांना कधी एकही ओळ धड लिहिता आली नाही, त्यांनी कवितांचे व्याकरण शिकवावे म्हणजे काय ? असा सवाल त्यांच्या मनात घोळत होता. त्याला कारणही तसंच होतं. कवितेसंबंधी नवी मुंबईत कोमसापने भरवलेल्या चर्चासत्रात काही समीक्षकांनी १९७० ते १९९० या कालावधीतल्या कविता या कविताच नाहीत, असा विसंवादी सूर लावून धरला होता. त्याची साद्यंत बातमी वाचून मोरोपंत अस्वस्थ झाले. कविवर्य ग्रेस यांची कविता असेल दुर्बोध, पण म्हणून ती कविताच नाही की काय ? असे म्हणण्याचे धारिष्ट्य हे तथाकथित समीक्षक करूच कसे शकतात ? ज्यांचे आयुष्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर पंचेचाळीस मिनिटांचे पाठ केलेले लेक्चर देण्यात गेले आणि वर्षानुवर्षे तोच तो अभ्यासक्रम शिकवून ज्यांच्या बुद्धीवर गंज चढला, त्यांना कविता ती कशी आकळावी ? हे परंपरागत चौकटीत अडकलेले आणि एकाच ठिकाणी बसून बसून बौद्धीक बद्धकोष्ठ झालेले समीक्षक छातीठोकपणे सांगतात की, १९७० ते १९९० या काळातल्या कवितेतून सामाजिक अभिव्यक्ती झालीच नाही. या काळातले कवी रोमँटीसिझममध्येच अडकले. असल्या या समीक्षकी बाण्यामुळे मोरोपंत कमालीचे व्यथित झालेले... त्यांनी तडक आपल्या बुकशेल्फातून ग्रेसच्या संध्याकाळच्या कविता काढल्या. एकेक कविता वाचत गेले...  शुभ्र अस्थींच्या धुक्यात, खोल दिठींतली वेणा... निळ्या आकाशरेषेत, जळे भगवी वासना...  , अंधार असा घनभारी, चंद्रातून चंद्र बुडाले... स्मरणाचा उत्सव जागुन, जणुं दुःख घराला आले.... गुतंवता मिठी, गर्द झाले श्वास, सुजले आकाश पाठीवरी... अशा रंगापाशी, मातीचे चांदणे, अल्याडचे जिणे, जन्माआधी...  पाऊस कधीचा पडतो,  झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सूराने.... घरांनी आपली दारे बंद केलेली असतात, डोळ्यांना वेढून बसलेल्या अस्तित्वांच्या रांगाही निवून जातात... तुला पाहिले मी नदीच्या किनारी, तुझे केस पाठीवरी मोकळे, इथे दाट छायांतुनी रंग गळतात, या वृक्षमाळेतले सावळे... या आणि या सारख्या कितीतरी कविता मोरोपंत वाचत गेले... एवढी समृद्ध शब्दकळा आणि त्यातून उलगडत जाणारे अर्थांचे अनेकांगी पदर... नित्य नूतन भासिजे... त्याप्रमाणे ग्रेस यांच्या कवितांमधून व्यक्त होत जाणाऱ्या अर्थांच्या लडी... त्यांनी वापरलेले शब्द दुर्बोध आणि बोजड आहेत, हे निःसंशय... पण, म्हणून त्याचा अर्थ माहिती करून घेण्याचा प्रयत्नच न करता, त्यांच्यावर सरसकट कविताच नाहीत त्या फक्त कवितांचा आभास निर्माण करतात, असं म्हणणं म्हणजे शुद्ध वेडगळपणा आहे. असं विधान करणाऱ्या समीक्षकांची मराठीची जाणच मुळातून तपासली पाहिजे. प्रतिमा आणि प्रतिकांमधून व्यक्त होणारी कविची प्रतिभा एखादा समीक्षक नाकारूच कसा शकतो ? बरं ग्रेस यांच्याबाबत बोलणं टाळलं, तरी याच वीस वर्षांत मंगेश पाडगावकरांचा आलेला सलाम या कवितासंग्रह विसरून कसे चालेल ? पाडगावकरांची सलाम ही कविता सामाजिक अभिव्यक्ती करत नाही, त्यात फक्त रोमँटीसिझम आहे, असा निष्कर्ष काढणं कुणाला तरी पटेल का ? एकूणच भाषण म्हणजे नुसता वारा... असा समज त्या बोलघेवड्या समीक्षकांचा असावा... सत्तर ते नव्वदच्या वीस वर्षांत ग्रेस पाडगावकरांबरोबरच वसंत बापट, विंदा करंदीकर ही कवित्रयी फुल फॉर्मातच होती. माझे विद्यापीठमधून कवितेतून सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधणारे नारायण सुर्वे यांचेही सनदसारखे कवितासंग्रह या काळात प्रकाशित झाले आहेत नां ? सुर्व्यांच्या कविता रोमँटिसिझममध्ये अडकल्या आहेत काय ? त्यांना सामाजिक परिमाण नाही काय ? नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता असेल किंवा यशवंत मनोहरांचा उत्थानगुंफा सारखा कवितासंग्रह असेल... केशव मेश्राम यांच्यासारखे दलित जाणिवांतून लिहिणारे कवीही याच काळात पूर्ण भरात होते. त्यांची संवेदना ही सामाजिक संवेदना नाही काय ? नामदेव ढसाळ यांची गोलपीठामधून व्यक्त होणारी सामाजिक अभिव्यक्ती ही या झापडबंद समीक्षकांना दिसली नाही काय ? विठ्ठल वाघ यांच्याही वृक्षसूक्त, काळ्या मातीत माती मधून प्रतीत होणाऱ्या संवेदना या रोमँटिक आहेत काय ? ना.धों. महानोर यांच्या रानातल्या कवितांनंतर ग्रामीण भागातून लिहू लागलेली एक समृद्ध पिढीच मराठीला कवितेला मिळाली. त्यांच्या ग्रामीण संवेदना या काय सामाजिक प्रतिबिंब मांडणाऱ्या नव्हत्या ? यात इंद्रजीत भालेराव, नारायण सुमंत, प्रकाश घोडके, प्रकाश होळकर अशी कितीतरी नावं सांगता येतील... आता आघाडीचे कवी म्हणून यांची नाव घेतली जातात. पण, या सगळ्या कविंचा मशागतीचा काळ हा याच वीस वर्षांतला आहे, हे विसरून कसे चालेल. काट्याकुट्याचा तुडवित रस्ता माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता अशी ग्रामीण वेदनेची कविता लिहिणाऱ्या इंद्रजीत भालेराव यांच्या कवितांना सामाजिकतेचे भान नाही ? नारायण सुमंत यांची वरकरणी मंचीय वाटणारी पण, तितकीच आत डोकवायला लावणारी ग्रामीण मराठी कविता ही सर्वार्थाने सामाजिकच आहे. प्रकाश घोडके यांच्या कवितांमध्ये तर दलित जाणिवांचा एक अंतःस्थ सूर नक्कीच जाणवतो.  आभाळ झडतं, आभाळ झडतं गं, उपाशी पोटी पाण्याच्या घोटी, सपान पडतं गं... चिरेबंदी बांधलेलं, असं तुझं गाव खोटं, वेशीपाशी आलो, अन् बंद झाली वहिवाट, काळजाच्या आत कुठं मन रडतं गं, आभाळ झडतं गं...  प्रकाश घोडकेंच्या या कवितेतून व्यक्त झालेली नाकारले गेल्याची वेदना विद्यापीठीय समीक्षकांना कधी कळणार ?  बुकशेल्फातली अशी एक ना अनेक कवितांची पुस्तकं, त्यातल्या एकेक कविता आणि त्यातून रंगत गेलेली सामाजिक संवेदनांची मैफिल मोरोपंताच्या मनात रंगत गेली. मूठभर समीक्षकांच्या असल्या विद्यापीठीय निकषांमुळे चांगल्या कवितांची वहिवाट अशी वेशीपाशी बंद झाल्याचं पाहून मोरोपंतांचं मनही असंच काळजाच्या आत कुठं रडत राहिलं आणि मनाच्या आत दडलेलं आभाळही झडत राहिलं....!

-         दुर्गेश सोनार ( दिनांक ५ फेब्रुवारी २००९ )