ज्येष्ठ साहित्यिक डॉ. आनंद यादव यांची ८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी कळली आणि ग्रामीण साहित्याचं हिरवं जग अधिकच बहरून आल्यासारखं वाटलं. त्याचं कारणही तसंच आहे. पंढरपूरसारख्या अर्धशहरी आणि बहुतांशी ग्रामीण चेहरा असणा-या गावातून लिहू लागलेल्या मुलांसाठी डॉ. आनंद यादव हे प्रेरणास्थानच आहेत. माझं नशीबही बलवत्तर आहे. यादव सरांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मला खूपदा मिळाली. गंमत म्हणजे डॉ. आनंद यादव यांनी प्राध्यापकीला ज्या ठिकाणाहून सुरूवात केली त्या रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर कॉलेजचा (आताचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय) मी विद्यार्थी... मी बारावीत असताना आमच्या वाङ्मय मंडळाचं उद्घाटन डॉ. आनंद यादव यांनी केलं होतं. त्यावेळी त्यांना सर्वप्रथम भेटण्याचा योग आला. तोपर्यंत त्यांचं ‘झोंबी’ हे आत्मकथन वाचलं होतं. शिक्षणाच्या ओढीनं घर सोडून पळून गेलेल्या आनंदाचा डॉ. आनंद यादव कसा होतो, याचं वास्तवदर्शी चित्रण ‘झोंबी’त वाचायला मिळतं. त्यामुळेच झोंबी लिहिणा-या या लेखकाला जवळून भेटण्याची उत्सुकता नक्कीच होती. पंढरपुरातले ज्येष्ठ साहित्यिक आणि यादव सरांचे जवळचे स्नेही डॉ. द. ता. भोसले यांनी माझी ओळख करून दिली. कवितेत नव्यानेच काहीतरी करू पाहणा-या माझी यादव सरांनी आस्थेनं केलेली विचारपूस आणि त्याचवेळी लिहित राहा हे सांगताना वडिलकीच्या नात्याने केलेला उपदेश माझ्या अजूनही स्मरणात आहे. त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा पंढरपुरात सुरू झाली. त्याच्या उद्घाटन कार्यक्रमालाही यादव सर आले होते. त्यावेळी झाली ती दुसरी भेट.. ही भेट आमची ओळख आणखी पक्की करून गेली.
त्यानंतर मी उच्च शिक्षणाच्या निमित्तानं पुण्यात आलो. त्यावेळी यादव सरांच्या घरी जाऊन त्यांच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळाली. यावेळी निमित्त ठरलं ‘प्रतिभा संगम’ या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या साहित्य संमेलनाचं... सांगलीत प्रतिभा संगम व्हायचं होतं. त्याचा मी निमंत्रक होतो आणि यादव सरांनी उद्घाटक म्हणून यावं हा प्रतिभा संगमच्या संयोजक मंडळींचा आग्रह होता. यादव सरांनी कोणतेही आढेवेढे न घेता होकार दिला. या भेटीत यादव सरांमधला सच्चा माणूस अधिक जवळून अनुभवता आला. मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिलेल्या या लेखकाशी आपण इतकं जवळून बोलतो, हेच माझ्यासाठी खूप कौतुकाचं होतं.
यादव सरांची ग्रामीण भागाशी असलेली नाळ पक्की आहे. पुण्यातल्या धनकवडी परिसरातल्या त्यांच्या घरी आलं की त्याची प्रकर्षानं जाणीव होते. कलानगरमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांचं घर दिसतं. घराला नावही मातीशी नातं सांगणारं.. "भूमी’…! मातीशी नातं सांगणारं, मातीशी नाळ जोडलं गेलेलं आणि मातीतून फुललेलं यादव सरांच्या साहित्याचं हिरवं जग त्यांच्याच लेखनातून अनुभवण्यासारखं आहे. ग्रामीण संस्कृतीतली नेमकी स्पंदनं यादव सरांच्या आधी मराठी साहित्यात अपवादानंच पाहायला मिळतात. १९६० मध्ये एक कवी म्हणून मराठी साहित्यविश्वात यादव सरांनी पाऊल ठेवलं. कदाचित ग्रामीण संवेदना जोरकसपणे मांडण्यासाठी यादव सरांना त्यावेळी कवितेचं साधन जास्त जवळचं वाटलं असेल.. पण, त्यानंतर त्यांचा दुसरा कवितासंग्रह आला तो तब्बल अठरा वर्षांनी...! ‘मळ्याची माती’ या नावाचा तो कवितासंग्रह होता आणि त्यानंतर १९८९ मध्ये म्हणजे अकरा वर्षांनी ‘मायलेकरं’ हा त्यांचा तिसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. पण, यादव सरांमधल्या कवीपेक्षाही त्यांच्यातला कथाकार आणि ललित लेखक अधिक आश्वासक ठरला. यादव सरांचं वेगळेपण सगळ्यात पहिल्यांदा मराठी वाचकांसमोर आलं ते ‘झोंबी’ या आत्मकथनामुळे... त्यातली सच्ची शब्दकळा आणि अनुभवांची प्रभावी मांडणी यामुळे वाचकाची पकड झोंबीनं घेतली. १९८७ साली प्रकाशित झालेल्या झोंबीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला तो १९९० साली.. राज्य सरकारचाही पुरस्कारही त्यांना मिळाला.
‘झोंबी’चाच पुढचा भाग म्हणून लोकांसमोर आलेल्या 'नांगरणी' या आत्मकथनालाही वाचकांनी डोक्यावर घेतलं. त्यानंतर ‘घरभिंती’ (१९९२) आणि ‘काचवेल’ (१९९७) ही दोन आत्मकथनंही यथावकाश प्रसिद्ध झाली. या सगळ्या आत्मकथनांचं सामायिक वैशिष्ट्य सांगायचं तर त्यात कुठेही आक्रस्ताळेपणा येत नाही की दुःखाचं भांडवल करण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसत नाही. यादव सरांच्या आधीही आणि नंतरही अनेकांनी आत्मकथनं लिहिली आहेत. पण, त्यापैकी अनेकांच्या लेखनांत आत्मप्रौढी, दुःख, संघर्ष यांचं भांडवल करण्याचाच प्रयत्न अधिक दिसून येतो. याच काळात दलित आत्मकथनंही गाजत होती. दलितांच्या वेदना, त्यांच्या वाट्याला आलेली दुःखं, डावललेपणाची भावना, या सगळ्यांचं प्रतिबिंब तत्कालीन दलित साहित्यात उमटत होतं. पण, तरीही त्याचा परिघ हा मर्यादितच होता. त्यात सर्वंकष ग्रामसंस्कृतीचा अभाव होता. ही उणीव यादव सरांच्या लेखनानं भरून काढली. ‘गोतावळा’, ‘एकलकोंडा’ या सारख्या कादंब-यातूनही याचा प्रत्यय आपल्याला येऊ शकतो. ‘खळाळ’, ‘माळावरची मैना’, ‘डवरणी’ ‘उखडलेली झाडे’, ‘झाडवाटा’, ‘उगवती मने’ या त्यांच्या कथासंग्रहांच्या नावातूनही त्यांची ग्रामसंस्कृतीविषयी असलेली आपुलकी आणि निष्ठा दिसून येते.
अगदी अलिकडच्या काळात त्यांनी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची जीवनचरित्रं वेगळ्या परिप्रेक्ष्यात मांडण्याचाही प्रयत्न केलाय. लोकसखा ज्ञानेश्वर (२००५) आणि संतसूर्य तुकाराम (२००८) या चरित्रात्मक कादंब-यातूनही त्यांनी ग्रामसंस्कृतीचे उत्तम दाखले दिलेयत. कथा, कादंबरी, कविता आणि ललित या साहित्याच्या विविध प्रांतांमध्ये सहजतेने मुशाफिरी करणा-या यादव सरांना आता महाबळेश्वरमध्ये होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमान मिळणं म्हणजे ग्रामीण साहित्य संस्कृतीचाच गौरव आहे. यादव सरांच्या लेखणीने ग्रामीण साहित्याची केलेली ‘नांगरणी’ इतकी पक्की आहे की त्यातून ‘उगवत्या मनां’चा ‘गोतावळा’ दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ‘मातीखालच्या माती’त दडलेलं आम्हा नवोदितांचं ‘हिरवं जग’ सर्वांसाठी बहरून येईल, हे निःसंशय...!
- दुर्गेश सोनार (दिनांक – १६ जानेवारी २००९)
No comments:
Post a Comment