पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असं म्हटलं जातं. आजचा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा होत असताना या विधानाची आठवण येणं स्वाभाविकच आहे. हा चौथा स्तंभ नेमक्या कोणत्या स्थितीत आहे, त्याची अवस्था काय आहे, खरंच असा स्तंभ वगैरे अस्तित्वात आहे का ? असे अनेक प्रश्न मनात रूंजी घालतायत. बाळशास्त्री जांभेकरांनी ६ जानेवारी १८३२ रोजी मराठी वृत्तपत्रांची मुहूर्तमेढ रोवली, त्याला आता पावणे दोनशे वर्षं उलटून गेलीयत. या पावणे दोन वर्षांत बरीच स्थित्यंतर होऊन गेली, वर्तमानपत्रांची ध्येयधोरणं बदलली, तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि जागतिकीकरणाच्या काळात न्यूज चॅनेल्सचीही चलती सुरू झाली. त्यामुळे एकेकाळचा पत्रकार आता दूरचित्रवाणी पत्रकार झाला.
एक काळ असा होता की, पत्रकार म्हटलं की, दाढीची खुटं वाढलेली, शबनम बॅग खांद्यावर अडकवलेली असं चित्र डोळ्यासमोर यायचं... कथा कादंब-या आणि चित्रपटांतूनही असंच चित्र रंगवलं जायचं.. आता परिस्थिती बदललीय. न्यूज चॅनेल्समुळे पत्रकारितेला आर्थिकदृष्ट्या चांगले दिवस आले. त्याचा थोडा का होईना पण वर्तमानपत्रांवरही परिणाम झाला. चॅनेल्सची चित्रमयता वर्तमानपत्रांतूनही रिफ्लेक्ट होऊ लागली. अधिकाधिक आकर्षक छायाचित्रं छापून वाचकांना आकृष्ट करण्यात जवळपास प्रत्येक वर्तमानपत्राची चढाओढ सुरू आहे. पूर्वी फक्त रविवारची पुरवणी सप्तरंगात असायची, आता रोजचा अंकच कलरफुल करावा लागतो, याचं कारणच चॅनेल्सबरोबर असलेली स्पर्धा हे आहे.
जेव्हा लिपीचा, मुद्रणतंत्राचा शोध लागला नव्हता, तेव्हा माणूस श्रोता होता. त्यानंतरच्या काळात भाषेचा विकास झाला. लिपीचा शोध लागला, त्याला जोड म्हणून मुद्रणतंत्रही विकसित झालं आणि माणूस श्रोत्याचा वाचक झाला. आता चॅनेल्स, इंटरनेटच्या भडीमारात माणूस आता वाचकापेक्षाही प्रेक्षकच अधिक झाला. आपल्याला जास्त पाहायला आवडतं. त्यामुळेच की काय वाचन कमी झालंय, अशी ओरड केली जाते. असो, कालाय तस्मै नमः दुसरं काय...!
पत्रकारितेचं मला तसं लहानपणापासूनच वेड... माझं बालपण पंढरपुरात गेलं. आमच्याकडे तेव्हा महाराष्ट्र टाइम्स यायचा... मुंबईवरून प्रसिद्ध होणारं हे वर्तमानपत्र पंढरपुरात दुपारी यायचं.. त्याचं मला भारी आकर्षण होतं. त्यातूनच पुढे पाचवीत असताना हस्तलिखीत काढण्याची बुद्धी झाली. त्याला नावही ठेवलं पंढरपूर टाइम्स...(मटा इफेक्ट)... पत्रकारितेत करिअर करायचं तेव्हा ठरवलं.. आमच्या बाबांना त्याचं अप्रूप वाटलं...पण, त्याचवेळी थोडी काळजीही वाटली. कारण पंढरपुरात पत्रकारांचं रेप्युटेशन फार चांगलं नव्हतं. पंढरपुरात गल्लीमाजी साप्ताहिकं आणि त्यांचे कितीतरी पत्रकार... हे पत्रकार चहाभजी मिळाली की खूश... त्यामुळे आपल्या चिरंजिवानं चहाभजीचा पत्रकार होऊ नये, असं कोणत्याही बापाला वाटणार.... तरीही बाबांनी प्रोत्साहन दिलं. शाळेतही त्याचं कौतुक झालं आणि मी ते हस्तलिखित तब्बल पाच वर्षं म्हणजे माझ्या दहावीपर्यंत नियमितपणे काढलं. त्यावेळी सोलापुरातल्या दैनिकांतून माझ्याविषयीचं कौतुक वगैरे करणारे लेखही छापून आले होते. तर बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे... आणि इसवीसन २००० मध्ये अस्मादिकांनी पत्रकारितेचं औपचारिक पदव्युत्तर पदवी शिक्षण पुण्यात घेतलं. तर आमच्या पत्रकार होण्यावर शिक्कामोर्तब झालं ते असं...
आता सात आठ वर्षं उलटल्यानंतर पत्रकारिता करताना त्याबद्दल कळकळ वाटणं, त्याचे प्लस मायनस जाणवणं हे स्वाभाविक आहे. आणि ते व्यक्त करायला पत्रकार दिनाशिवाय दुसरा चांगला मुहूर्त तरी कुठला असू शकतो ? आता वर्तमानपत्रांची पानं ग्लॉसी, चकचकीत कलरफुल होतायत, अत्याधुनिक छपाईतंत्रामुळे त्यात आणखी आकर्षकताही आलीय. पण, पत्रकारितेच्या मूळ उद्देशाचं काय ? आपणच निर्माण केलेल्या या स्पर्धेच्या जगात टिकण्यासाठी इतकं उथळ खरंच व्हायचं का ? मॅगीच्या जाहिरातीसारखा इन्स्टन्ट मजकूर आणि तोही कोणताही संदर्भ माहिती नसताना देणं आपल्या बुद्धीला कितपत पटतं ? आज चॅनेल्समध्ये काम करताना उघड्या डोळ्यानं नीट बघून हे वास्तव पाहिलं की दिव्याखाली अंधार कसा आहे, ते लगेच कळतं... कुणाला सिंकदरासारखं जग जिंकायचंय, तर कुणाला खास बातम्यांचा अखंड रतीब चोवीस तास घालायचाय... सह्याद्रीच्या कुशीत बाळसं धरणारे हे चॅनेलु हिंदीच्या प्रवाहात आपले स्टार किती काळ चांगले ठेवू शकणार ? म-हाटमोळ्या प्रेक्षकांची नाळ ओळखणं हे इतकं ‘ई झी’ नाही हे आपल्याला कधी कळणार ? हिंदी वृत्तवाहिन्यांबाबत तर शहाण्यानं न बोलणंच बरं... मराठीवरही याच हिंदी चॅनेलबाबूंचा प्रभाव आहे. हिंदीच्याच मांडवाखालून गेलेलेच या मराठी चॅनेलांचे प्रमुख म्हणून काम करतायत. त्यामुळे मराठी हिंदीचा फ्लेवर येणारच... त्याच्यामुळेच तर प्रेक्षकाचा दर्शक होतो, शक्यतेची संभावना होते, कशाचं विशेषण कशाला वापरतात हेच कळेनासं होतं. प्रेक्षकांना नीट डोळे उघडून बघायला सांगणा-या वाहिनीवरती त्यांचे एक थोर बातमीदार शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटीबद्दल थेट वार्तांकन करत होते. त्यावेळी त्यांना बहुधा कोणते विशेषण वापरावे याचे भानच राहिले नसावे, ते महाशय बोलून गेले, “ आज महाराष्ट्राच्या राजकारणातल्या दोन टोलेजंग नेत्यांची भेट झाली... ” आता बोला...! तर ही अवस्था सध्याच्या मराठी चॅनेलविश्वाची... मराठी पत्रविश्वातलं हे तिमिर दूर व्हावं, आणि आपलं ख-याखु-या वास्तवाचं प्रतिबिंब समस्त पत्रकारांच्या दर्पणात उमटावं, एवढंच विश्वात्मक पसायदान आजच्या पत्रकार दिनानिमित्त माऊलींकडे मागायचंय...
- दुर्गेश सोनार
No comments:
Post a Comment