Thursday 1 January, 2009

वर्षाचा पहिला दिवस...

चला, अखेर नवं वर्ष आज सुरू झालं. थर्टी फर्स्टचा हँगओव्हर संपून दिवसाची सुरूवात व्हायला अंमळ उशीर होणारच नां... हल्ली सेलिब्रेशनचा फेसाळता रंग रात्री उशिरापर्यंत चढत असतो. त्यामुळे नव्या दिवसाचा सूर्य उगवायला वेळ लागणारच नां... माझाही सूर्य आज थोडासा (?) उशिराच उगवला. नवं वर्ष सुरू झाल्याची जाणीव करून देणारं नवं कोरं कॅलेंडर भिंतीवर टांगलं. सरत्या वर्षाचं कॅलेंडर तितक्याच तत्परतेनं काढूनही टाकलं. खरंच किती सोपं असतं नां, जुनं कॅलेंडर बाजूला ठेवणं.... पण, गेलेल्या दिवसांतल्या आठवणी इतक्या सहजपणे बाजूला ठेवता येत नाहीत. गेल्या वर्षभरातलेच नव्हे तर भूतकाळातले भलेबुरे सारेच क्षण आपल्या मनाच्या कुठल्या तरी कप्प्यात रुंजी घालत राहतात. ते आपण एकांताच्या क्षणी आठवत राहतो, हळुवार स्मृतींना कुरवाळत राहतो. माणसाला भूतकाळात रमायला तसं खूपच आवडतं. म्हणूनच तर आमच्या लहानपणी आम्ही काय मज्जा करायचो म्हणून सांगू….’  या सारखी वाक्यं सहजपणे ऐकायला मिळतात. आमच्या काळी असं नव्हतं बुवा….’ असं खास पुणेरी शैलीतलं वाक्यही हमखास कानावर येतं. ही सगळी वाक्य आपल्या नॉस्टॅलजिक प्रवृत्तीची साक्ष देत असतात.

आपण जितके भूतकाळात रमत असतो नां तितकंच आपल्याला भविष्याची स्वप्न पाहायलाही आवडत असतं. भविष्यात आपल्याला हे करायचंय, भविष्यात आपल्याला ते करायचंय, असं आपण मनोमन ठरवत असतो. आपापल्या परिनं त्याचं प्लॅनिंगही करत असतो. त्यामुळेच तर मोठ्यापणी मला अमुक एक व्हायचंय… असं बालपणीच छातीठोकपणे आपण सांगत असतो. घर बांधणं, गाडी घेणं, या सारखी भौतिक आणि आताच्या काळात अत्यावश्यक ठरलेली सारी सुखं मिळावीत, यासाठीही आपण स्वप्नं पाहत असतो. याच आपल्या स्वप्नांचं भांडवल जाहिरातीतून केलं जातं. भविष्याबद्दल आपल्याला आकर्षण वाटत आलंय, म्हणूनच तर वर्तमानपत्रातल्या राशिभविष्याला प्रतिसाद मिळतो, ज्योतिषांकडे रांगा लागतात. ज्योतिषानं सांगितलेलं भविष्य खरं ठरो किंवा न ठरो, आपल्याला त्यानं सांगितलेल्या भविष्यावर विश्वास ठेवायला आवडत असतं. त्यानुसार स्वप्नंही आपण पाहत असतो.

एकूणच काय तर भूतकाळात जितके आपण रमतो, तितकेच भविष्यातही मश्गुल होतो. या सगळ्यामध्ये आपण नेमका वर्तमान विसरतो. आज काय आहे, आज काय होणार आहे, आज आपल्याला काय करायचं आहे, याच्याकडेच नेमकं आपलं दुर्लक्ष होतं. ज्या वर्तमानाच्या पायावर आपली भविष्याची भक्कम भिंत उभी राहणार आहे, त्या वर्तमानाच्याच बाबतीत आपण असे उदासीन का बरे होतो ? भूतकाळातलं संचित, आधीच्या अनुभवांची शिदोरी आपल्याला आपला आज घडवण्यासाठी उपयोगी असते. त्या शिदोरीच्या जोरावर वर्तमान घडवता येतो आणि एकदा का वर्तमान घडला की, भविष्यकाळही आपोआपच उज्ज्वल होऊन जातो. भूतकाळ आणि भविष्यकाळाला सांधणारा वर्तमानकाळ म्हणून तर महत्त्वाचा ठरतो. एखाद्याकडे आज सत्ता असेल, पण, ती त्याला भविष्यातही टिकवायची असेल तर त्याला वर्तमानावर प्रभुत्व गाजवावंच लागेल, यात शंका नाही.

एवढं तत्वज्ञान आज आठवण्याचं कारण म्हणजे आज सुरू झालेलं नवं वर्ष... नव्या वर्षात ठरवलेले संकल्प सिद्धीस नेण्याची नैतिक जबाबदारी झटकता येणार नाही... जे संकल्प सोडले आहेत, ते तडीस न्यायचे असतील तर मलाही वर्तमानावर प्रभुत्व गाजवावंच लागेल...! जितक्या सहजतेने सरत्या वर्षाचं कॅलेंडर बाजूला ठेवलं तितक्या सहजतेने भूतकाळ बाजूला सारता येणार नाही आणि कॅलेंडरकडे पाहत पुढच्या दिवसांचं प्लॅनिंग करणंही तितकं सहजसोपं नाही. 

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारे खूप सारे एसएमएस, ई मेल्स येतायत. लोक भरभरून शुभेच्छा देतायत. त्यातल्या ब-याच फॉरवर्डेडही असतील, पण तरी त्यामागची त्यांची भावना आपल्या वर्तमानातल्या आणि पर्यायाने भविष्यातल्या वाटचालीला प्रोत्साहन देणारीच असेल. त्यातलाच एक एसएमएस मला खूप भावला. त्यात म्हटलंय – ‘The race is not over, because I have not won yet….!’ त्यामुळेच आपण जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत शर्यत संपणार नाही, हा दुर्दम्य आशावाद बाळगून नव्या वर्षाची सुरूवात करायला हरकत नाही....   

-          दुर्गेश सोनार 

No comments: