Monday, 26 January, 2009

माझा प्रजासत्ताक...

नेहमीपेक्षा आज जरा लवकरच उठणं झालं ते सोसायटीत मोठ्याने लागलेल्या गाण्यांमुळे... अगदी सक्काळी सक्काळी `ऐ मेरे वतन लोगो`चे सूर कानी पडले... आणि झोपी गेलेला जागा झाला...! झोपलेल्या प्रत्येकाला जागं करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या सद्भावनेनंच जणू काही आमच्या सोसायटीतल्या कार्यकर्त्यांनी हे गाणं मोठ्या आवाजात लावलं असावं, असा समज होऊन अस्मादिकांचं उठणं झालं... असो, निमित्त काही का असेना वर्षातून असं दोनदा या गाण्याची आठवण होते आणि तमाम भारतीयांना शहिदांनी केलेल्या बलिदानाची आठवण करून दिल्याचं समाधान असं सोसायटी सोसायटीतल्या प्रत्येक देशभक्त कार्यकर्त्याला लाभतं.... तर आमच्या प्रजासत्ताकाची सुरूवात झाली ती `याद करो कुर्बानी`च्या अमीट सुरांनी.... त्याच्या जोडीला देशभक्तीपर गाणी गाण्यासाठीच जन्मलेल्या महेंद्र कपूरांच्या आवाजातली गाणीही होतीच... अधूनमधून ऑस्कर नॉमिनी रेहमानभाऊंचं `माँ तुझे सलाम` होतंच... अशा स्वरमिलाफात प्रजासत्ताक दिनाची सुरूवात म्हणजे अहाहा....! या गाण्यांच्या पार्श्वसंगीतावर आमच्या चित्तवृत्ती जाग्या झाल्या. लाल किल्ल्यापासून ते देशभरातल्या शाळा कॉलेजं, सरकारी ऑफिसांमध्ये तिरंगा अभिमानानं लहरत असल्याचं सुखद चित्र डोळ्यांसमोर तरळू लागलं... तशी स्वप्नं पाहायची आमच्या डोळ्यांची सवय फार जुनी आहे. अहो मीच काय, आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूही स्वप्नं पाहायचे... म्हणूनच तर स्वातंत्र्याची पहाट होत असताना त्यांनी भारतीयांना एक स्वप्न दाखवलं होतं. फार वर्षांपूर्वी आम्ही नियतीशी एक करार केला होता. त्यानुसार वागण्याची वेळ आज येऊन ठेपली आहे, असं नेहरू म्हणाले होते... `जन गण मन` लिहिणारे गुरूदेव रवींद्रनाथ टागोर यांनीही स्वातंत्र्याच्या नंदनवनाचं स्वप्न पाहिलं होतं. स्वप्नातल्या स्वातंत्र्याच्या नंदनवनात `देश सदैव जागा राहो`, अशी प्रार्थनाही त्यांनी केली होती... माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारत जागतिक महासत्ता होण्याचं स्वप्न पाहिलं आणि भारतीयांना दाखवलंही... तर अशी ही देशविकासाची स्वप्नं... आम्हीही अशी स्वप्नं पाहतो... पण, सकाळ झाली की, ती विरून जातात... स्वप्नं पडायची असतील, तर त्यासाठी गाढ झोपलं पाहिजे.... पण, असं सुखानं कोण झोपू देतं ? आता तर न्यूज चॅनेल्सनी सगळ्यांची  अक्षरशः झोपच उडवून टाकली आहे... त्याच्यावर तोडगा म्हणून आता सगळे न्यूज चॅनेल्स हे मनोरंजन वाहिन्या म्हणून घोषित करा, अशी मागणी जोर धरत असल्याची चर्चा आहे. म्हणजे कसं, जसा सासू सुनांचा डेली सोप, तसाच चोवीस तास बातम्यांचा रिऍलिटी (वास्तव की अवास्तव ?) शो..! घटनाकारांनी प्रत्येक भारतीयाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य दिलं, त्यावेळी त्यांनाही या मूलभूत हक्कांचा भविष्यात असा वापर होईल, असं वाटलं नसेल... किंबहुना त्यांना स्वप्नातही असं वाटलं नसेल...

तर देशभक्तीच्या गाण्यांनी आम्ही नुसतेच जागे झालो नाही तर स्वप्नातून वास्तवातही आलो. वर्तमानपत्रांतून छापून आलेलं कालचं वर्तमान वाचत वाचत आपण खरेच `लोकसत्ता`क झाल्याच्या अभिमानानं ऊर भरून आला. अतिरेकी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहिदांना मरणोत्तर जाहीर झालेले बहुमान, पद्म पुरस्कारांची भलीमोठी यादी, त्या यादीतून बिटविन दी लाईन्स व्यक्त होणारे कुणाकुणाचे हितसंबंध... प्रजासत्ताक चिरायु होवो, असं म्हणत स्वतःचं मार्केटिंग करणा-या पान पान जाहिराती... देश मोठा की, ब्रँड असा भ्रम कुणालाही होईल, अशा या जाहिराती... इतक्या जाहिराती मिळाल्यानंतर कोणताही वृत्तपत्र मालक एखाद दिवस आपल्या कर्मचा-यांना सहजपणे सुटी देऊ शकतो नाही का... २६ जानेवारीची सुटी असल्याने उद्याचा अंक प्रकाशित होणार नाही, ही चौकट म्हणूनच पान एकच्या उपसंपादकानं समाधानानं पानात लावली असेल... तेव्हा समस्त वृतपत्रसृष्टीचा प्रजासत्ताक आनंदात साजरा होणार असं मनात म्हणत आमची स्वारी तयार झाली. आम्ही प्रिंटचे पत्रकार नसल्यानं आम्हाला कुठली प्रजासत्ताकाची सुट्टी आणि कसलं काय ?

एकूणच २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दोन राष्ट्रीय सणांचा थाटच काही और असतो. चौकाचौकातून देशभक्तीची गाणी, रांगोळ्या, ठिकठिकाणी शहिदांच्या आठवणी जागवणारे कार्यक्रम, परिटघडीच्या गणवेशात नटूनथटून शाळेला निघालेली भारताची उद्याची पिढी... शाळांच्या मैदानावर होणारे संचलन... देशप्रेमाचं भरतं यावं, असं हे वातावरण... नसानसांतून मग रक्त उसळू लागतं.. देशासाठी काहीतरी करावं, असं वाटू लागतं.... देशासाठी आपण देणं लागतो, असे भलेथोर विचार मनात येऊ लागतात... पण, दिवस संपला की, हे विचारही कुठल्या कुठे पसार होतात... भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ही पाठ्यपुस्तकाच्या पहिल्या पानावर छापलेली प्रतिज्ञा विस्मरणात जाते... `मला काय त्याचे ?`  ही भावना बळावते. लोकलमधून जाताना प्रजासत्ताक भारताचं खरंखुरं वास्तव स्टेशनगणिक समोर येतं. पण, त्यावर काही व्यक्त होण्याइतकी संवेदना आमच्यात कुठे राहिलीय? जी अवस्था मुंबईची, तीच किंबहुना त्याहीपेक्षा दयनीय अवस्था ग्रामीण भारताची आहे. स्वतंत्र, सक्षम, बलशाली भारताचं स्वप्न लोडशेडिंगच्या अंधारात हरवून गेलीयत... एका बाजूला मोठमोठे फूड फेस्टीवल साजरे होतात, तर दुस-या बाजूला अनेकांना एका वेळचं अन्नही पोटभर मिळत नाही. प्रत्येक गोष्ट साजरी करायची सवय लागलेले आपण सो कॉल्ड पांढरपेशे २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवसही त्याच पद्धतीनं साजरे करतो आहोत... असे भपकेबाज कार्यक्रम करताना प्रजासत्ताक भारताचं हे वास्तव सोयिस्करपणे विसरलं जातंय. साठीत बुद्धी नाठी होते असं म्हणतात.. प्रजासत्ताकाची साठी साजरी करत असताना भारतीयांची बुद्धी नाठी होऊ नये, इतकीच अपेक्षा...   

-          दुर्गेश सोनार (दिनांक २६ जानेवारी २००९)

No comments: