‘तुमच्या देशातील तरूणांच्या ओठी कोणती गाणी आहेत, ते सांगा मग मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो’, हे कुण्या एका विचारवंतांचं वाक्य अनेकदा सांगितलं जातं. खरंच असं असेल तर आपल्या देशाचं भविष्य काय असेल याची कल्पनाच न केलेली बरी... पण, इतकाही निराशेचा सूर मी लावणार नाही. मुळात तरूण कुणाला म्हणायचं याची नेमकी व्याख्याच करता येणार नाही. नाही म्हणायला शारीरिक वयाचा आधार घेत तरूणाची व्याख्या करता येईलही, पण तरीही तरूण कुणाला म्हणायचं याचं नेमकं उत्तर मिळत नाही. हभप बाबामहाराज सातारकर यांनी त्यांच्या एका प्रवचनात तरूणाची व्याख्या सांगायचा प्रयत्न केलाय. ज्याच्यात तरून जाण्याचं सामर्थ्य असतं तो म्हणजे तरूण... आध्यात्मिक पातळीवर विचार केल्यास ही व्याख्या पटू शकते. पण एक प्रश्न त्यातून समोर येतो, तो म्हणजे खरंच आजच्या तरूणांमध्ये असं तरून जाण्याचं सामर्थ्य आहे का ? आजच्या तरूणांपुढे कितीतरी आव्हानं आहेत. त्यांच्या वयाला न पेलणारा मानसिक आणि शारीरिक ताण त्यांना सोसावा लागतो. या सगळ्या जिवघेण्या स्पर्धेत स्वतः.चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजची तरूण पिढी संघर्ष करतेय. या संघर्षातून तरून जाणं किती तरूणांना जमतं ? अनेकदा त्यातून तरूणांमध्ये वैफल्यच वाढीला लागतं. ताण असह्य झाला की त्यावर मात करण्यासाठी तरूण पिढी वेगळे मार्ग शोधू लागते. ब-याचदा हे मार्ग चुकीचे असतात. त्यामुळेच तरूण पिढी टीकेचं लक्ष्य ठरते.
मध्यंतरी पेप्सीची एक जाहिरात कमालीची लोकप्रिय झाली. यंगिस्तानची कल्पना मांडणारी ही जाहिरात त्यातल्या नावीन्यामुळेच अधिक लक्षात राहिली. आपल्या देशातल्या या यंगिस्तानकडे आपण किती गांभीर्यानं पाहतो ? ही तरूण शक्ती किती उपयोगात आणली जाते ? यंगिस्तानमधल्या तरुणांची काही मतं आहेत, त्यांच्याही काहीतरी समस्या आहेत. पण, त्याकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुणाला ? देशाच्या स्वातंत्र्याला आता साठ वर्षँ उलटून गेली तरी देशाचं युवा धोरण ठरलेलं नाही. एका पाहणीनुसार २०२० मध्ये भारतात युवकांची सर्वाधिक संख्या असेल. त्या अर्थी भारत ख-या अर्थानं यंगिस्तान असेल. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीही भारताला २०२० पर्यंत महासत्ता करण्याचं स्वप्न पाहिलं पण, ते सत्यात आणण्यासाठी यंगिस्तानमधली ताकद जास्तीत जास्त वापरली गेली पाहिजे. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष होतंय. आजचा तरूण गुरफटलाय तो अस्तित्वाच्या लढाईत... शाळा कॉलेज संपलं की त्याला करिअर करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी त्याची धावपळ सुरू होते. यातून तो इतरांना काय स्वतःलाही वेळ देऊ शकत नाही.
आपल्या देशाच्या राजकारणात तरूणांचा सहभाग कितपत आहे ? तर तो अगदी नगण्य आहे. स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक सहभाग त्या काळातल्या तरूणांचाच होता. भगत सिंग, राजगुरू, स्वातंत्र्यवीर सावरकर हे सगळे क्रांतिकारक घडले ते त्यांच्यातल्या तरूण रक्तामुळेच... हे तरूण रक्त आज का उसळत नाही ? एखाद्या अन्यायाविरोधात ही तरूण पिढी संघटीत का होत नाही ? हल्लीची परिस्थितीच अशी आहे की, माणसं चिडतात, माणसं बंड करतात, तेही मनातल्या मनात....! उघडपणे बंड करण्याची प्रवृत्ती रक्तातूनच हद्दपार झालीय. हल्ली बंड होतात ते राजकीय हेतूनं.. एखादं पद पदरात पाडून घेण्यासाठी, स्वार्थ साधण्यासाठी... असे बंड करणारे असतात राजकारणात मुरलेले, वय झालेले पुढारी... आपल्याकडे पंतप्रधानच असतो सत्तरी ओलांडला... सगळ्या राजकारण्यांच्या वयाची सरासरी काढली तर ती पंचावन्न असल्याचं आढळेल. जे वय सेवानिवृत्तीचं असतं, त्या वयात हे राजकारणी सत्तेचा सारीपाट खेळत असतात. इथेच तरूणांनी सक्रिय होण्याची गरज आहे. अमेरिकेत बराक ओबामा सारखा तरूण उमदा नेता राष्ट्राचा अध्यक्ष होऊ शकतो, तर ते भारतात का शक्य होत नाही ? ओबामांनी म्हटल्याप्रमाणे भारतालाही बदलाची गरज आहे. CHANGE WE NEED हे जसं ओबामांच्या यशाचं गमक ठरलं तेच भारतातल्या यंगिस्तानच्या यशाचंही ठरावं, हीच अपेक्षा.
- दुर्गेश सोनार
No comments:
Post a Comment