Sunday 10 October, 2010

9 ऑक्टोबरच्या निमित्ताने

9 ऑक्टोबर... तसा इतर दिवसांसारखाच हाही एक दिवस.... पण, या दिवसाचं माझ्या लेखी फार वेगळं मोल आहे... कारण दुर्गेश दिगंबर सोनार या व्यक्तिमत्त्वाचा जन्म याच दिवशी झाला. पंढरपूर सारख्या छोट्या शहरात नवरात्रातल्या आठव्या माळेला म्हणजेच दुर्गाष्टमीला रात्री सव्वा अकरा - साडे अकराच्या सुमाराला माझा जन्म झाला. आता या गोष्टीला काल म्हणजे 9 ऑक्टोबरला 32 वर्षं पूर्ण झाली. आयुष्यातली ही एवढी वर्षं सरल्याची जाणीव होत असतानाच आता किती वर्षं उरलीयत याचीही एक गडद जाणीव मनात घोळतेय....

दिवसभरांत अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, एसएमएस केले, फोन केले, फेसबुक आणि ऑर्कुटवरही शुभेच्छा व्यक्त केल्या. ऑफिसमध्येही सहकाऱ्यांनी केक आणला.... हे सगळं करत असताना मी माझ्या बालपणात हरवून गेलो...  मला आठवतं... आम्ही शाळेत असताना आई बाबा आमच्या प्रत्येकाचा वाढदिवस मोठ्या हौसेने करायचे.. आमच्या शाळेतल्या सगळ्या मित्रमैत्रिणींना आवर्जून घरी बोलवायचे... त्यावेळेसचा मेनूही तसा ठरलेलाच असायचा... गोड पदार्थ म्हणून गुलामजामुन किंवा मला आवडतात म्हणून बेसन लाडू... पंढरपूरचे चिरमुरेही प्रसिद्ध... त्यामुळे आईने केलेला खमंग चिवडाही असायचा... कधी कधी आमच्या हट्टाखातर आई इडली सांबरही करायची...  बालपणी वाढदिवस म्हणजे खूप आनंदाचा दिवस असायचा... नवे कपडे घालायचे... मित्रमैत्रिणींसोबत आईने केलेला खाऊ खायचा... भेटवस्तू स्वीकारायच्या... खेळ खेळायचे.... असं बरंच काही.... या सगळ्यामध्ये आपलं वय वाढतंय याची जाणीव त्या काळात फारशी व्हायची नाही... ती जाणीव हळूहळू व्हायला लागली आणि माझा वाढदिवसाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपोआपच बदलला.

आता वाढदिवसाचे फारसे अप्रूप वाटत नाही. उलट आयुष्यातलं एक वर्षं संपल्याचं जाणवत राहतं... आता जी काही वर्षं उरली असतील, त्यामध्ये बरंच काही साध्य करायचं आहे... त्यासाठी करावी लागणारी मेहनत, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न... याची मला मनापासून जाणीव आहे. आजवरच्या आयुष्यात मला खूप काही मिळालंय... सुप्रियासारखी समजूतदार आयुष्याची जोडीदार आणि आमच्या संसारवेलीवर शताक्षीच्या रुपानं फुललेलं गोंडस फूल... दिवस कितीही कामात गेला, कितीही तणावाखाली गेला... तरी रात्री घरी आल्यानंतर शताक्षीचे बा बा बा बा असे बोबडे बोल ऐकले की सारं काही विसरून जातं... मन अगदी मोकळं मोकळं होऊन जातं... तिच्या दिवसेंदिवस प्रगल्भ होत जाणाऱ्या बाललीला... आपलं बालपण पुन्हा आपल्यासमोर येतं ते असं... तिचं असं वाढणं.... मी पाहत राहतो.... आता तिचेच वाढदिवस....

- दुर्गेश सोनार ( 10 ऑक्टोबर 2010 )

Tuesday 6 April, 2010

संमेलनाच्या मांडवकळा...

पुण्यनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन आता दहा एक दिवस उलटून गेले आहेत. पण, मोरोपंतांच्या मनात अजूनही या संमेलनाच्या मांडवकळा सुरूच आहेत. अमिताभच्या खास कमावलेल्या आवाजातलं मधुशाला ऐकताना मोरोपंतांचे कान तृप्त झाले होते. अवघं मराठी साहित्य विश्व या मधुशालेच्या एकाच प्यालात फेसाळताना मोरोपंतांनी याचि देही याचि डोळा अनुभवलं होतं. तसं तर मोरोपंतांना संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्याविषयी विशेष आत्मीयता.... पण, समारोपाला बच्चन महोदयांच्या उपस्थितीमुळे साक्षात् दभि सुद्धा भांबावलेले* दिसले. (*मोरोपंतांना खरं तर भांबावलेले या शब्दाऐवजी भंजाळलेले हा शब्दप्रयोग अपेक्षित असावा, पण, मराठी समीक्षेत या शब्दाला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला आहे किंवा नाही या बद्दल त्यांच्या मनात साशंकता आहे.) संमेलनाचं फलित काय, त्यात चर्चिले गेलेले साहित्यविषयक मुद्दे यांचा अध्यक्ष या नात्याने दभिंनी साक्षेपी समारोप करणं अपेक्षित होतं. पण, झालं भलतंच... ते तर शरिरासारखीच अभिनयातही उंची गाठलेल्या अमिताभकडे पाहून भारावून गेले होते आणि आपण काय मुद्दे मांडतो आहोत, याचं भानच त्यांना उरलं नाही... त्यांच्या पंधरा वीस मिनिटांच्या भाषणातला बहुतांश भाग हा अमिताभजींचं कौतुक करण्यातच खर्ची पडला. आपल्या आवडत्या उत्तम समीक्षकाच्या अध्यक्षीय समारोपाची अशी समीक्षा करावी लागेल, याचा बहुत खेद मोरोपंतांना वाटत होता. तीच सल त्यांच्या मनात अजूनही बोचते आहे.


नाही म्हणायला संमेलन पुण्यप्रभावी ठरले हे खरंच आहे. काय नव्हतं बरं त्या संमेलनात... सगळं काही होतं... ज्ञानपीठ विजेते विंदा म्हणायचे तसं ‘तेच तें तेच तें…..’ नक्कीच होतं. म्हणजे बघा, तेच वाद, तेच विषय, तेच वक्ते... सारं कसं तेच तें... पुण्यनगरीतच जेव्हा पहिलं ग्रंथकारांचं संमेलन झालं तेव्हापासूनच खरं तर वादांची संगत संमेलनाशी जोडली गेली. एका अर्थी वाद हे साहित्य संमेलनाच्या पाचवीला पुजले गेलेयत. पण, त्या काळातले वाद हे शंभर टक्के साहित्यविषयक वाद असायचे... पण, आजकालचे वाद हे फुटकळ आणि क्षुल्लक असतात. पराचा कावळा करणे अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचंच प्रत्यंतर सध्याच्या काळात येत असल्यानं मोरोपंतांची साहित्यिक अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. आता, यंदाच्या संमेलनात वादाची बांग दिली सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी... व्यसनाने बरबटलेला पैसा संमेलनासाठी का वापरावा, असा खडा सवाल त्यांनी संमेलनाच्या स्मरणिका प्रकाशन समारंभात केला आणि तिथून वाद रंगत गेला. आता माणिकचंदशी संबंधित वाद आहे म्हटल्यावर तो रंगणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसावी... साहित्यातले सगळे ‘उंचे लोग’ आपापली साहित्यिक ‘उंची पसंद’ घेऊन वादात उतरले. कशी गंमत आहे पहा... समारोपातही वादाची एक वेगळीच उंची बघायला मिळाली. याला म्हणतात संमेलन वेगळ्या उंचीवर जाणे... असो, विषय तत्वाचा होता. पण, संयोजकांनी कुठे स्वतःहून माणिकचंदचं प्रायोजकत्व नाकारलं ? दस्तुरखुद्द माणिकचंदवाल्यांनीच आपलं प्रायोजकत्व मागे घेतलं आणि वादावर पडदा टाकला.. पण, मोरोपंतांच्या मनात तरीही हा वाद कुठेतरी बाकी होताच... संमेलन सुरु झालं आणि रसिकांसाठी, निमंत्रितांसाठी जे पाणी दिलं जात होतं त्यावर तर चक्क माणिकचंदचाच ब्रँड होता... व्यसनांचा पैसा नको तर मग त्यांच्या ब्रँडचे पाणी तरी कशाला हवे, असा एक सहजप्रश्न मोरोपंतांना एकसारखा पडत होता.

संमेलन तर सुरू झालं... आणि त्याचबरोबर वादाचा नवा अंकही सुरू झाला. अमिताभ बच्चन समारोपाला येणार, त्याच्यासोबत मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार, हे संयोजक म्हणतात, तसं खूप आधी ठरलेलं.. पण, काँग्रेसच्या संस्कृतीला ते रुचलं नसावं... अमिताभची ऍलर्जी असलेल्या काँग्रेस श्रेष्ठींची नाराजी नको, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शक्कल लढवली. त्यांनी संमेलनाला दुसऱ्याच दिवशी भेट दिली. अहो, पण, त्यामुळे नियोजित परिसंवादांचा बोऱ्या वाजला... माध्यमांनाही परिसंवादांपेक्षा ‘सीएम – बिग बी – काँग्रेस’ या वादातच स्वारस्य होतं... म्हणजे संमेलनाला साहित्यिक मूल्य म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती, त्याऐवजी असल्या फालतू वादांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळालेली पाहून मोरोपंत अक्षरशः हलबलले....

असं म्हणतात वय वाढत जातं तसं माणूस अनुभवानं परिपक्व होत जातो... इथे तर साहित्य संमेलनाला शंभर वर्षांची परंपरा आहे. आता जे झालं ते संमेलन तर 83 वं होतं... म्हणजे, वय वाढत चाललेल्या साहित्य संमेलनांमध्येही पक्वता यायला हवी... पण, प्रत्यक्षात ही संमेलनं जख्ख म्हातारी होत चाललीयत, त्यांना कसलाही साहित्यिक बैठकीचा आधार नाही... राजकीय आणि पैसेवाल्यांच्या बेगडी दिखाऊपणाचं ओझं घेऊन संमेलनं वाकत चाललीयत... मोरोपंतांसारखा खरा रसिक संमेलनाची ही साहित्यिक विटंबना पाहून धास्तावला आहे...

- दुर्गेश सोनार ( 7 एप्रिल 2010)

Friday 19 February, 2010

शिक्षणाच्या ...... घो !

शाळेची घंटा झाली. वर्ग भरले. नवं शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरचा शाळेचा पहिलाच दिवस. सातवीतल्या वर्गात गटणे मास्तर हजेरीबुक घेऊन घुसले. सुस्मित वदनानं मास्तरांनी मुलांकडे पाहिलं. मुलांनीही ‘गुड मॉर्निंग सर...’ असं उच्चरवात मास्तरांचं स्वागत केलं. मास्तरांनी मग एकेका मुलाला त्यांचं नाव विचारायला सुरवात केली. एकेक करता करता त्यांनी एका मुलाला विचारलं, ‘व्हॉट इज युवर नेम ?’ त्यावर तो तप्तरतेनं उत्तरला, ‘माय नेम इज खान !’ असेल बुवा त्याचं नाव असं म्हणत मास्तरांनी पुढच्या मुलाकडे मोर्चा वळवला. त्याला त्याचं नाव विचारलं, तर तो खर्ज लावून म्हणाला, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय...!’ अरे देवा, हा काय प्रकार असं म्हणत मास्तर एकदम बुचकळ्यात पडले. तितक्यात एक जण हातात झेंडा घेऊन उभा राहिला आणि मास्तरांना विचारू लागला, ‘आपली माणसं आपलीच माती, तरी मेंढराची कळपास भीती... या कवितेचा अर्थ काय ?’ मास्तर आणखीच गोंधळले. मराठीच्या अभ्यासक्रमात तर ही कविता कुठेच नाही आणि शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना कवितेचा प्रश्न कसा काय पडावा, याचं मास्तरांना आश्चर्यच वाटलं. वेळ मारून नेण्यासाठी ते म्हणाले, ‘मुलांनो, आज तर पहिलाच दिवस आहे शाळेचा, यथावकाश आपण शिकणारच आहोत नां...!’ आता खडू घेऊन मास्तर फळ्याकडे वळले. बघतात तर काय, फळ्यावर मोठ्या अक्षरांत आधीच लिहून ठेवलेलं, ‘ब्रेकिंग न्यूज...!’ आता बोंबला... ‘हा काय प्रकार आहे ?’ मास्तरांनी त्रासिकपणे मुलांना विचारलं. मुलं एका सुरांत उत्तरली, आमच्या घरांत टीव्हीवर सतत सुरु असते ती ब्रेकिंग न्यूज... शाळेत तुम्ही जे शिकवता, त्याहीपेक्षा कितीतरी रंजक आणि सुरस गोष्टी आम्हाला ब्रेकिंग न्यूज मधूनच शिकायला मिळतात. आम्हाला तुमचं नेहमीचं पुस्तकबंद शिक्षण नकोय, आम्हाला असंच ब्रेकिंग न्यूजवालं चटपटीत, खुसखुशीत रंजक शिक्षण हवंय... म्हणजे बघा, युवराज राहुल गांधी मुंबईत आले. त्यांना शिवसेना काळे झेंडे दाखवणार होती. पण, राहुल भलतेच हुशार निघाले. त्यांनी थेट लोकल गाठली. तिकिटाला पैसे हवे म्हणून एटीएममधनं पैसे काढले. आता हे सगळे एवढे नाट्यमय थ्रिलर प्रकार आम्हाला कसे कळले, सांगा बरं मास्तर..? अहो, चोवीस तास चालणाऱ्या ब्रेकिंग न्यूजमधनंच तर आम्हाला ही अत्यंत उद् बोधक माहिती मिळाली. अहो, टीव्ही हे ज्ञानार्जनाचे उत्तम साधन आहे, हे काय उगाच थोरामोठ्यांनी लिहून ठेवलंय ? ....


मुलांच्या या भडिमारामुळे गटणे मास्तर अधिकच चक्रावले. शाळेच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच तासाला मुलांचे हे असे प्रश्न... म्हणजे माय नेम इज खानच्या फर्स्ट डे फर्स्ट शोला शिवसैनिकांनी केलेला गोंधळच... अशी भावना मास्तरांची झाली. अरे हे काय आपल्यालाही सिनेमाचीच उपमा कशी काय आठवावी ? गटणे मास्तर आणखीनच कोड्यात पडले. क्षणभर डोळे मिटून घेतल्यावर त्यांना लक्षात आलं की, आपणही टीव्हीमय झालोय. आपणही ब्रेकिंग न्यूजच्या हॅमरिंगमुळे टीव्हीऍडिक्ट झालोय. आपलीही जर हीच अवस्था असेल, तर मुलांना तरी काय दोष द्यायचा ? घराघरांत टीव्ही आहे, त्यावर दिवसरात्र असंख्य तऱ्हेची चॅनेल्स सुरु असतात. ते पाहताना ना डोळे थकतात ना माणसं... हातात रिमोट असूनही त्यावर आपला कंट्रोल नाही... इतके का अधीन झालोय आपण... ? डोक्यात भंजाळल्यासारखं होत असतानाच तास संपल्याची घंटा झाली. मास्तर भानावर आले. हा एक तास संपला पण, बाहेरच्या तासांचे काय ? तिथे भंजाळल्यासारखी परिस्थिती असताना भानावर आणणारी अशी खरंच कोणती घंटा आहे ?

- दुर्गेश सोनार (20 फेब्रुवारी 2010)