पुण्यनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन आता दहा एक दिवस उलटून गेले आहेत. पण, मोरोपंतांच्या मनात अजूनही या संमेलनाच्या मांडवकळा सुरूच आहेत. अमिताभच्या खास कमावलेल्या आवाजातलं मधुशाला ऐकताना मोरोपंतांचे कान तृप्त झाले होते. अवघं मराठी साहित्य विश्व या मधुशालेच्या एकाच प्यालात फेसाळताना मोरोपंतांनी याचि देही याचि डोळा अनुभवलं होतं. तसं तर मोरोपंतांना संमेलनाध्यक्ष डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्याविषयी विशेष आत्मीयता.... पण, समारोपाला बच्चन महोदयांच्या उपस्थितीमुळे साक्षात् दभि सुद्धा भांबावलेले* दिसले. (*मोरोपंतांना खरं तर भांबावलेले या शब्दाऐवजी भंजाळलेले हा शब्दप्रयोग अपेक्षित असावा, पण, मराठी समीक्षेत या शब्दाला प्रमाण भाषेचा दर्जा मिळाला आहे किंवा नाही या बद्दल त्यांच्या मनात साशंकता आहे.) संमेलनाचं फलित काय, त्यात चर्चिले गेलेले साहित्यविषयक मुद्दे यांचा अध्यक्ष या नात्याने दभिंनी साक्षेपी समारोप करणं अपेक्षित होतं. पण, झालं भलतंच... ते तर शरिरासारखीच अभिनयातही उंची गाठलेल्या अमिताभकडे पाहून भारावून गेले होते आणि आपण काय मुद्दे मांडतो आहोत, याचं भानच त्यांना उरलं नाही... त्यांच्या पंधरा वीस मिनिटांच्या भाषणातला बहुतांश भाग हा अमिताभजींचं कौतुक करण्यातच खर्ची पडला. आपल्या आवडत्या उत्तम समीक्षकाच्या अध्यक्षीय समारोपाची अशी समीक्षा करावी लागेल, याचा बहुत खेद मोरोपंतांना वाटत होता. तीच सल त्यांच्या मनात अजूनही बोचते आहे.
नाही म्हणायला संमेलन पुण्यप्रभावी ठरले हे खरंच आहे. काय नव्हतं बरं त्या संमेलनात... सगळं काही होतं... ज्ञानपीठ विजेते विंदा म्हणायचे तसं ‘तेच तें तेच तें…..’ नक्कीच होतं. म्हणजे बघा, तेच वाद, तेच विषय, तेच वक्ते... सारं कसं तेच तें... पुण्यनगरीतच जेव्हा पहिलं ग्रंथकारांचं संमेलन झालं तेव्हापासूनच खरं तर वादांची संगत संमेलनाशी जोडली गेली. एका अर्थी वाद हे साहित्य संमेलनाच्या पाचवीला पुजले गेलेयत. पण, त्या काळातले वाद हे शंभर टक्के साहित्यविषयक वाद असायचे... पण, आजकालचे वाद हे फुटकळ आणि क्षुल्लक असतात. पराचा कावळा करणे अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचंच प्रत्यंतर सध्याच्या काळात येत असल्यानं मोरोपंतांची साहित्यिक अस्वस्थता दिवसेंदिवस वाढतच चाललीय. आता, यंदाच्या संमेलनात वादाची बांग दिली सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी... व्यसनाने बरबटलेला पैसा संमेलनासाठी का वापरावा, असा खडा सवाल त्यांनी संमेलनाच्या स्मरणिका प्रकाशन समारंभात केला आणि तिथून वाद रंगत गेला. आता माणिकचंदशी संबंधित वाद आहे म्हटल्यावर तो रंगणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नसावी... साहित्यातले सगळे ‘उंचे लोग’ आपापली साहित्यिक ‘उंची पसंद’ घेऊन वादात उतरले. कशी गंमत आहे पहा... समारोपातही वादाची एक वेगळीच उंची बघायला मिळाली. याला म्हणतात संमेलन वेगळ्या उंचीवर जाणे... असो, विषय तत्वाचा होता. पण, संयोजकांनी कुठे स्वतःहून माणिकचंदचं प्रायोजकत्व नाकारलं ? दस्तुरखुद्द माणिकचंदवाल्यांनीच आपलं प्रायोजकत्व मागे घेतलं आणि वादावर पडदा टाकला.. पण, मोरोपंतांच्या मनात तरीही हा वाद कुठेतरी बाकी होताच... संमेलन सुरु झालं आणि रसिकांसाठी, निमंत्रितांसाठी जे पाणी दिलं जात होतं त्यावर तर चक्क माणिकचंदचाच ब्रँड होता... व्यसनांचा पैसा नको तर मग त्यांच्या ब्रँडचे पाणी तरी कशाला हवे, असा एक सहजप्रश्न मोरोपंतांना एकसारखा पडत होता.
संमेलन तर सुरू झालं... आणि त्याचबरोबर वादाचा नवा अंकही सुरू झाला. अमिताभ बच्चन समारोपाला येणार, त्याच्यासोबत मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार, हे संयोजक म्हणतात, तसं खूप आधी ठरलेलं.. पण, काँग्रेसच्या संस्कृतीला ते रुचलं नसावं... अमिताभची ऍलर्जी असलेल्या काँग्रेस श्रेष्ठींची नाराजी नको, म्हणून मुख्यमंत्र्यांनी शक्कल लढवली. त्यांनी संमेलनाला दुसऱ्याच दिवशी भेट दिली. अहो, पण, त्यामुळे नियोजित परिसंवादांचा बोऱ्या वाजला... माध्यमांनाही परिसंवादांपेक्षा ‘सीएम – बिग बी – काँग्रेस’ या वादातच स्वारस्य होतं... म्हणजे संमेलनाला साहित्यिक मूल्य म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळायला हवी होती, त्याऐवजी असल्या फालतू वादांमुळेच अधिक प्रसिद्धी मिळालेली पाहून मोरोपंत अक्षरशः हलबलले....
असं म्हणतात वय वाढत जातं तसं माणूस अनुभवानं परिपक्व होत जातो... इथे तर साहित्य संमेलनाला शंभर वर्षांची परंपरा आहे. आता जे झालं ते संमेलन तर 83 वं होतं... म्हणजे, वय वाढत चाललेल्या साहित्य संमेलनांमध्येही पक्वता यायला हवी... पण, प्रत्यक्षात ही संमेलनं जख्ख म्हातारी होत चाललीयत, त्यांना कसलाही साहित्यिक बैठकीचा आधार नाही... राजकीय आणि पैसेवाल्यांच्या बेगडी दिखाऊपणाचं ओझं घेऊन संमेलनं वाकत चाललीयत... मोरोपंतांसारखा खरा रसिक संमेलनाची ही साहित्यिक विटंबना पाहून धास्तावला आहे...
- दुर्गेश सोनार ( 7 एप्रिल 2010)
No comments:
Post a Comment