Thursday 22 November, 2012

कसाब – एक दंतकथा...!


मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी महमंद अजमल आमीर कसाब याला बुधवारी ( दि. २१ नोव्हेंबर) येरवडा कारागृहात सकाळी साडे सात वाजता फासावर लटकवण्यात आलं. या घटनेचे वार्तांकन बुधवारी दिवसभर सगळ्याच न्यूज चॅनेल्सवर सुरू होते. घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सर्वच वर्तमानपत्रांमध्येही कसाबच्या फाशीचे विविध अँगल घेऊन रकानेच्या रकाने भरले गेले आहेत. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनी त्यांच्या त्यांच्या सोर्सेसमधून काही ना काही एक्स्लुसिव्ह किंवा वेगळं देण्याचा जो काही आटापिटा केला आहे, त्यातून अनेक गमतीजमती घडलेल्या दिसून येतात. मुळात कसाबला फाशी देण्यासाठी जे ऑपरेशन एक्स राबवले गेले, त्या बाबत कमालीची गोपनीयता बाळगली गेली. त्यामुळेच त्यातले तथ्य माध्यमांपर्यंत कितपत पोहोचले असेल हा एक संशोधनाचाच विषय आहे. या ऑपरेशन एक्समध्ये जे काही मोजके वरिष्ठ अधिकारी होते, त्यांनी बहुतेक सर्वच माध्यमांना प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. पण, त्यात कोणत्याही अधिकाऱ्याने ऑपरेशन एक्स नेमकं कसं पार पडलं, त्याचे कुठलेही सविस्तर तपशील दिलेले नाहीत. त्यामुळेच ऑपरेशन एक्सच्या अंमलबजावणीबाबत जे काही चित्र माध्यमांनी मांडले आहे, त्यात बऱ्याच अंशी कल्पनारंजन किंवा कल्पनाविलास असल्याचेच जाणवते. जोपर्यंत ऑपरेशन एक्सची अधिकृत माहिती त्या मोहिमेत सहभागी असलेल्या जबाबदार अधिकाऱ्याकडून सांगितली जात नाही, तो पर्यंत कसाबला दिलेली फाशी ही एक दंतकथाच बनून राहणार आहे.

कसाबला ऑर्थर रोड कारागृहातील अंडा सेलमधून बाहेर काढून येरवडा कारागृहात नेईपर्यंत आणि नंतर त्याला फासावर लटकावून त्याचा मृतदेह दफन करेपर्यंत इतकी गोपनीयता बाळगली गेली आहे, की नेमके काय घडले असेल याचा तर्कवितर्क लढवण्यातच बहुतेक सर्वच माध्यमांची दमछाक झाली असावी. त्यामुळेच जे काही वार्तांकन केले गेले, त्यात अनेक ठिकाणी सुरस सुरम्य कथा रंगवल्या गेल्याचे स्पष्टपणे जाणवते. या कथा अशा काही रंगवल्या आहेत की, त्या वाचून एखाद्या कसलेल्या साहित्यिकालाही त्याचा हेवाच वाटेल.

एका इंग्रजी वर्तमानपत्रात फासावर लटकावणाऱ्यापूर्वी कसाबने काय काय केले, याची एक सुरस फीचर स्टोरी छापण्यात आली आहे. यात कसाबला येरवडा कारागृहातील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आले होते, तेव्हा तो 'खुदा गवाह' या हिंदी सिनेमातील "ना जा ओ मेरे बादशाह, एक वादे के लिए एक वादा तोड के”, हे गाणे गात होता, असं म्हटलंय. आता यातलं खरं खोटं त्या कसाबला आणि त्या बातमीदाराच्या सोर्सलाच माहित ! इतकंच नाही तर सकाळी सकाळी उठल्यावर कसाब म्हणे चक्क दोन कप मसाला चहा प्यायला...! बरं, कसाबने साधंसुधं पाणी नाही तर चार बाटल्या मिनरल वॉटर प्यायल्याचे तपशीलही या इंग्रजी दैनिकाने छापले आहेत. तर दुसऱ्या एका इंग्रजी दैनिकात याच्या नेमकी उलटी माहिती देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री कसाबला फाशीची कल्पना देण्यात आल्यानंतर त्याने त्या रात्री काहीही खाल्ले किंवा प्यायले नाही. तसंच तो भीतीने कापत होता आणि त्याला रात्रभर झोप नव्हती, असं त्या बातमीत म्हटलंय.
आणखी एका इंग्रजी दैनिकात अशीच एक बातमी वाचायला मिळाली. म्हणे, कसाबला जेव्हा फासावर लटकवण्यात येणार आहे, असं सांगण्यात आलं, तेव्हा तो फक्त हसला. आणि नंतर फाशीस्तंभाकडे नेत असताना त्याच्या चेहऱ्यावर कसल्याही प्रकारची भीती नव्हती. आता नियमांप्रमाणे म्हणाल तर ज्याला फाशी द्यायची आहे, त्याला फाशीस्तंभाकडे नेण्यापूर्वीच त्याच्या चेहऱ्यावर बुरखा घालतात. त्यामुळे कसाबच्या चेहऱ्यावर कसलीही भीती नव्हती, हे कुठल्या माहितीच्या आधारे लिहिले आहे, हे त्या वर्तमानपत्राच्या बातमीदारालाच माहित...!

आणखी एका गोष्टीची गंमत वाटली. ती म्हणजे कसाबला नेमक्या कोणत्या जल्लादाने फासावर लटकावले, यावरूनही प्रत्येक वर्तमानपत्रांत वेगवेगळी माहिती वाचायला मिळाली. एका मराठी वर्तमानपत्राने तर चक्क तीन जल्लादांनी कसाबला फाशी दिल्याचं म्हटलंय. तर काही वर्तमानपत्रांनी जल्लाद नसल्याने तुरुंग अधिकाऱ्यानेच फाशीचा खटका दाबल्याचे गृहमंत्र्यांचा हवाला देत म्हटलंय. तसंच, नेमक्या कोणत्या दिवशी आपल्याला फासावर लटकावले जाणार आहे, याची पूर्वकल्पना कसाबला देण्यात आली होती, याचीही बातमी बहुतेक सगळ्याच वर्तमानपत्रांनी ठळकपणे छापली आहे. मुळात डेथ वॉरंट आधीच संबंधित व्यक्तीला वाचून दाखवले जाते. तसेच ते कसाबलाही हिंदी आणि उर्दू भाषेतून वाचून दाखवण्यात आले होते. हा फाशीच्या प्रक्रियेचाच भाग आहे. त्यामुळे कसाबला आपल्या फाशीची तारीख आधीच माहिती होती, हे सांगून माध्यमांनी उगाचच वेगळी माहिती दिल्याचा आव आणला आहे, हेही स्पष्टपणे जाणवते.

मध्यंतरी कसाबला डेंगी झाल्याची बातमीही सगळ्याच प्रसारमाध्यमांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाली होती. त्यात भर म्हणून कसाबवर मध्यंतरी हर्नियाचे उपचार करण्यात आले होते आणि त्याला एक आठवडा मुंबईतल्या सेंट जॉर्ज रुग्णालयात ठेवण्यात आले होते, अशीही एक बातमी समोर आली. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कसाबला सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, याची रुग्णालयातल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना सूतराम कल्पनाही नव्हती म्हणे...! आता या बातमीत तथ्य कितपत आहे हे त्या वर्तमानपत्राच्या बातमीदारालाच ठाऊक...!

कसाबला बिर्याणी दिली जात असल्याच्या बातम्याही जेव्हा कसाबचा खटला सुरू होता, तेव्हा यायच्या. मात्र, आता त्याला फाशी दिल्यानंतर ज्या बातम्या आल्या आहेत, त्यात कसाबला त्याच्या तुरुंगातील वास्तव्यादरम्यान कधीही मांसाहारी जेवण दिले नव्हते, असा उल्लेख आढळून आला. याचाच अर्थ यापूर्वी कसाबला बिर्याणी दिली जात असल्याच्या आलेल्या बातम्या म्हणजे अर्थातच हवेत सोडलेले पतंग होते. तुरुंगाच्या नियमांनुसार कसाबला शाकाहारी जेवणच दिले जायचे आणि कधी कधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला अंडी दिली जात असत, असं एका बातमीत स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळेच कसाब आणि त्याचे खाणे ही सुद्धा एक दंतकथाच म्हणावी लागेल.

आता सर्वसामान्य लोकांना हे वाचून खरंच गंमत वाटली असेल. अनेकांचं कुतूहल यामुळे शमलेही असेल. तर काही जणांचं कुतूहल यामुळे आणखी वाढले असेल, हे नक्की. सर्वसामान्य माणसांना कसाबच्या फाशीच्या अनुषंगाने मनात जे काही प्रश्न पडले असतील, त्याचे उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न केला, असा यावर माध्यमांचा दावा नक्कीच असू शकतो. तसा तो करण्यात काहीही गैर नाही. पण, हे करत असताना मर्यादांचे भानही राखायला हवे, असे वाटते.

दुर्गेश सोनार ( दिनांक 22 नोव्हेंबर 2012)