बऱ्याच दिवसांनी आज लिहितोय. याचा अर्थ लिहिण्यासाठी अजिबात विषयच नव्हते, असा मुळीच नव्हे... थोडासा कंटाळा, काहीसा कामाचा ताण यामुळे लिहिण्यासाठी हवा तसा वेळ मिळत नव्हता. आता यावर तुम्ही म्हणाल आवड असली की सवड नक्की मिळते. हे शंभर टक्के मान्य आहे. पण, तशी वस्तुस्थिती प्रत्येक वेळी असतेच असं नाही. विषय कितीही डोक्यात घोळत असले तरी त्याला कागदावर मूर्त रुप देण्यासाठी काही तरी वेळ द्यायलाच हवा नां...! मनात आले आणि लिहून मोकळा झालो, इतकं सहज सोपं नसतं नां लिहिणं... बियाणं पेरलं म्हणून लगेच ते थोडंच उगवून येतं...? त्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, त्याची नांगरणी करावी लागते, थोडं खतपाणी करावं लागतं, आणि एवढं सगळं झालं की, ते बियाणं जोमानं उगवून यावं यासाठी सर्जनाचा पाऊस यावा लागतो. तर आणि तरच ते बियाणं जोरकसपणे उगवून येऊ शकतं... संत तुकाराम महाराजांनी एके ठिकाणी म्हटलं होतं – खोल ओली पडे ते पिक उत्तम उथळाचे श्रम वाया जाय... ज्या पिकाची खोली उत्तम आहे, तेच पिक सकस उत्तम असतं... वर वर असलेलं उथळ असलेलं पिक वादळवाऱ्यात तग धरू शकत नाही. आणि हल्ली तर आजूबाजूला अशी वरवरची झुडुपं मोठ्या डौलात बहरताना दिसतात.. ही झुडुपं म्हणजेच खरेखुरे वटवृक्ष आहेत की काय असे वाटावे, अशी परिस्थिती मुद्दामहून निर्माण केली जाते. आपल्यालाही हेच मृगजळ खरे वाटायला लागते. ज्याच्याकडे मायेची सावली मागायला जावं, ते डेरेदार वृक्ष नाहीत तर फुटकळ झुडपं आहेत, हे समजेपर्यंत आपण परिस्थितीच्या उन्हात अगदी करपून गेलेले असतो. मोठी सावली देण्याचा आव आणणारी ही तथाकथित झाडं खरं तर बोन्सायच असतात. विशिष्ट विचारधारेला कवटाळून बसत आपल्याला सोयीचे तत्वज्ञान जगाला सांगणारी ही झाडं खुंटलेलीच असतात. त्यांची वाढ विशिष्ट चौकटीच्या पलिकडे होऊच शकत नाही. कारण अगदी स्पष्ट असतं. त्यांच्या मुळाशी एका विशिष्ट विचारधारेच्या तारेनं घट्ट बांधून ठेवलेलं असतं. आणि एकदा का ही विचारांची चौकट घट्ट पक्की झाली की, मग प्रत्येक प्रसंगाकडे हे लोक त्याच चौकटीच्या परिमाणातून पाहू लागतात. नदीच्या एकाच काठावर बसून ही मंडळी नदीच्या संपूर्ण भोवतालाचा अंदाज बांधू लागतात. त्यासाठी नदीच्या दुसऱ्या काठावर पण काही तरी आहे, तिथेही काही भोवताल आहे, हेच मुळी ते विसरून जातात. असो, तर अशी ही परिस्थिती असताना, लिहिण्यासाठी अजिबातच विषय नाही असे होणंच शक्य नाही... पण, लिहिण्यासाठी आवश्यक असणारी अंतःप्रेरणा जागृत करणारी परिस्थिती आजूबाजूला असते का, हे पाहावं लागतं. तरच नवं काही तरी लिहिलं जाऊ शकतं... अगदीच निराश व्हावं असं वातावरण असलं तरी त्यातही काही आश्वासक सूर आहेतच. ते गाते राहावेत, ते जुळून यावेत, यासाठी तरी आपले हात लिहिते राहावेत, नाही का ?
- दुर्गेश सोनार
No comments:
Post a Comment