Tuesday 14 July, 2009

दिवस 'प्रतिभा संगम'चे...

१९९६ सालचा ऑगस्ट महिना असेल... एक दिवस सोलापूरच्या अभाविप कार्यालयातून फोन आला, 'अंमळनेरला प्रतिभा संगम हे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीचं राज्यस्तरीय संमेलन व्हायचंय. त्यासाठी जिल्ह्यातून आम्ही काही विद्यार्थी साहित्यिकांची नावं काढलीयत. त्यात तुझ्या नावाचा समावेश आहे. ' फोनवर फार काही चौकशी करता आली नाही. पण, त्यानंतर त्या संदर्भातलं एक पत्र घरच्या पत्त्यावर आलं. त्यानुसार मी माझ्या दोन कविता पाठवून दिल्या. त्यानंतर काही दिवस गेले आणि अचानक एके दिवशी अंमळनेरचं निमंत्रणच आलं. मला खूप बरं वाटलं. इतके दिवस पंढरपूर आणि सोलापूर जिल्हा असं सीमित असलेलं माझं साहित्यविश्व विस्तारण्यासाठी मला व्यासपीठ मिळणार होतं. गणपती विसर्जनाच्या दिवशी मी अंमळनेरला जाण्यासाठी निघालो. बाबाही मला सोलापूरपर्यंत सोडायला आले होते. सोलापुरातून आणखी काही जण माझ्यासोबत येणार होते. सोलापुरातल्या नव्या पेठेत अभाविपचं कार्यालय होतं. तिथं जमायचं होतं. आम्ही दुपारी साडे चारच्या सुमाराला तिथे पोहोचलो. कार्यालयाचा जुना लाकडी जिना चढत असताना बरंच काही डोळ्यांसमोर तरळत होतं. तिथे पोहोचताच सोलापुरातल्या अभाविप कार्यकर्त्यांनी माझी आपुलकीनं चौकशी केली. हा माझा विद्यार्थी परिषदेशी आलेला पहिला संपर्क...
अंमळनेरचं ते पहिलं प्रतिभा संगम आज तेरा वर्षांनंतरही माझ्या मनात अगदी तस्संच्या तस्सं ताजं आहे. राज्यभरातनं किमान सातशे ते आठशे विद्यार्थी साहित्यिक अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात एकत्र आले होते. मराठी साहित्यविश्वातले हे इतके ताजेतवाने अंकुर पहिल्यांदाच एके ठिकाणी एकत्र येणं, मान्यवर ज्येष्ठ साहित्यिकांनी त्यांना भरभरून मार्गदर्शन करणं... हा सगळा सोहळा खरंच अनुभवण्यासारखा होता. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीला सातशे वर्षं झाल्याचं औचित्य या सगळ्या खटाटोपामागे होतं. अवघ्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरीसारखं अभिजात साहित्य लिहिणारे संत ज्ञानेश्वर हे सगळ्या युवा साहित्यिकांचे मूळ प्रेरणास्रोत... प्राचार्य राम शेवाळकर यांचं ओघवत्या शैलीतलं उद्घाटनाचं भाषण ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो होतो. कविवर्य मंगेश पाडगावकरांची कवी प्रवीण दवणे यांनी ' कविता फुलते कशी ? ' यावर घेतलेली प्रकट मुलाखत, गटागटातून रंगलेल्या विद्यार्थी साहित्यिकांच्या चर्चा, असं सगळं पोषक खत मिळत गेलं आणि माझ्यासारखे कितीतरी त्या वेळेसचे विद्यार्थी साहित्यिक रुजत गेले.
याच प्रतिभा संगममधून अशोक जेधे सारखा हळवा, भावूक कविमित्र भेटला, 'येगं येगं इंद्रायणी' ही अशोकची त्यावेळची कविता अजूनही मनात तशीच आहे, वहीमध्ये एखादं मोरपीस जपून ठेवावं नां अगदी तशी... आता अशोक नाहीये पण, त्याची ती कविता कायम स्मरणात आहे. नाशिकचा मंदार भारदे, नंदुरबारची निकीता असोदेकर, पुणे जिल्ह्यातला संतोष शेंडकर, लासलगावचा ऐश्वर्य पाटेकर या सारखे अनेक लिहिते हात ओळखीचे झाले. तर प्रा. नरेंद्र पाठक, प्रा. जयंत कुलकर्णी, प्रा. धनंजय कुलकर्णी यांच्या सारखी साहित्यावर प्रेम करणारी आणि नव्या अंकुरांना जोपासणारी माणसं आपली झाली. त्यांच्याशी मैत्र जिवांचं जोडलं गेलं. एवढंच नाही तर ज्यांना फक्त दिवाळी अंकांतून, कवितासंग्रहांतून, पुस्तकांतून भेटता आलं होतं अशा मंगेश पाडगावकर, द. मा. मिरासदार, इंद्रजित भालेराव, दासू वैद्य, रेणू पाचपोर, अरूणा ढेरे, भानू काळे या सारख्या साहित्यिकांना अगदी जवळून भेटण्याचा योग आला. यातून साहित्यविषयक जाणिवांचं क्षितीज विस्तारलं आणि लेखनाच्या आशाही उंचावत गेल्या. प्रतिभा संगमनं ग्रामीण भागातल्या कित्येक विद्यार्थी साहित्यिकांना लिहितं केलं, त्यांना विहरण्यासाठी पंखांत बळ दिलं. प्रतिभा संगमनं धारण केलेलं 'विस्तारणारी क्षितिजं... उंचावणाऱ्या आशा' हे ब्रीद त्यामुळेच तर सार्थ ठरतं. अंमळनेरच्या प्रतिभा संगम नंतर झालेल्या रत्नागिरीतल्या दुसऱ्या प्रतिभा संगममध्ये आणखी संधी मिळाली आणि एका वेगळ्या साहित्यिक चळवळीत सक्रिय होता आलं.
हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे विद्यार्थी परिषदेला पूर्ण होत असलेली साठ वर्षं... प्रतिभा संगम सारखं व्यासपीठ अभाविपनं निर्माण केलं नसतं तर कदाचित माझा अभाविपशी संबंध आलाच नसता आणि माझे साहित्यिक अनुबंध जुळले नसते. ज्ञान, चारित्र्य आणि एकता ही अभाविपची त्रिसूत्री... स्वामी विवेकानंद हे प्रेरणास्थान... चारित्र्यवान तरूण घडला तरच राष्ट्र घडेल, याची खूणगाठ बांधून ही संघटना काम करतेय. संघाच्या मुशीतून साकारलेल्या अभाविप बद्दल काही जणांना ऍलर्जी आहे. असेल तर असोत बापुडी... पण, एखादी संघटना गेली साठ वर्षं सातत्यानं काही ना काही विधायक उपक्रम राबवत असेल तर, त्यांच्या प्रयत्नांत खिळ घालण्यापेक्षा त्यांना बळ देणं हे केव्हाही चांगलं, नाही का ?
- दुर्गेश सोनार ( ९ जुलै २००९ )

No comments: