सकाळी ऑफिसला जायला निघालो. सोसायटीच्या बाहेरच डोंबा-याचा खेळ सुरू होता. दोन बाजूला काठ्या उभारलेल्या... त्याला एक दोरी बांधलेली आणि त्यावर सात आठ वर्षांची चिमुरडी डोक्यावर हंड्याची उतरंड घेऊन काठीने तोल सांभाळत कसरत करत होती. तिच्या साथीला होता ढोलकीचा ताल.. कळकट कपड्यात फाटलेला संसार शिवण्यासाठी जगण्याचा संघर्ष करणारा तो डोंबारी... फाटकी लुंगी, मळलेला सदरा आणि गळ्यात अडकवलेला ढोलक, असा त्याचा अवतार... पोटाची खळगी भरण्यासाठी आपलाही हातभार देणारी ती चिमुरडी... काठीने तोल सावरणारी ती चिमुरडी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाचाही तोल सांभाळत होती. काय असेल तिचं भविष्य..? मनात विचार आला, असे किती पैसे त्याला मिळत असतील, अशी कसरत करून ? पण, पोटासाठी ही रोजची कसरत त्यांना करावी तर लागणारच... आपण नाही का करत अशी कसरत... ? करतो, जरूर करतो... पण, त्यात फरक असतो जमीन अस्मानाचा.... 'घरोघरी मातीच्या चुली' अशी मराठीत म्हण आहे. त्याचा प्रत्यय आपल्याला पदोपदी असा येत असतो. समस्या, दुःखं, प्रत्येक माणसाची सारखीच असतात... फक्त त्याचं स्वरुप आणि परिस्थिती वेगवेगळी असते. आपणही खरे तर डोंबारीच असतो... पांढरपेशी डोंबारी... व्यवस्था नावाचा ढोलक आपल्याला नाचवत असतो आणि आपणही जगण्याची कसरत करत असतो. दोन बाजूंच्या काठ्यांना बांधलेला दोर आणि त्यावरून चालताना पडू नये म्हणून करावी लागणारी खटपट... सरावानं हे शक्य होत असलं तरी त्यासाठी परिश्रम करावे तर लागतातच नां... ? आपणही असेच हळूहळू सरावतो... आणि आपल्याही नकळत पट्टीचे डोंबारी होऊन जातो... रस्त्याने जाताना आजूबाजूला असे अनेक डोंबारी दिसतात, काही सडलेले, काही पडलेले, तर काही चिवटपणे तोलून उभे राहिलेले....
ऑफिसात आलो... सवयीप्रमाणे ई मेल चेक केले. एका बालमित्राचा अनपेक्षित मेल इनबॉक्समध्ये येऊन पडला होता. उत्सुकतेने मी तो वाचला. नोकरीच्या निमित्ताने परदेशात गेलेला तो मित्र वैतागला होता. मंदीमुळे त्याच्या नोकरीवर संक्रांत आलेली... कुठल्याही क्षणी गाशा गुंडाळून भारतात परतावं लागणार या विचारानं तो हतबल झालेला... त्याच्या शब्दांशब्दांतून ते प्रतीत होत होतं. भल्यामोठ्या पगाराच्या नोकरीतही त्याला स्वास्थ्य नव्हतं. तो त्याचा तोल सावरू शकत नव्हता. आत्मविश्वास ढळलेला तो माझा मित्र केविलवाणा होऊन तिथलं मंदीचं वास्तव सांगत होता... माझ्या डोळ्यांसमोर पुन्हा तो सकाळचा डोंबारी आणि दोरीवर तोल सावरत चालणारी ती चिमुरडी आली.... तोल सावरण्याचं त्यांचं कसब पाहून खरंच अप्रूप वाटलं... एकीकडे मंदीच्या फटक्यामुळे तोल न सावरू शकणारा माझा परदेशातला मित्र तर दुस-या बाजूला परिस्थितीचा हसतमुखाने स्वीकार करत जगणं तोलून धरणारी ती चिमुरडी.... तोल राखायला शिकवणारे हे प्रसंग माझ्यासाठी तितकेच तोलामोलाचे वाटले.
- दुर्गेश सोनार (दिनांक, २९ जानेवारी २००९)
1 comment:
must!!!!!!!!! aavadal!!!! lihit raha!!!!!! vilas
Post a Comment