Tuesday 23 June, 2009

आषाढस्य प्रथम दिवसे....

पावसाचा सांगावा घेऊन आलेला ज्येष्ठ संपतो आणि आषाढाला सुरूवात होते. निळ्या-जांभळ्या मेघांनी आभाळ भरून येतं, गरजू लागतं. पावसाचे टपोरे थेंब ताल धरू लागतात. मध्येच वाराही उनाड मुलासारखा धिंगाणा घालतो. उकाड्यानं त्रस्त झालेल्या धरेला आषाढसरींचा शिडकावा हवाहवासा वाटतो. मातकट गंधानं उल्हसित झालेलं असं वातावरण होरपळल्या मनाला तजेला देतं. पावसाचं भरभरून दान देणारी ही आषाढवेळा म्हणूनच तर महाकवी कालिदासालाही भावली असावी. वारकऱ्यांना पंढरीची ओढ लागते तीही आषाढातच... एकीकडे मुक्तपणे बरसरणारा निळा पाऊस आणि दुसरीकडे भक्तीरसात चिंबवणारा सावळा पाऊस... सारी किमया आषाढाचीच... कवितांमधूनही त्याचं प्रतिबिंब उमटलं नाही तरच नवल.... कवी नारायण सुमंत लिहितात...
निळ्या वावरात दिंड्या
आल्या वाजवित टाळ
गर्जे आखाडी आभाळ
गर्जे आखाडी आभाळ...!
गडगडाट तो मृदुंग
विज प्रकाशे लकाका
माऊलीच्या पालखीची
जशी झळके पताका...!
आषाढसरींमध्ये माऊलींचा पालखी सोहळा अनुभवणं ही बातच काही और आहे... वैष्णवांचा देव असलेला विष्णूही निळा आणि आषाढात बरसणारा पाऊसही निळा... विठूमाऊलीच्या जयघोषात टाळ मृदुंगांचा गजर आणि त्याच्या जोडीला आषाढात गर्जणाऱ्या मेघांचा मल्हार... एका बाजूला उधाण वाऱ्यानं धरलेला फेर, तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीत वारकऱ्यांनी धरलेलं रिंगण.... पंढरीच्या दिशेनं पावलं चालत राहतात, भगव्या पताक्यांनी निळं आभाळ भरून जातं.. रंगांमधल्या समरसतेची प्रचिती देणारा हा आषाढ आणि त्याची साक्षात अनुभूती देणारा आषाढी वारीचा सोहळा.... नारायण सुमंतांसारख्या पंढरपूर परिसरातूनच लिहिता झालेल्या कवीला हे आषाढपण भावलं नाही तरच नवल.. सुमंत त्यांच्या आणखी एका कवितेत लिहितात...
थेंब आभाळी ना येतो
पूर भीमेसी ना येतो
तोच पंढरीचा काळा
माझ्या घामामंदी न्हातो...
अवघी सृष्टी पंढरी झाल्याचा हा दिव्य अनुभव... सुमंतांची ही काव्यानुभूती थेट संत सावता माळ्याशी नाळ जोडणारी आहे. `कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी`, असं म्हणणारे सावता माळी हेदेखील त्या अर्थी निसर्गकवीच म्हटले पाहिजेत... निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा मिलाफ आषाढात प्रकर्षानं प्रत्ययाला येतो. उन्हानं रापलेल्या काळ्या मातीला हिरवी झळाळी मिळते ती आषाढात... पुंडलिकाला भेटण्यासाठी जसा परब्रह्म आला तसाच पाऊसही धरेला भेटतो... जसा विठूमाऊलीचा अभंग आषाढात बहरतो, तसंच, धरेच्या ओटीपोटातून सृजनाचं हिरवं गाणं अंकुरतं.. शिवाराची वाटही मग पंढरीची वाटू लागते. नांगरणी झालेलं शिवार पेरतं होतं. पाटाच्या पाण्यात आषाढसरींचे थेंब असे मिसळतात की जशी चंद्रभागाच शिवारातून खळाळतं जाते... आषाढसरींचा हा सोहळा पदोपदी विठूरायाची आठवण करून देतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी मग माहेराची सय ताजी होते...
- दुर्गेश सोनार ( २३ जून २००९ )