Friday 19 February, 2010

शिक्षणाच्या ...... घो !

शाळेची घंटा झाली. वर्ग भरले. नवं शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरचा शाळेचा पहिलाच दिवस. सातवीतल्या वर्गात गटणे मास्तर हजेरीबुक घेऊन घुसले. सुस्मित वदनानं मास्तरांनी मुलांकडे पाहिलं. मुलांनीही ‘गुड मॉर्निंग सर...’ असं उच्चरवात मास्तरांचं स्वागत केलं. मास्तरांनी मग एकेका मुलाला त्यांचं नाव विचारायला सुरवात केली. एकेक करता करता त्यांनी एका मुलाला विचारलं, ‘व्हॉट इज युवर नेम ?’ त्यावर तो तप्तरतेनं उत्तरला, ‘माय नेम इज खान !’ असेल बुवा त्याचं नाव असं म्हणत मास्तरांनी पुढच्या मुलाकडे मोर्चा वळवला. त्याला त्याचं नाव विचारलं, तर तो खर्ज लावून म्हणाला, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...!’ अरे देवा, हा काय प्रकार असं म्हणत मास्तर एकदम बुचकळ्यात पडले. तितक्यात एक जण हातात झेंडा घेऊन उभा राहिला आणि मास्तरांना विचारू लागला, ‘आपली माणसं आपलीच माती, तरी मेंढराची कळपास भीती... या कवितेचा अर्थ काय ?’ मास्तर आणखीच गोंधळले. मराठीच्या अभ्यासक्रमात तर ही कविता कुठेच नाही आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना कवितेचा प्रश्न कसा काय पडावा, याचं मास्तरांना आश्चर्यच वाटलं. वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, ‘मुलांनो, आज तर पहिलाच दिवस आहे शाळेचा, यथावकाश आपण शिकणारच आहोत नां...!’ आता खडू घेऊन मास्तर फळ्याकडे वळले. बघतात तर काय, फळ्यावर मोठ्या अक्षरांत आधीच लिहून ठेवलेलं, ‘ब्रेकिंग न्यूज...!’ आता बोंबला... ‘हा काय प्रकार आहे ?’ मास्तरांनी त्रासिकपणे मुलांना विचारलं. मुलं एका सुरांत उत्तरली, आमच्या घरांत टीव्हीवर सतत सुरु असते ती ब्रेकिंग न्यूज... शाळेत तुम्ही जे शिकवता, त्याहीपेक्षा कितीतरी रंजक आणि सुरस गोष्टी आम्हाला ब्रेकिंग न्यूज मधूनच शिकायला मिळतात. आम्हाला तुमचं नेहमीचं पुस्तकबंद शिक्षण नकोय, आम्हाला असंच ब्रेकिंग न्यूजवालं चटपटीत, खुसखुशीत रंजक शिक्षण हवंय... म्हणजे बघा, युवराज राहुल गांधी मुंबईत आले. त्यांना शिवसेना काळे झेंडे दाखवणार होती. पण, राहुल भलतेच हुशार निघाले. त्यांनी थेट लोकल गाठली. तिकिटाला पैसे हवे म्हणून एटीएममधनं पैसे काढले. आता हे सगळे एवढे नाट्यमय थ्रिलर प्रकार आम्हाला कसे कळले, सांगा बरं मास्तर..? अहो, चोवीस तास चालणाऱ्या ब्रेकिंग न्यूजमधनंच तर आम्हाला ही अत्यंत उद् बोधक माहिती मिळाली. अहो, टीव्ही हे ज्ञानार्जनाचे उत्तम साधन आहे, हे काय उगाच थोरामोठ्यांनी लिहून ठेवलंय ? ....


मुलांच्या या भडिमारामुळे गटणे मास्तर अधिकच चक्रावले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच तासाला मुलांचे हे असे प्रश्न... म्हणजे माय नेम इज खानच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला शिवसैनिकांनी केलेला गोंधळच... अशी भावना मास्तरांची झाली. अरे हे काय आपल्यालाही सिनेमाचीच उपमा कशी काय आठवावी ? गटणे मास्तर आणखीनच कोड्यात पडले. क्षणभर डोळे मिटून घेतल्यावर त्यांना लक्षात आलं की, आपणही टीव्हीमय झालोय. आपणही ब्रेकिंग न्यूजच्या हॅमरिंगमुळे टीव्हीऍडिक्ट झालोय. आपलीही जर हीच अवस्था असेल, तर मुलांना तरी काय दोष द्यायचा ? घराघरांत टीव्ही आहे, त्यावर दिवसरात्र असंख्य तऱ्हेची चॅनेल्स सुरु असतात. ते पाहताना ना डोळे थकतात ना माणसं... हातात रिमोट असूनही त्यावर आपला कंट्रोल नाही... इतके का अधीन झालोय आपण... ? डोक्यात भंजाळल्यासारखं होत असतानाच तास संपल्याची घंटा झाली. मास्तर भानावर आले. हा एक तास संपला पण, बाहेरच्या तासांचे काय ? तिथे भंजाळल्यासारखी परिस्थिती असताना भानावर आणणारी अशी खरंच कोणती घंटा आहे ?

- दुर्गेश सोनार (20 फेब्रुवारी 2010)